पुणे- वॉर कुठलेही असो,त्यात सारे भरडले जातात , ज्यांचा संबध नाही अशा निष्पापांना देखील त्याच्या झळा सोसाव्या लागतात , अगदी याच तत्वावर आता सध्या सुरु असलेल्या महाराष्ट्रातील आणि देशातील भाजपा आणि भाजपा विरुध्द चे राजकीय पक्ष यांच्यात सुरु असलेल्या वॉर मध्ये आमची होरपळ होऊ नये अशी भावना आता IAS अधिकारी व्यक्त करू लागले आहेत . या पार्श्वभूमीवर राज्यातील वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत चिंता व्यक्त केली आहे.
राज्य आणि केंद्रात किंवा राज्यातील विरोधकांत आणि केंद्रात ,राज्यांतर्गत असा सत्ता संघर्ष गेली ५ वर्षे सुरु आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांत ‘आयएएस’ आणि भारतीय पोलिस प्रशासन (आयपीएस) सेवेतील चार ते पाच अधिकारी गजाआड झाले असून सत्तासंघर्षात ते कुठल्या न कुठल्या कारणाने वादग्रस्त ठरले आहेत. राज्यातील सत्तासंघर्षात वरिष्ठ ‘आयपीएस’ अधिकारी रश्मी शुक्ला आणि परमबीर सिंह यांच्यावरील गुन्हेप्रकरण गाजले होते. त्यानंतर ‘टीईटी’ घोटाळ्यात ‘आयएएस’ अधिकारी सुशील खोडवेकर यांचे नाव आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान खंडणी प्रकरणात ‘आयपीएस’ अधिकारी सौरभ त्रिपाठी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि नंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. हे सर्व प्रकार फौजदारी गुन्ह्यांशी निगडित असल्याने त्याला फारसा पाठीशी घालण्याचा प्रकार सनदी अधिकाऱ्यांकडून झाला नाही. मात्र, मुंबई महापालिकेतील कथीत घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांची कसून चौकशी केली. त्यानंतर जयस्वाल यांच्यावर झालेल्या छापासत्राने ‘आयएएस’ आणि ‘आयपीएस’ अधिकारी धास्तावले असून त्यांनी थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन या सर्व प्रकारांबाबत चिंता व्यक्त केली आहे.‘ईडी’कडून सुरू असलेल्या चौकशीसत्रात निवृत्त उच्चपदस्थ सनदी अधिकारी रडारवर असल्याची चर्चा आहे. याशिवाय कोविड केअर सेंटर घोटाळ्यात पुण्यातील एका अधिकाऱ्याकडे चौकशी केल्याचे समजते. पुण्यात वादग्रस्त सुजित पाटकर यांच्या कंपनीला कोविड केअर सेंटरचे मिळालेले कंत्राटाची चौकशी करण्यात येत आहे. या कंपनीने शिवाजीनगर येथील कोविड केअर सेंटर केवळ आठ दिवस चालविले त्यानंतर या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आले. तसेच, या कंपनीची अनामत रक्कम जप्त करण्यात आली. या कारवाईचा उल्लेख ‘ईडी’च्या मुंबई येथील तक्रारीत नमूद आहे. याशिवाय औरंगाबाद येथील पंतप्रधान आवास योजनेतर्गंत प्रकल्पाची चौकशी सुरू आहे. यामध्येही एका ‘आयएएस’ अधिकाऱ्याची चौकशी करण्यात येत आहे. हे सर्व प्रकार सुरू असताना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) पुण्यात ‘आयएएस’ अधिकारी डॉ. अनिल रामोड यांना लाचेची रक्कम स्वीकारताना गजाआड केले.महापालिका तसेच, इतर विभागांमध्ये दक्षता विभागाकडून वेगवेगळ्या निविदांची तसेच मोठ्या प्रकरणांची तपासणी करून ती प्रकरणे वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात येतात. त्याचप्रमाणे आता ‘ईडी’ आणि ‘सीबीआय’च्या अधिकाऱ्यांनाही या ठिकाणी नियुक्त करून त्यांच्याकडूनही या फाइल तपासून घ्या आणि त्यानंतरच त्यावर सही करावी, असा उपरोधिक टोला ‘आयएएस’ अधिकाऱ्यांनी लगावला आहे. एकीकडून राजकीय व्यक्तींकडून वेगवेगळ्या कामांसाठी दबाव येत असताना दुसरीकडे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा कोण मागे लावून घेणार, अशी प्रतिक्रिया एका उच्चपदस्थ सनदी अधिकाऱ्याने व्यक्त केली.

