सीआयडीच्या अपर पोलीस अधीक्षक अनुजा देशमाने यांची कामगिरी
पुणे-साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाउ साठे विकास महामंडळाच्या ३६७ कोटींचा अपहर करणाऱ्या २६ आरोपींपैकी २५ पकडल्यावर देखील २६वा आरोपी जो गेली ८ वर्षे फरार होता ,त्यास सीआयडीच्या अपर पोलीस अधीक्षक अनुजा देशमाने आणि त्यांच्या पथकाने काल अखेरीस जेरबंद केले . वेगवेगळ्या शहरात तो नाव बदलून राहत होता .
या प्रकरणाची हकीकत अशी कि,’सन २०१२ ते २०१५ या कालावधीत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाउ साठे विकास महामंडळास महाराष्ट्र व केंद्र शासन यांच्याकडून रुपये ४८४.८६ कोटी प्राप्त झाले होते. हे अनुदान महाराष्ट्र राज्यातील मातंग समाजातील पात्र लाभार्थ्याना त्यांच्या विकासासाठी वितरीत करण्यासाठी शासनाने मंजुर केले होते. महाराष्ट्रातील त्या त्या जिल्हयातील जिल्हा अधिकारी यांच्या अधिपत्याखाली समाजकल्याण अधिकारी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाउ साठे विकास महामंडळातील जिल्हा व्यवस्थापक व इतर महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांची समिती गठित करुन शासनाच्या कार्यप्रणालीप्रमाणे वार्षिक निधी कर्ज स्वरुपात वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले होते.
सन २०१२ ते २०१५ या कालावधीत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाउ साठे विकास महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष व तत्कालीन आमदार रमेश नागनाथ कदम व महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक (एम.डी) श्रावण किसन बावणे आणि इतर महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांनी आपसात संगणमत करून एकुण ३६७कोटी रुपये रकमेचा शासनाचा विश्वासघात करुन अपहार केला होता. सदर प्रकरणात गु. अ. वि. कडे एकूण ७ गुन्हे तपासावर आहेत. सदर प्रकरणात प्रथम दहिसर पो. स्टे. गु.र.नं. ३३६/२०१५ भा. द. वि. कलम ४०६, ४०८, ४०९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३८४, २०१, २०९, १२०(ब), ३४सह भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कल १९९८ चे कलम ७, ८, १३ (१) (सी), १३ (डी) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. सदर गुन्हयातील २६ आरोपींविरुध्द यापूर्वी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आलेले आहे. गुन्हयातील मुख्य आरोपी व महामंडळाचा तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम हा गेल्या ८ वर्षापासून कारागृहात आहे.
नमूद गुन्ह्यातील आरोपी कमलाकर रामा ताकवाले वय ४० रा. सराफनगर, पैठण जिल्हा औरंगाबाद हा सदरचा गुन्हा घडलेपासून मिळून येत नव्हता. सदरच्या आरोपीस न्यायालयाने फरार घोषीत केलेले होते. सदरचा आरोपी हा गेले ०८ वर्षापासून फरार होता. सदरचा आरोपी हा स्वतःचे नाव बदलून अहमदनगर जिल्ह्यात राहात असलेची माहिती भरारी पथक, गुन्हे अन्वेषण विभागास प्राप्त झाली होती. सदर माहितीच्या आधारे भरारी पथक, गुन्हे अन्वेषण विभागाकडील तपास पथक गेले ४ महिन्यापासून सदर आरोपीचा तपास औरंगाबाद, अहमदनगर व पुणे जिल्ह्यात करत होते. दरम्यानचे काळात आरोपी हा ता. अकोले, व ता. संगमनेर, जिल्हा अहमदनगर परिसरात आपले नाव बदलून रहात असलेची व एम चारचाकी वाहन वापरत असल्याची खात्रीशिर माहिती प्राप्त झाली होती. सदर वाहनाच्या फास्ट टॅगचे माहितीव्दारे आरोपीचा शोध घेणेकरीता भरारी पथकाकडील तपास पथक दिनांक १९/०६/२०२३ रोजी ता. अकोले, ता. संगमनेर परिसरात रवाना करण्यात आले होते. सदर तपास पथकाने आरोपी संदर्भात प्राप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे, दिनांक २१/०६/ २०२३ रोजी आरोपी नामे कमलाकर रामा ताकवाले वय ४० रा. सराफनगर, पैठण, जिल्हा औरंगाबाद यास हॉटेल अहमद, संगमनेर येथून ताब्यात घेतले आहे.
सदरची कार्यवाही प्रशांत बुरडे, अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे, सारंग आव्हाड, पोलीस उप महानिरीक्षक, (आ.गु.शा ) गु.अ.वि. व डॉ. दिनेश गि. बारी पोलीस अधीक्षक, भरारी पथक यांचे मार्गदर्शनाखाली, तपास अधिकारीअनुजा देशमाने, अपर पोलीस अधीक्षक, भरारी पथक यांचे अधिपत्याखाली पोलीस निरीक्षक, श्री दिनेश पाटील, पो.हवालदार कृष्णकांत देसाई, पो.हवालदार राजेंद्र दोरगे सर्व नेमणूक भरारी पथक, व पो.शि. अशोक गाडे, राजूर पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे.

