पुणे-कर्मयोगिनी कै. विजयाताई लवाटे यांनी एचआयव्ही संसर्गित मुला-मुलींचे संगोपन, आरोग्य आणि शिक्षण हे मानवतेचे अभूतपूर्व कार्य केले असून त्यांची पुढची पिढी तेवढ्याच आत्मीयतेने हे कार्य पुढे नेत आहे ही कौतूकास्पद बाब आहे. विशेष म्हणजे आता या संस्थेत लाभार्थींची संख्या कमी होत असून, हितचिंतकांची संख्या वाढत आहे. ही विशेष आनंदाची बाब आहे. अशा शब्दात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरणतज्ञ डॉ. विश्वंभर चौधरी यांनी ‘मानव्य’ संस्थेच्या कार्याचा गौरव केला. ‘मानव्य’ संस्थेच्या २६ व्या वर्धापनदिनानिमित्त भूगाव येथील ‘गोकुळ’ या संस्थेच्या वास्तूत झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ‘मानव्य’ चे अध्यक्ष शिरीष लवाटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी मंचावर विश्वस्त सौ. उज्वला लवाटे आणि विश्वस्त विनया देसाई उपस्थित होत्या.
प्रारंभी दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संस्थेतील विद्यार्थिनी साक्षी हिने गणेशवंदना सादर केली.
डॉ. विश्वंभर चौधरी पुढे म्हणाले की, विशेष म्हणजे या संस्थेतून बाहेर पडलेले विद्यार्थीच संस्थेत परत येवून संस्थेतला कारभार संभाळण्यात भरीव योगदान देत आहेत. हे अनुकरणीय ‘मॉडेलच’ मानावे लागेल.
‘मानव्य’ चे अध्यक्ष शिरीष लवाटे यांनी सर्वांचे स्वागत व प्रस्ताविक केले. ते म्हणाले की, ‘कर्मयोगिनी कै. विजयाताई लवाटे यांनी सुरु केलेल्या या कार्याचा आज वटवृक्षाएवढा विस्तार झाला आहे. संस्थेतील एचआयव्ही संसर्गित मुले आता योग्य संगोपन, औषधोपचार आणि शिक्षणामुळे स्वतःच्या पायावर उभी राहत आहेत. याचा संस्थेला मोठा अभिमान आहे. संस्थेतील विविध उपक्रमांची व नविन प्रकल्पांची माहिती देऊन. ‘जोपर्यंत एचआयव्ही संसर्गित मुलं-मुली आहेत तोपर्यंत ‘मानव्य’ चे काम चालतच राहिल असे सांगून, या कार्यास सहाय्य करणार्या सर्वांचे त्यांनी आभार मानले.’
यासोबतच संस्थेतील विद्यार्थीनी प्रिती इंगळे बी.ए सायकॉलॉजि करत असून पेंटा फाऊंडेशन मार्फत निवड झाल्यानंतर ती आता ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे यंग रिपोर्टर म्हणूंन कॉन्फरन्ससाठी जात असल्याचे सांगून शिरीष लवाटे यांनी टाळ्यांच्या कडकडाटात तिचे विशेष कौतूक केले.
यावेळी संस्थेतच मोठे झालेल्या व आता संस्थेच्या दैनंदिन कामकाजात सहभाग देणार्याक अमित, गणेश आणि शुभम यांच्यापैकी अमितचे मनोगत झाले. त्याने म्हटले की, या संस्थेत लहान वयातच दाखल केले गेले. आई-वडिलांचे प्रेम येथे लाभले. तसेच उत्तम औषधोपचार आणि शिक्षणामुळे ‘एचआयव्ही संसर्गित’ हा शब्दच जणू आमच्यातून हद्दपार झाला आहे. संस्थेतून बाहेर पडल्यावर तो परदेशी गेला. ते अनुभवही त्याने याप्रसंगी कथन केले.
यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. त्यात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नृत्याविष्कार सादर केले. तसेच संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांनी मिळून ‘आम्ही स्वच्छतेचे सारथी’ ही चित्तवेधक नाटिका समर्थपणे सादर केली. याचे लेखन, दिग्दर्शन करणार्याआ संस्थेबाहेरील मुग्धा थोरात, पराग बद्रिके आणि ऋतुजा खैरनार यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. संस्थेच्या जमिला ढलाईत यांनी आभार प्रदर्शन केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन संस्थेतील विद्यार्थ्यांनीच केले होते. याप्रसंगी संस्थेच्या हितचिंतकांची मोठी गर्दी होती.
चांगल्या कार्यास हितचिंतक वाढणे हे सुचिन्ह!- डॉ. विश्वंभर चौधरी
Date:

