मुंबई, 16 फेब्रुवारी 2023 –
दिव्य कला मेळा 2023- देशभरातील दिव्यांग उद्योजक/कारागीर यांची उत्पादने आणि कलाकुसरीचे प्रदर्शन करणारा एक आगळा कार्यक्रम आजपासून मुंबईत सुरू होत आहे. मुंबईत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स इथल्या एमएमआरडीए मैदान- क्रमांक 1, इथे 16 ते 25 फेब्रुवारी 2023 दरम्यान दिव्यांगजन (अपंग व्यक्ती) सक्षमीकरण विभागाने हा दहा दिवसांचा मेळा आयोजित केला आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, आज मुंबईत दिव्य कला मेळा-2023 चे उद्घाटन करणार आहेत.
या मेळ्यामध्ये देशातील जवळजवळ 24 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधले सुमारे 200 दिव्यांग कारागीर/कलाकार आणि उद्योजक त्यांची उत्पादने आणि कौशल्ये प्रदर्शित करतील. जम्मू आणि काश्मीर, ईशान्येकडील राज्यांसह देशाच्या विविध भागांमधील, हस्तकला, हातमाग उत्पादने, भरतकाम आणि पॅकेज्ड फूड (वेष्टना मधील अन्नपदार्थ) इत्यादींसारखी आकर्षक उत्पादने या प्रदर्शनात एकाच ठिकाणी प्रदर्शित केली जातील, त्यामुळे इथे भेट देणाऱ्यांना हा कार्यक्रम एक विलोभनीय अनुभव देईल.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून सर्वांना ‘व्होकल फॉर लोकल’ चा आग्रह धरण्याची आणि दिव्यांगजन कारागीरांनी आपल्या असामान्य दृढनिश्चयाने बनवलेली उत्पादने बघण्याची/विकत घेण्याची संधी मिळेल. या ठिकाणी प्रदर्शित केल्या जाणाऱ्या उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीमध्ये, घरगुती सजावट आणि जीवनशैलीची उत्पादने, कपडे, स्टेशनरी आणि पर्यावरणपूरक उत्पादने, पॅकेज केलेले अन्न आणि सेंद्रिय उत्पादने, खेळणी आणि भेटवस्तू, दागिने, क्लच बॅग यांसारख्या वैयक्तिक वापराच्या वस्तू, या आणि अन्य वस्तूंचा समावेश असेल.
दिव्य कला मेळा, सर्व दहा दिवस, सकाळी 11 ते रात्री 9 या वेळात सर्वांसाठी खुला राहील. याशिवाय, दिव्यांग कलाकार आणि सुप्रसिद्ध व्यावसायिक कलाकारांच्या सादरीकरणासह सांस्कृतिक उपक्रमांची मालिकाही मेळ्याच्या मैदानात रोज सादर केली जाईल. कार्यक्रमाला भेट देणाऱ्यांना देशाच्या विविध प्रांतांमधील त्यांच्या आवडत्या खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेता येईल.
भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाअंतर्गत येणारा दिव्यांग सक्षमीकरण विभाग देशातील दिव्यांग व्यक्तींना सक्षम बनवण्यासाठी विविध योजना कार्यान्वित करत असतो.दिव्यांगजनांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या उद्देशाने NHFDC म्हणजेच राष्ट्रीय अपंग वित्त व विकास महामंडळ, कर्ज पुरवठ्याच्या माध्यमातून आर्थिक मदत पुरवते. दिव्यांगांना बाजारपेठ मिळवून देण्यात साहाय्य करण्यासाठी त्यांना देशभरात भरणाऱ्या मेळावे किंवा प्रदर्शनामध्ये विक्रीसाठी विनामूल्य जागा म्हणजे स्टॉल्स दिले जातात. दिव्यांग जनांची उत्पादने, ब्रॅण्डिंग, उत्पादनाचा विकास आणि बाजारपेठेचे इतर फायदे मिळवून देण्याच्या दृष्टीने अशा प्रकारचे मेळावे महत्त्वाची भूमिका बजावतात. अशा प्रसिद्ध मेळाव्यांना भरपूर लोक भेट देतात. त्यामुळे दिव्यांग समाजामधील कौशल्य लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. गेल्या काही वर्षांपासून दिव्यांगजन सक्षमीकरण विभाग NHFDC च्या सहाय्याने फक्त दिव्यांग जनासाठी असलेले मेळावे आयोजित करत आहे. दिव्य कला मेळा असे या मेळाव्यांचे नामकरण केले आहे
दिव्यांग सक्षमीकरण विभागाने डिसेंबर 2022 मध्ये नवी दिल्लीतील ऐतिहासिक कर्तव्य पथावर दिव्य कला मेळा आयोजित केला होता. त्यामध्ये दिव्यांगांनी तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तू तसेच उत्पादने यांची लाखो लोकांनी प्रशंसा केली होती. अशा प्रकारचे मेळावे दिव्यांग बंधू भगिनींसाठी दरवर्षी आयोजित करून ते फक्त दिल्ली मुंबई सारख्या मोठ्या शहरांपुरते मर्यादित न ठेवता भविष्यात सर्व देशभरात घेण्याचे विभागाचे नियोजन आहे. मुंबईनंतर भोपाळ येथे मार्च 2023 मध्ये दिव्य कला मेळा आयोजित करण्यात आला आहे.