पुणे -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आलेल्या धमकीवरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारचा समाचार घेतला आहे. धमकी देणाऱ्याला अटक झाली पाहिजे, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. इतकंच नाही तर धमकी देणारा सौरभ पिंपळकर हा भाजपचा कार्यकर्ता असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.या संदर्भात माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, धमकी देणाऱ्याला अटक झाली पाहिजे. सोशल मीडियावर द्वेष पसरवणाऱ्यांच्या विरोधात कारवाईसाठी तत्काळ कायदा करण्याची मागणी देखील त्यांनी केली. सौरभ पिंपळकर याच्या अकाउंट वरून ही धमकी देण्यात आली असून त्याच्या अकाउंटवर हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचा उल्लेख असल्याची माहिती देखील अजित पवार यांनी दिली. विचारांची लढाई विचारांनी लढावी, असा सल्ला देखील अजित पवार यांनी दिला.
मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला होता. मात्र, ते उपलब्ध नसल्याची माहिती मला त्यांच्या कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. तर मग उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन लागला नाही, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. पोलिस अधिकाऱ्यांशी बोलण्यापेक्षा मी या दोघांशी बोलणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.सर्वच पक्षांनी आपापल्या कार्यकर्त्यांना सांभाळावे असे म्हणत अजित पवार यांनी राजकीय नेत्यांना सल्ला दिला आहे. सध्या सोशल मीडियावर ज्याप्रमाणे द्वेष पसरवला जात आहे, ती आपली संस्कृती नाही. आपली संस्कृती जपली पाहिजे, मी प्रत्येक पक्षाबद्दल बोलतोय, त्यात आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील आला असेही त्यांनी सांगितले. सर्व पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून द्वेष पसरवण्याचे काम होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे असे ते म्हणाले.सोशल मीडियावर ज्याप्रमाणे द्वेष पसरवला जात आहे, या विरोधात कायदा करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. सध्या कायदा करायला उशीर लागत असेल तर तसा अध्यादेश काढा, या प्रकारची नेत्यांची बदनामी थांबायला हवी, असेही ते म्हणाले.

