२१ व्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाचा समारोप
पुणे : कवितेचे अवकाश विस्तीर्ण आहे. मनातील भावभावना व्यक्त करण्याचे कविता हे सशक्त माध्यम आहे, असे मत निवृत्त मुख्य न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी व्यक्त केले.
गुंफण अकादमी, कराड आणि भारतीय शिक्षण संस्था, कोथरूड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.१५) आयोजित करण्यात आलेल्या २१व्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाच्या समारोप समारंभात सुनील वेदपाठक बोलत होते. संमेलन कोथरूडमधील जे. पी. नाईक शिक्षण आणि विकास केंद्राच्या संकुलात आयोजित करण्यात आले होते. संमेलनाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. सुनंदा शेळके, भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह डॉ. महादेव सगरे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय बोरुडे, ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक बबन पोतदार, भोगावती कारखान्याचे संचालक बी. ए. पाटील, भारतीय शिक्षण संस्थेचे सदस्य सचिव डॉ. जयसिंग कळके, गुंफण अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे मंचावर होते.
यावेळी गुंफण पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यात निवृत्त पोलीस उपधीक्षक अनिल पाटील (साहित्य), आपुलकी प्रतिष्ठान (सामाजिक), शाहीर रंगराव पाटील (सांस्कृतिक), ओमप्रकाश कोयटे (सहकार भूषण), युवराज गाडवे (उद्योगरत्न), प्रा. डॉ. विजयंता भुरले (शिक्षणरत्न), संदेशकुमार नवले (सद्भावना), विठ्ठल जाधव (पत्रकारिता) यांचा गौरव करण्यात आला. पुरस्कारार्थींच्या वतीने ओमप्रकाश कोयटे, राजेंद्र यादव यांनी मनोगत व्यक्त केले.
याचप्रमाणे प्रेमलाताई चव्हाण राज्यस्तरीय विनोदी कथा स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले. प्रथम – योगेश शिंदे (शेजारी(ण)), द्वितीय – वीरेंद्र पतकी (चिता), तृतीय – डॉ. प्रभाकर शेळके (कंदुरी … एक मुंढी चार पाय) यात यांचा समावेश आहे.
डॉ. महादेव सगरे म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी सध्या चर्चा ऐकायला मिळते. हे आधुनिक तंत्रज्ञान साहित्य क्षेत्राच्या दृष्टीने उपयोगी आहे की घातक हे भविष्यात ठरणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजीत शेख यांनी केले तर आभार स्वाती बाजारे यांनी मानले.

