पुणे-काँग्रेस नेते प्रशांत जगताप यांनी महाविकास आघाडीने पुणे महापालिका निवडणूक एकत्र येऊन लढली असती तर ६७ जागा मिळाल्या असत्या, असा दावा त्यांनी केला. तसेच, आपल्या काँग्रेस प्रवेशातही काही जणांनी अडथळे आणल्याचा आरोप त्यांनी केला.
जगताप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांनी निवडणुकीपूर्वीच हा अंदाज वर्तवला होता. आघाडीतील पक्ष स्वतंत्र लढल्यास किती जागा मिळतील, हे देखील त्यांनी सांगितले होते आणि आता निकालानंतर त्यांचा अंदाज खरा ठरल्याचे ते म्हणाले.आपली गाडी सुसाट वेगाने जात असताना कोणी अडथळा निर्माण केला किंवा गाडीच्या इंधन टाकीत साखर कोणी टाकली, हे काळानुसार समोर येईल,” असे जगताप म्हणाले. त्यांच्या मते, काँग्रेस पक्ष प्रवेशातही काही जणांनी व्यत्यय आणला होता. ही बाब केवळ शहर स्तरावरची नसून, राज्य स्तरावर घडली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
महापालिका निवडणुकीतील आपला विजय मतदारसंघातील नागरिकांना समर्पित करत असल्याचे जगताप यांनी सांगितले. विविध प्रसारमाध्यमांनी घेतलेल्या भूमिकेला वेळोवेळी पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले.त्यांनी २६ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम केले आणि नंतर एका भूमिकेसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नागरिकांनी त्यांना पाठिंबा दिला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल आदर कायम असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी अपक्ष म्हणून लढण्याचा विचार केला होता, परंतु आपल्या विचारांवर ठाम राहून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
काँग्रेसने ज्याप्रकारे त्यांना स्वीकारले, त्याबद्दल ते आयुष्यभर ऋणी राहतील, असे जगताप म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना त्यांनी भाजपविरोधात शहर स्तरावर चांगली मोट बांधली होती, परंतु काही जणांनी त्यात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. इतर पक्षांकडून अनेक ऑफर आल्या, पण त्या स्वीकारल्या नाहीत.काँग्रेसने कधीही आपल्या विचारधारेला तिलांजली दिली नाही, असा १४० वर्षांचा इतिहास आहे. त्यामुळे ते भाजपसोबत कधी जाणार नाहीत, याची त्यांना खात्री आहे. निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून तिकीट वाटपातही त्यांना चांगली वागणूक मिळाली. त्यांच्याकडे असलेली टीम लढणारी आणि जिंकणारी होती, यावर आधीच्या पक्षातील नेत्यांनी विश्वास ठेवला नाही, तो काँग्रेसने ठेवला.यामुळे ते आणि त्यांचे सहा सहकारी काँग्रेस तिकिटावर हडपसर मतदारसंघातून निवडून आले. मधल्या काळात आपली घुसमट होत होती, त्यामुळे काँग्रेस पक्षात आलो, असे त्यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षाचे आमदार आणि सत्ताधारी समोर असतानाही जनतेने पक्ष सोडल्यावर आपल्याला साथ दिली, असे जगताप यांनी सांगितले.

