मुंबई, दि. ३ मे २०२३ : महावितरणचे संचालक (मानव संसाधन) म्हणून श्री. अरविंद भादीकर यांची सरळसेवा भरतीद्वारे निवड झाली आहे. त्यांनी आज आपला पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी श्री. अरविंद भादीकर हे कार्यकारी संचालक वितरण आणि मानव संसाधन (प्रभारी) म्हणून कार्यरत होते व त्यांनी या दोन्ही पदांचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळला आहे.
अमरावती येथील मूळचे रहिवासी असलेले श्री. भादीकर हे अमरावती शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी. ई. झाले आहेत. मार्च-१९९२ साली तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे कनिष्ठ अभियंता म्हणून ते रुजू झाले.
खडका येथील ४०० किव्हो उपकेंद्रात सहाय्यक अभियंता व उपकार्यकारी अभियंता म्हणूनही त्यांनी काम केले. २००५ मध्ये वाशीम विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच मुख्यालयातील पायाभूत आराखडा, नागपूर ग्रामीण मंडल व अमरावती मंडल येथे अधीक्षक अभियंता आणि अकोला व चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून ते कार्यरत होते.