पुणे – वडगाव शेरी परिसरातील रस्त्यांचा विकास करण्यासाठी जागा मालक जागा देत नसल्याने व त्याचा परिणाम या परिसरावर होत असल्याने अखेर या ठिकाणी नगररचना परियोजना (टीपी स्कीम) करण्याचा निर्णय घेतला आहे.या प्रस्तावास आज आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी शहर सुधारणा समितीमध्ये मंजुरी दिली.
या गावामधील रस्ते विकसित करून टीपी स्कीम राबविणे आवश्यक असल्याने वडगावशेरीतील सर्वे क्रमांक १७ /१ /३ब , १०/४ , ११/ १ /२ / ३ या ठिकाणी रस्ते ताब्यात येण्यासाठी टीपी स्कीम करावी अशी मागणी माजी नगरसेविका शीतल शिंदे यांनी केली होती. त्यानुसार हा प्रस्ताव मान्यतेसाठी शहर सुधारणा समितीपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आला त्याला शहर सुधारणा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
पुणे महापालिका हद्दीत वडगावशेरी या गावाचा समावेश १९९७ मध्ये झाला आणि विकास आराखडा २००५ मध्ये जाहीर झाला. २००७ मध्ये यास अंतिम मान्यता मिळाली. पण गेल्या १५ वर्षात वडगाव शेरीचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. उलट वडगाव शेरी वगळता या भागातील इतर परिसरात मोठे रस्ते झाल्याने विकास झाला आहे. २००७ पासून वडगावशेरीतील जागा मालक रस्त्यासाठी आवश्यक असलेले भूसंपादन करू देण्यास तयार होत नाहीत. त्याचा परिणाम नागरिकांना भोगावा लागत आहे.

