पुणे दि २४: अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबईच्यावतीने यशदा पुणे येथे १९ ते २१ एप्रिल २०२३ या कालावधीत राज्यातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांची तीन दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.
यावेळी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय कोलकाता येथील औद्योगिक सांख्यिकी विभागाचे उपमहानिदेशक सौम्या चक्रवर्ती, यशदाचे महासंचालक एस. चोकलिंगम, राष्ट्रीय नमुना पाहणी कार्यालय पुणे क्षेत्रीय कार्यालयाचे संचालक आलोककुमार, अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक विजय आहेर आदी उपस्थित होते.
श्री. चक्रवर्ती म्हणाले, जगात बहुतांश देशात वार्षिक उद्योग पाहणी करण्यात येते. आपल्या देशातील वार्षिक उद्योग पाहणीमध्ये सर्वात अधिक उद्योगांची पाहणी केली जाते. माहिती विहीत वेळेत संकलित करुन उपलब्ध करुन देणे महत्त्वाचे असते, असेही ते म्हणाले.
यशदाचे महासंचालक एस. चोकलिंगम यांनी देशातील सर्वेक्षणाचा इतिहास, माहितीचे महत्व आणि त्याचा वापरामुळे होणारे अपेक्षित, अनपेक्षित परिणाम याबाबत माहिती दिली. कृत्रिम बुद्धीमत्ता व मशीन लर्निंग अशा तंत्रज्ञानाचा माहिती संकलनाच्या कार्यपद्धतीमध्ये वापर करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
श्री. आहेर म्हणाले, कामाचे योग्य नियोजन करुन शासनासाठी व उद्योग क्षेत्रासाठी महत्वाची असलेली माहिती या पाहणीच्या माध्यमातून वेळेत व गुणवत्तापुर्ण उपलब्ध करुन द्यावी. उद्योगांनीदेखील या कामासाठी सहकार्य करावे.
वार्षिक उद्योग पाहणी हा उद्योगविषयक (संघटित क्षेत्र) महत्वपूर्ण आकडेवारीचा प्रमुख स्त्रोत आहे. या आकडेवारीचा वापर राष्ट्रीय उत्पन्न अंदाज तयार करण्यासाठी, औद्योगिक संरचनेचा अभ्यास करण्यासाठी व उद्योगविषयक धोरणे निश्चितीसाठी होतो.
0000