नवी दिल्ली-केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय प्राणी उद्यानात, पांढऱ्या वाघाच्या बछड्यांना, पांढऱ्या वाघांसाठीच्या क्षेत्रात सोडले. या दोन बछड्यांचे नामकरणही त्यांनी केले. मादी बछड्याचे नाव ‘अवनी’ म्हणजे पृथ्वी तर नर बछड्याचे नाव ‘व्योम’ म्हणजे अवकाश असे ठेवण्यात आले. त्यांच्या पालकांचे नाव, विजय आणि सीता असे आहे.

सीता वाघीणीने, 24 ऑगस्ट 2022 रोजी या दोन पिल्लांना जन्म दिला. आता ही पिल्ले आठ महिन्यांची झाली आहेत. आतापर्यंत, हे बच्चे रात्रीच्या वेळी निवाऱ्यात आणि दिवसभर आईजवळ टतिच्या पिंजऱ्यात ठेवले जाई. आता मात्र ही पिल्ले मोठी झाली आहेत, आणि त्यांना त्यांच्या हालचाली करण्यासाठी अधिक जागा लागते, म्हणून त्यांना आता या प्राणी संग्रहालयातच वेगळ्या भागात सोडण्यात आलं असून, तिथे जाणारे लोकही त्यांना बघू शकतील.
यावेळी, यादव यांनी उपस्थित शालेय विद्यार्थ्यांशीही संवाद साधत, त्यांना लाईफ या मिशनबद्दल माहिती दिली. तसेच शाश्वत जीवनशैली आणि नैसर्गिक स्त्रोतांचे संवर्धन यांचे महत्त्वही त्यांना समजावून सांगितले.

