शिवव्याख्याते प्रदीप कदम यांचे प्रतिपादन; तेराव्या धर्ममैञी विचारवेध संमेलनाचे उद्घाटन
पुणे : “समाजामध्ये जाती-धर्माच्या नावाखाली फूट पडल्याने सामाजिक अस्थिरता निर्माण होत आहे. या अस्थिरतेची चौकट ओलांडून सर्व धर्माचे सार असलेल्या बंधुतेचा, मानवतेचा विचार प्रत्येकाच्या मनामनात रुजायला हवा. समाजातील भरकटलेली व्यवस्था मानवतेच्या धाग्याने बांधता येईल,”असे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रदीप कदम यांनी केले.
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि भारतीय जैन संघटनेच्या वाघोली येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने बीजेएस सभागृहात आयोजित तेराव्या धर्ममैञी विचारवेध संमेलनाच्या उद्घाटनावेळी प्रदीप कदम बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अशोककुमार पगारिया यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले.
प्रसंगी राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक बंधुताचार्य प्रकाश रोकडे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष सुरेश साळुंके, प्राचार्य डॉ. संजय गायकवाड, मधूश्री ओव्हाळ आणि गुलाब राजा फुलमाळी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बंधुता गुणवंत विद्यार्थी पुरस्कार वितरण, तसेच कवी शंकर आथरे लिखित ‘बंधुतेचे विस्तिर्ण क्षितीज’ पुस्तकाचे प्रकाशन झाले.
प्रदीप कदम म्हणाले, “मानवता धर्माच्या पलीकडे आहे, हा विचार समाजात पेरण्याचे कार्य महापुरुषांनी केले. मानवतेचे तत्व आणि कल्याणाचा विचार हा प्रत्येक धर्मात आहे. साहित्यिकांमध्ये मानवतेचा विचार घडवण्याची ताकद असते. संमेलनाच्या माध्यमातून बंधुतेचा हा यज्ञ तेवत आहे, ही समाजाच्या एकोप्यासाठी महत्त्वाचे आहे. महापुरुषांच्या विचारांचा सकारात्मक वेध घेतल्यास बंधुता, मानवतेचे दर्शन घडते.”
प्रकाश रोकडे म्हणाले, “समाजामध्ये वावरत असताना माणूस होणे गरजेचे आहे. कोणत्याही जातीचे लेबल न लावता बहुभाषीय, बहुधर्मीय होत आम्ही सारे भारतीय आहोत, हा विचार आपल्या मनात रुजला पाहिजे. पुस्तके वाचायला लावणारी संमेलने होतात. मात्र, हे संमेलन माणूस वाचायला लावणारे आहे.”
डॉ. अशोककुमार पगारिया म्हणाले, “गेल्या दोन दशकांहून अधिक काळ बंधुता परिषद बंधुतेचा प्रचार आणि प्रसार करत आहे. समाजातील स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्यायाची भूमिका जपण्यासाठी अशा जबाबदार संस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.”
सूत्रसंचालन संगीता झिंजुरके यांनी केले. प्राचार्य डॉ. संजय गायकवाड यांनी आभार मानले.
प्रबोधन यात्री कविसंमेलन-दुपारच्या सत्रात ज्येष्ठ गझलकार सिराज शिकलगार यांच्या अध्यक्षतेखाली प्रबोधन याञी काव्यसंमेलन झाले. कवी चंद्रकांत वानखेडे, कवयित्री मधुश्री ओव्हाळ, संगीता झिंजुरके यांच्यासह महाराष्ट्रातील नामवंत कवी यामध्ये सहभागी झाले होते. मधुराणी बनसोड यांच्या ‘सन्मार्ग’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. तसेच बंधुता काव्यप्रतिभा पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

