- आकांक्षा व्यवहारेचे ४५ किलो गटात पहिले सुवर्ण
- वेटलिफ्टिंगमध्येच अस्मिता ढोणेचाही विक्रम
- टेनिसमध्ये महाराष्ट्राची अपेक्षित कामगिरी
- कबड्डीत मुलींचा विजय, तर मुलांचा पराभव
- नेमबाजीत सानियाला ब्राँझपदक
भोपाळ/इंदोर/खारगांव :
वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अपेक्षित सुरुवात करताना महाराष्ट्राचा खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील पदकांचा वेग कायम राखला. महाराष्ट्र अजूनही पदकतालिकेत आघाडीवर असून, महाराष्ट्राची २८ सुवर्ण, ३० रौप्य आणि २५ ब्राँझ अशी एकूण ८३ पदके झाली आहेत. आता उद्यापासून सुरु होणाऱ्या जलतरण क्रीडा प्रकारातील खेळाडूंच्या कामगिरीची जोड मिळणार आहे. हरियाना २३, १८, १५ अशा ५६ पदकांसह दुसऱ्या, तर मध्य प्रदेश २३, १३, २० अशा ५६ तिसऱ्या स्थानावर आहेत. सुवर्ण आणि एकूण पदक संख्येत हरियाना, मध्य प्रदेशची बरोबरी असून, रौप्यपदकांच्या आघाडीने हरियाणाने दुसरे स्थान मिळविले.
वीणाताई आहेर हिने स्नॅचमध्ये ५७ आणि क्लिन ॲण्ड जर्क प्रकारात ७२ असे एकूण १२९ किलो वजन उचलून सुवर्णपदकाचा मान मिळविला. दोन्ही प्रकारात तिसऱ्या प्रयत्नांत तिने आपली सर्वोत्तम कामगिरी केली. वीणाने दुसऱ्या क्रमांकावरील ज्योत्स्ना साबर (११८) आणि प्रितीस्मिता भोज (११७) या ओडिशाच्या दोघींना मोठ्या फरकाने मागे टाकले. वीणाने या स्पर्धेत क्लीन ॲण्ड जर्क प्रकारात आपली कामगिरी उंचावताना थेट राष्ट्रीय विक्रमाला गवसणी घातली. वीणाताईने आकांक्षा व्यवहारेच्या ७१ किलो वजनाचा विक्रम एका किलोने मोडीत काढला. आकांक्षाने गेल्यावर्षी मोदीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत या विक्रमाची नोंद केली होती.
त्यानंतर संध्याकाळच्या सत्रात आकांक्षाने ४५ किलो गटात स्नॅचमध्ये ६७ आणि क्लिन ॲण्ड जर्कमध्ये ७७ असे १४४ किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळविले. तिला महाराष्ट्राच्याच अस्मिता ढोणेकडून आव्हान मिळाले. मात्र, अस्मिता स्नॅच प्रकारात (६१ किलो) मागे राहिली. मात्र, क्लिन ॲण्ड जर्कमध्ये अस्मिताने ८२ किलो वजन उचलून नव्या विक्रमाची नोंद केली. ती १४३ किलो वजन उचलून रौप्यपदकाची मानकरी ठरली. या दोन्ही खेळाडूंना प्रवीण व्यवहारे आणि तृप्ती पराशर यांचे मार्गदर्शन मिळते.
नेमबाजीत सानियाला ब्राँझपदक कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथील सानिया सापले हिने ५० मीटर्स रायफल थ्री पोझिशन या प्रकारात ब्राँझपदक.
सानिया हिचे खेलो इंडिया मधील हे पहिलेच पदक आहे. आतापर्यंत झालेल्या राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये तिने जवळजवळ पन्नास पदकांची कमाई केली आहे. त्यासाठी आवश्यक असणारे कष्ट करायची तिची तयारी आहे. अभियांत्रिकीचे प्रशिक्षण घेणारी सानिया कोल्हापूर आणि नवी दिल्ली येथे वैयक्तिक प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. महाराष्ट्राला नेमबाजीत येथे एक सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्य अशी एकूण चार पदकांची कमाई झाली.
स्लॅलममध्ये अपयशी सुरुवात
महाराष्ट्राला साहसी क्रीडा प्रकारातील स्लॅलम (कॅनॉइंग-कयाकिंग) मध्ये अपयश आले. या स्पर्धा प्रकारात महाराष्ट्र प्रथमच सहभागी झाले होते. महाराष्ट्राची मनस्वी राईकवार ही ७२४.९७६ सेकंद अशी वेळ देत सहाव्या स्थानावर राहिली. यजमान मध्य प्रदेशाच्या मानसी बाथमने सुवर्ण, तर हरियानाच्या प्रिती पालने रौप्यआणि कर्नाटकाच्या धरिती मारियाने ब्रॉंझपदक मिळविले. या प्रकारातील दुसऱ्या म्हणजे कयाकिंगमध्ये उद्या जान्हवी राईकवार आपले कौशल्य पणाला लावणार आहे.
कबड्डीत पुन्हा संमिश्र यश
कबड्डीत दुसऱ्या दिवशी देखिल संमिश्र यशावर समाधान मानावे लागले. पहिल्या दिवशी हरियाणाविरुद्ध पराभव पत्कराव्या लागणाऱ्या मुलींनी आज तेलंगणाचा ६४-१६ असा ४८ गुणांनी पराभव केला. हरजित, मनिषा, ऋतुजा यांच्या तुफानी खेळाने मंध्यतरालाच ३१ गुणांची आघाडी घेत महाराष्ट्राचा विजय निश्चित केला. उत्तरार्धात खेळाचा वेग काहीसा संथ केला. उत्तरार्धात आणखी १७ गुणांची कमाई करताना महाराष्ट्राने मोठा विजय मिळविला.
मुलांच्या संघाला बिहारविरुद्धच्या विजयी खेळातील सातत्य राखता आले नाही. मुलांनी विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. पण, राजस्थानविरुद्ध हे प्रयत्न २७-२८ असे एका गुणाने कमी पडले.
टेनिसमध्ये विजयी सुरुवात
टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अपेक्षित सुरुवात केली. महाराष्ट्राच्या चार खेळाडूंनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. चौघांनीही एकतरर्फी विजयाची नोंद केली. मुलींच्या गटात पुण्याच्या अस्मी आडकरने बंगालच्या सोहिनी मोहंतीचा कडवा प्रतिकार १-६, ६-२, ६-१ असा मोडून काढला. मधुरिमा सावंतने दिल्लीच्या लक्ष्मी गौडा हिचा ६-१, ६-२, तर निशीत रहाणेने मेघालयाच्या इशान रावतचा ६-१, ६-० असा फडशा पाडला. रिया गायकैवारीला हरियानाच्या सुर्यांशी तन्वर हिने झुंजवले. रियाने तीन सेटपर्यंत रंगलेली लढत ६-१, ४-६, ६-१ अशी जिंकली.

