मुंबई-राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अदानींबाबत वेगळी भूमिका घेतली असली, तरी महाराष्ट्रात महाविकास आघाडीला कोणत्याही प्रकारचे तडे जाणार नाहीत, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले. ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.हिंडेनबर्ग अहवालासंदर्भात शरद पवारांनी जेपीसीऐवजी सर्वोच्च न्यायालयाची समिती जास्त परिणामकारक ठरेल, अशी भूमिका मांडल्यानंतर राऊत यांनी जेपीसीबाबत विरोधी पक्षाची मागणी ठाम असल्याचे स्पष्ट केले.
पवार साहेबांनी अदानींसंदर्भात वेगळी भूमिका घेतली असली तरी महाविकास आघाडीला महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचे तडे जाणार नाहीत. एलआयसी आणि स्टेट बँकेमधील पैसे हे जनतेचे पैसे आहेत. ते कशा प्रकारे भाजपनं आपल्या जवळच्या उद्योगपतींच्या खिशात घातले हे समोर आले. एका उद्योगपतीसाठी संपूर्ण देशाची शक्ती, प्रतिष्ठा कशी पणाला लावत आहेत हेसुद्धा समोर आले आहे. असेही संजय राऊत म्हणाले.
पवारांची भूमिका नवी नाही
शरद पवारांची ही भूमिका पहिल्यापासूनची आहे. त्यात नवीन काही नाही. शरद पवारांची भूमिका जेपीसीनं काही साध्य होणार नाही. जेपीसीचा अध्यक्ष भाजपचा असतो. त्यात बहुमत भाजपचे असते. जे त्यांना पाहिजे तसाच ते रिपोर्ट बनवणार आहेत.शरद पवारांनी न्यायालयीन चौकशीचा पर्याय दिला आहे. ममता बॅनर्जी असो, तृणमूल काँग्रेस किंवा एनसीपी अदाणींच्या बाबतीत त्यांचं वेगळे मत असू शकते. परंतु, त्यामुळे विरोधकांच्या एकजुटीत महाराष्ट्रात किंवा राष्ट्रीय स्तरावर कोणतीही फूट पडणार नसल्याचेही ते म्हणाले.

