श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने आयोजन ; कीर्तनकार विकासबुवा दिग्रसकर यांचे हनुमान जन्माचे कीर्तन
पुणे : श्रीराम-लक्ष्मण-जानकी… जय बोलो हनुमान की… अशा शब्दांत हनुमानाच्या चरित्राचे वर्णन करीत हनुमान जन्माचे कीर्तन पेशवेकालीन तुळशीबाग राममंदिरात पार पडले. श्रीराम-लक्ष्मण-सीतेच्या मूर्तीसमोर असलेल्या पाषाणातील उभ्या हनुमानाच्या मूर्तीला हनुमान जयंतीनिमित्त रेशमी वस्त्रे व दागिने घालण्यात आले होते. तर, मंदिरावर आकर्षक फुलांची सजावट देखील करण्यात आली.
श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने श्रीराम जन्मोत्सवानिमित्त तुळशीबाग येथील राम मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याची सांगता हनुमान जयंतीच्या दिवशी झाली. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त श्रीपाद चंद्रकांत तुळशीबागवाले, विश्वस्त राघवेंद्र तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, डॉ.रामचंद्र तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता. रामनवमी उत्सवाचे यंदा २६२ वे वर्ष आहे.
हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी ब्रह्मवृंदाकडून श्रीहनुमंतास रुद्राभिषेक व सकाळी ६.३० वाजता ह.भ.प.विकासबुवा दिग्रसकर यांचे श्रीहनुमान जन्माचे कीर्तन झाले. याशिवाय उत्सवात ह.भ.प. उद्धवबुवा जावडेकर यांची कीर्तनमाला, लळीत व पायघडीचे कीर्तन आणि समस्त तुळशीबागवाले परिवाराकडून श्रीरामराज्याभिषेक सोहळा देखील पार पडला. तसेच, पं.समीर दुबळे, पं. आनंद भाटे, पं. रघुनंदन पणशीकर यांच्या गायनाचा कार्यक्रम पार पडला. मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते.
पेशवेकालीन तुळशीबागेत हनुमान जयंती सोहळा थाटात साजरा
Date:

