आ.सिद्धार्थ शिरोळे यांची गृहमंत्र्यांकडे मागणी
पुणे – चोऱ्या, मारामारी, छेडछाड अशा घटना घडू लागल्याने बोपोडी-खडकी मधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, येथील पोलीस प्रशासन सक्रीय करुन कायदा सुव्यवस्था राखली जावी, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (मंगळवारी) केली.
बोपोडी-खडकीतील कायदा सुव्यवस्थेबाबतचे निवेदन आमदार शिरोळे यांनी गृहमंत्री वळसे पाटील यांना त्यांच्या मुंबईतील कार्यालयात भेट घेऊन दिले आणि चर्चाही केली. बोपोडी-खडकीत गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. १८ वर्षांखालील अल्पवयीन मुले नशापान, चोऱ्या, छेडछाड, मारामाऱ्या अशी गुन्हेगारी कृत्ये करीत आहेत. बोपोडी भागात दिनांक ११ सप्टेंबर २०२१ रोजी एका युवकाचा चार ते पाच इसमांनी घातक शस्त्राने भोसकून खून केला. त्यातून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खडकी बाजारपेठेत दिनांक २५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाच दुकाने चोरट्यांकडून फोडण्यात आली, अशा घटना आमदार शिरोळे यांनी निवेदनात नमूद केल्या आहेत.
अशा घटनांवर पोलीस प्रशासनाचे नियंत्रण नाही. बोपोडीतील जुन्या जकात नाक्यावर पोलीस चौकी असून ती सक्रीय नाही. तसेच, खडकी बाजार पोलीस चौकीसुद्धा सक्रीय नाही. त्याठिकाणी कोणतेही पोलीस अधिकारी किंवा पोलीस चौक्यांमध्ये बसलेले नसतात. तक्रार देण्यासाठी नागरिकांना खडकी पोलीस ठाण्यात जावे लागते त्यात नाहक त्रास सहन करावा लागतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन बोपोडी-खडकी पोलीस चौक्या सक्रीय कराव्यात, त्या चौक्या़मध्ये पोलीस दल वाढवावे आणि पोलीसांची गस्त वाढवावी, अशी नागरिकांची मागणी आहे. याबाबत योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर व्हावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी निवेदनात केली आहे.

