पुणे :मायभूमी महाराष्ट्रात आल्यावर माहेरी असल्याचा आनंद मिळतो.म्हणूनच या मातीची कायम ओढ असते,अशी भावना गुजरातमधून विधानसभेवर निवडून आलेल्या पहिल्या मराठी महिला आमदार संगीता पाटील यांनी व्यक्त केल्या.एम.आय.टी.च्या कार्यक्रमानंतर त्यांनी कात्रज भागातील उद्योजक सज्जनराव पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना तब्बल दीड वर्ष त्यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव खुप काही शिकवून गेला,असे सांगत आ.पाटील म्हणाल्या,की सुरतसारख्या शहरी भागातून प्रथमच निवडून येत असताना तेथील बहुसंख्येने असलेल्या मराठी जनतेने खुप मदत केली. भाजप सारखा पक्ष केंद्रातही सत्तेत आल्याने मतदारसंघात विकासकामे करताना खूपच आनंद मिळतो. आगामी सर्व निवडणुकीत विकास हा एकमेव मुद्दा चालेल,असे सांगतानाच आपल्या तरुणांच्या देशात सोशल मिडियाचा प्रभाव वाढल्याचेही त्यांनी सांगितले. गुजरातमध्ये असूनही मराठी-गुजराथी असा भेदभाव तेथे नसल्याचे सांगत जातीयवादाचा मुद्दा त्यांनी खोडून काढला.पुणे महापालिकेत भाजपची सत्ता येईल,असा विश्वास व्यक्त करतानाच आगामी गुजरात निवडणूकीत सुरत भागातील मराठी बांधवांना मला पुन्हा सहकार्य करण्याचे सांगावे,असे आवाहनही त्यांनी पुणेकारांना केले.
नगरसेवक अभिजित कदम,भाजपा खडकवासला म.सं.चे अध्यक्ष अरुण राजवाडे,डॉ.संजय यादव आदींनी आ.पाटील यांचे स्वागत केले.