पुणे: वाहतूक व्यवस्थेबरोबरच कचरा व्यवस्थापन ही पुणे शहरासमोर असलेली मुख्य समस्या असून कचरा व्यवस्थापनाचे खाजगीकरण करून त्याद्वारे बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून दिल्यास केवळ तीन वर्षात पुणे शहर ‘स्मार्ट’ झाल्याशिवाय रहाणार नाही; असा दावा विख्यात उद्योजक अरुण फिरोदिया यांनी केला.
दि इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स इंडिया पुणे केंद्राच्या हिरकमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या ‘पुणे स्मार्ट सिटी: सद्यस्थिती आणि आव्हाने’ या परिसंवादात ते बोलत होते. यावेळी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र जगताप यांनी ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाबाबत दृकश्राव्य सादरीकरण केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ गिरीश मुंदडा; मानद सचिव अविनाश निघोजकर; माजी सचिव वसंत शिंदे; डॉ सुरेखा देशमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
घन कचरा व्यवस्थापन ही पुणे शहरासमोर उभी ठाकलेली प्रमुख समस्या आहे. कचरा निर्मूलनाच्या समस्येवर प्रभावी उपाय करण्यात येणाऱ्या अडचणींमुळे शहर डेंग्यूसारख्या साथीच्या आजारांची राजधानी होऊ घातले आहे. सध्या महापालिका कचरा निर्मूलनासाठी प्रतिवर्ष ३ हजार ६०० कोटी रुपये खर्च करते. कचरा जमा करण्याच्या कामाचे खाजगीकरण केल्यास त्यातून बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होईल आणि हे काम अधिक कार्यक्षमतेने होऊन पुणेकरांचे आरोग्य सुरक्षित राहील. तेव्हाच खऱ्या अर्थाने शहर स्मार्ट झाल्याचे म्हणता येईल; असे मत फिरोदिया यांनी व्यक्त केले.
शहराभोवती ‘रिंग रोड’ करून त्याच्या आजूबाजूला ‘सॅटेलाइट सिटी’ विकसित करून शहराच्या वाढत्या लोकसंख्येचे विभाजन करावे; कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून नागरिकांना २० मिनिटांत अपेक्षित ठिकाणी पोहोचण्याची व्यवस्था व्हावी; घराजवळ चांगल्या शाळा उपलब्ध होऊन विद्यार्थ्यांची गळती थांबावी; शेतकऱ्यांना आपली उत्पादने थेट बाजारात आणता यावी; इलेक्ट्रीक व्हेईकलद्वारे प्रदूषण कमी व्हावे; अशा अपेक्षा फिरोदिया यांनी यावेळी व्यक्त केल्या.
पुणे होणार ‘फ्युचर रेडी’ शहर
‘५ जी’ तंत्रज्ञान उपलब्ध असलेले ‘फ्युचर रेडी’ शहर विकसित करण्याच्या उद्दीष्टाने पुण्याच्या विकासाचे नियोजन असून त्यासाठी १५ वर्षात ३१ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. महापालिका; राज्य आणि केंद्र सरकारसह कर्जरोखे आणि खाजगी गुंतवणुकीतून हा निधी उभारण्यात येईल; अशी माहिती डॉ जगताप यांनी यावेळी दिली. शहराचे जीवनमान उंचावण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेमध्ये असलेल्या विविध क्षेत्रातील प्रकल्पांची माहिती जगताप यांनी आपल्या सादरीकरणात दिली. वाहतूक समस्येतून मार्ग काढण्यासाठी रिंग रोडची सुविधा; २४ तास पाणी पुरवठा; प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ई व्हेइकल्सच्या वापराला प्राधान्य; कार्यक्षम सार्वजनिक वाहतुकीसाठी मेट्रोसह बी आर टी; पीएमपीएमएलचे सुनियोजित व्यवस्थापन करून शहरातील प्रवासाची कमाल वेळ ३० मिनिटांपर्यंत आणणे; यासह अनेक प्रकल्पांची सविस्तर माहिती जगताप यांनी दिली.
डॉ देशमुख आणि डॉ मुंदडा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मुख्य व्याख्यानांनंतर झालेल्या प्रश्नोत्तरांच्या सत्रात उपस्थित अभियंत्यांच्या प्रश्नांना वक्त्यांनी समर्पक उत्तरे दिली.
शुभांगी चिपळूणकर यांनी सूत्रसंचालन केले. निघोजकर यांनी आभार मानले.
स्वातंत्र्यापूर्वी पुणे होते स्मार्ट
स्वातंत्र्यपूर्व काळात पुणे शहर हे आरोग्यपूर्ण वातावरणासाठी विख्यात होते. मर्यादित लोकसंख्या; शुद्ध हवा; मुबलक पाणी; उत्तम शिक्षण; सायकलीच्या वापरामुळे प्रदूषणमुक्ती अशा परिस्थितीत तत्कालीन पुणे हे ‘स्मार्ट सिटी’ होते असे म्हणावे लागेल. पुण्याला हेच गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी कंबर कसणे हे सर्व पुणेकरांचे कर्तव्य आहे; असे आवाहन फिरोदिया यांनी या परिसंवादात केले.
…तर तीन वर्षात पुणे होईल ‘स्मार्ट’ : अरुण फिरोदिया
Date:

