- मिटसॉगच्या १६ व्या बॅचचा दिल्ली येथील १२ दिवसांचा राष्ट्रीय अभ्यास दौरा संपन्न
पुणे: “ राजकारणात स्वच्छ प्रतिमा असणे आवश्यक आहे. लोकांच्या मागण्या आणि त्यांच्या आकांक्षा ऐका. शासकीय योजनांचा पाठपुरवठा करून त्याचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा. दिवसातून एकदा तरी सोशल मिडियाचा वापर करा. कार्यक्रमाची रूपरेषा तयार करून त्याचे नियोजन करा. तसेच राजकारणात अंतिम लक्ष लोकांसाठी काम करणे आहे हे सदैव ध्यानात ठेवावे.” असा सल्ला शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या १६ व्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा नुकताच दिल्ली येथील राष्ट्रीय अभ्यास दौरा संपन्न झाला. या दौर्याचे नेतृत्व मिटसॉगचे प्राध्यापक परिमल सुधाकर आणि संकल्प संघई यांनी केले होते. तसेच, एमआयटी डब्ल्यूपीयूचे सल्लागार प्रा.डी.पी. आपटे हे ही उपस्थित होते. यामध्ये २२ विद्यार्थ्यांचा समावेश होता.
राहुल विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून राजकारणाचे प्रशिक्षण देणारी भारतातील पहिली संस्था एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटची स्थापना २००५ साली करण्यात आली. आतापर्यंत १५ बॅचचे विद्यार्थी राजकारण, समाजकारण, माध्यमे या सारख्या क्षेत्रामध्ये सक्रिय सहभाग घेऊन कार्य करीत आहेत.
या अभ्यास दौर्यात देश पातळीवरील राजकारणाची आणि सरकारची इत्यंभूत माहिती मिळविणे, संसदेचा कारभार, राजकीय पक्षांच्या कार्यालयाची भेट, राष्ट्रीय नेत्याशी संवाद साधणे या अभ्यास दौर्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. तसेच भारतीय निवडणूक आयोग, नीति आयोग, विविध मंत्रालये येथील अधिकार्यांशी संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली.
विद्यार्थ्यांनी बीकेयूचे मुख्य प्रवक्ता राकेश टिकैत, कर्नाटकचे राज्यसभा सदस्य सय्यद नासिर हुसेन, आयएनसी चे लोकसभा खासदार डॉ. मोहम्मद जावेद, कॉग्रेसचे भक्तचरण दास, डीएमकेचे लोकसभा सदस्य सिनथिल कुमार, लोकसभा सदस्य राजेंद्र अग्रवाल, खासदार सुजय विखे पाटील यांच्याशी चर्चा करून राजकारणात आल्यावर जनसेवा कशी करावी, आणि समाजन्नोतीसाठी कसे कार्य करावे यावर विशेष प्रकाश टाकला.
दिल्ली महिला आयोगच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांच्याशी भेट घेतल्यावर त्या म्हणाल्या की, सामर्थ्य म्हणजे मनाची अवस्था असते. आपण जेवढा विचार करतो तेवढे शक्तीशाली बनतो. अशा वेळेस अहंकार आड आला तर काहीच करू शकत नाही. प्रामाणिकपणा असेल, तेव्हाच जनतेला चांगला संदेश देऊ शकू. स्वतःतील भिती दूर केल्यानंतरच सिस्टमची भिती दूर करू शकतो. राजकारणात आत्मज्ञान आवश्यक आहे.
आयएनसीचे राज्यसभा सदस्य प्रतापसिह बाजवा म्हणाले, नेहमी उदात्त कर्मासाठी तयार रहा. राजकारण अनेक बलिदानांची मागणी करतो. तसेच या क्षेत्रात नेहमी लोकांचे आणि त्यांच्या मागण्या ऐका. चिरस्थायी संबंध बनविण्यासाठी मदत करा. या क्षेत्रात जनतेच्या भावना समजल्या पाहिजेत. आधुनिक राजकारणात आपल्याला नवीन तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रीत करावयास हवे. स्वतःमध्ये नेतृत्व गुणांचा विकास करा.
त्यानंतर ओडिशा बीजदचे सभासद सुजित कुमार, खासदार प्रमिला बिसोई, दक्षिण गोवा येथील खासदार फ्रान्सिको सरडिन्हा, खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांची भेट घेऊन वर्तमान काळात राजकारणात चालणार्या गतीविधी विषयावर चर्चा केली.
यापूर्वी विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा, झारखंडच्या खासदार अन्नपूर्णा देवी यादव, एनआयसीच्या माजी अध्यक्षा अलका लांबा, खासदार रमा देवी, समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ता घनश्याम तिवारी, राष्ट्रवादीचे राज्यसभा सदस्या फौजिया खान, भारत कृषक समाजाचे नेते किशन बीर चौधरी, राज्यसभेचे खासदार विवेक तंखा, सीपीआयचे नेता डॉ. कन्हैया कुमार, खासदार संगीता कुमारी सिंह देवी, आपचे आमदार आतिशी कालकाजी ,ओडिसाचे खासदार चंद्रशेखर साहू, आपचे राज्यसभेचे खासदार संजय सिंग, कॉग्रेसचे जेष्ठ नेता गुलाम नबी आझाद, सेंट्रल ब्यूरो इन्व्हिेस्टिगेटिव्ह आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाला विशेष भेट देऊन तेथील कार्य पद्धती समजून घेतली. राजकारणात आत्मज्ञान आवश्यक आहे. त्याच प्रमाणे राजकारणातून समाजकारण कसे करता येईल या वर विचार ऐकले.

