जगाला शांती व मानवतेचा संदेश देणारे विश्वधर्मी श्रीराम मानवता भवन उभारावे -नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय गोलमेज परिषदेत एकमुखी मागणी
दिल्ली- अयोध्येतील राम जन्मभूमीच्या 2.77 एकर जागेवर भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर उभारण्यात यावे, असा ठराव सोमवारी नवी दिल्ली येथे रामजन्मभूमी- बाबरी मस्जिद विवादावर सर्वमान्य तोडगा शोधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय गोलमेज परिषदेत एकमुखाने पारित करण्यात आला. अयोध्येतील उर्वरित म्हणजे 67 एकर जागेवर संपूर्ण जगाला शांती आणि मानवतेचा संदेश देणारे विश्वधर्मी श्रीराम मानवता भवन उभारण्यात यावे, असे सर्वानुमते ठरविण्यात आले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे, भारत यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून रामजन्मभूमी- बाबरी मस्जिद विवादावर सर्वमान्य तोडगा शोधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय राष्ट्रीय गोलमेज परिषदेत अनेक महत्वपूर्ण प्रस्ताव पारित करण्यात आले, असे एमआयटी विश्व शांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी सांगितले.
या वेळी राम जन्मभूमि न्यासाचे माजी कार्यकारी अध्यक्ष डॉ. राम विलास वेदांती, माजी केंद्रीय मंत्री अरिफ मोहम्मद खान, संगणक तज्ज्ञ व नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ. विजय भटकर, ज्येष्ठ पत्रकार डॉ. वेद प्रताप वैदिक, माजी आमदार स्वामी अग्निवेश, प्रसिद्ध विचारवंत फिरोज बख्त अहमद, सर्व धर्मीय विद्वान मौलाना वहिदुल्ला खान अन्सारी-चतुर्वेदी, केंद्र सरकारचे माजी सचिव डॉ. कमल तावरी, एम.एस. रामैया विद्यापीठाचे कुलपती डॉ. एम. आर.जयराम, प्रसिद्ध पत्रकार विजय नाईक व ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर, थोर विचारवंत श्री. इझीकेल इसाक मालेकर, संस्कृतचे गाढे अभ्यासक पं.वसंतराव गाडगीळ, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण, डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे हे उपस्थित होते.
तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, एमआयटी आर्ट, डिझाईन अॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश तु. कराड, श्री. काशीराम दा. कराड व माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहाच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा कराड-नागरे हे उपस्थित होते.
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “अयोध्येतील 2.77 एकर जागेवर प्रभू श्रीरामचंद्राचे भव्य मंदिर उभारल्यानंतर उर्वरित 67 एकर जागेवर हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, जैन यासह अन्य धर्मस्थळांच्या प्रार्थना भवनाचा समावेश असलेले विश्वधर्मी श्रीराम मानवता भवन उभारण्यात यावे. येथून आपण जगाला विश्वशांतीचा आणि मानवतेचा संदेश देऊ शकू असा प्रस्ताव सुद्धा पारित करण्यात आला.”
“ राम जन्मभूमी-बाबरी मश्जिद वादावर सर्वमान्य तोडगा काढण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय पातळीवर समिती स्थापन करण्यात यावी. यामध्ये सर्व धमार्ंच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात यावा. अशी मागणी यावेळी परिषदेत करण्यात आली. अयोध्येतील उर्वरित 67 एकर जागेवर विश्वधर्मी श्रीराम मानवता भवन उभारण्यासाठी राष्ट्रीय न्यासाची स्थापना करण्यात यावी. या न्यासाच्या अध्यक्षपदी केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार यांनी संयुक्तपणे निवड करावी. यामध्ये सरकारी प्रतिनिधी, विविध धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षण, साहित्य, कला, विज्ञान, इतिहास, कायदा, समाजसेवा व तत्वज्ञान इ. क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश करण्यात यावा. असे मान्य करण्यात आले.”
विश्वधर्मी श्रीराम मानवता भवनाच्या माध्यमातून अयोध्या हे मानवता आणि संस्कृतीचे केंद्र म्हणून जगाच्या नकाशावर येईल. भविष्यात भारतीय संस्कृती, परंपरा, तत्वज्ञान आणि मानवतेचा संदेश देता येईल. 21व्या शतकात भारत देश जगाला सुख, समाधान आणि शांतीचा संदेश देईल व भारत विश्व गुरू म्हणून उदयास येईल असे प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी स्पष्ट केले.
दिवसभर चाललेल्या एक दिवसीय गोलमेज परिषदेत उपस्थित मान्यवरांनी देशाच्या हितासाठी हा वाद संपवावयास हवा, संवादाच्या माध्यमातून हिंदू-मुस्लिम समाजातील तेढ कमी करणे, सर्वधर्मींयानी एकत्र येणे, प्रेम आणि बंधुभाव निर्माण करणे, जात, धर्म आणि भाषा यामधील दरी कमी करणे, सर्व धर्मांचा आदर करणे आणि विश्वधर्मी श्रीराम मानवता भवन अशा विविध मुद्यांवर विचार मांडले.
डॉ.एस.एन.पठाण यांनी या राष्ट्रीय गोलमेज परिषदेच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. प्रा. राहुल विश्वनाथ कराड यांनी स्वागतपर भाषण केले. प्रा. डॉ. मिलिंद पांडे यांनी दिल्ली डिक्लेरेशनचे वाचन केले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.