स्वराज्य आहे पण सुराज्य बनवणारी पिढी घडायला हवी – महापौर मुक्ता टिळक यांचे प्रतिपादन ; एमआयटीचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
पुणे: “ आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे, हे ओळखून एमआयटीने तंत्रज्ञानावर भर देत ३५ वर्षांचा टप्पा गाठला. सोबतच विज्ञानाविषयी आस्था, देशाविषयीचे प्रेम आणि अध्यात्माची साथ घेऊन हा प्रवास सुरू आहे. आजच्या स्वराज्याला सुराज्य बनवणारी पिढी नक्कीच या संस्थेतून घडेल,” असे प्रतिपादन महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केले.
माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समुहातर्फे एमआयटीचा ३५ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
याप्रसंगी एमआयटीचे संस्थापक विश्वस्त प्रकाश जोशी, माईर्स एमआयटीचे सचिव प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, कोषाध्यक्ष डॉ. सुनिल कराड, कार्यकारी संचालिका डॉ. स्वाती कराड – चाटे, एमआयटीचे कुलसचिव नाना कुलकर्णी, अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे, प्राचार्य डॉ.एल.के.क्षीरसागर व ( ग्रुप कॅप्टन ) डी. पी. आपटे आदी उपस्थित होते.
एमआयटीच्या ३५ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून संस्थेच्या वाटचालीत महत्वाचे योगदान देणार्या दहा कर्मचार्यांचा महापौरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये प्रा. प्रकाश माईणकर, श्री. पांडुरंग कदम, प्रा. महेश चोपडे, प्रा. अमर मोरे, श्री. दयानंद घंटे, डॉ. रोहिणी गायकवाड, श्री. गिरीश दाते, श्री. नागनाथ सानप, श्री. बी. संगप्पा यांचा ‘ एमआयटी फाउंडेशन डे ’ पुरस्काराने सन्मान केला गेला.
मुक्ता टिळक म्हणाल्या, “ तंत्रज्ञानाचा वापर करून आज आपण प्रगतीपथावर आहोत. मात्र याच तंत्रज्ञानामुळे आज भारतासह ऊनेक देशांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. आज त्या सामाजिक प्रश्नांचा विचार करून एमआयटीने अध्यात्माची सोबत धरली आहे. टिळकांच्या स्वप्नातील सुराज्य बनवणारी पिढी या संस्थेत पाहावयास मिळते आहे. सोबतच भगवान बुद्धांनी दिलेली शाश्वत विकासाची शिकवणही येथेच दिसते. आपल्याला घडविण्यात आपल्या पालकांचा जितका वाटा असतो, तितकाच किंबहुना त्याहून कैकपटीने जास्त शिक्षकांचा व पर्यायाने संस्थेचा असतो. ”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “ ज्यावेळी ही संस्था निर्माण झाली, त्यावेळी या संस्थेतून नोबेल लॉरेटस निर्माण व्हावेत ही भावना होती. ती आजही आहे. मात्र त्यावेळी उद्घाटनासाठी आलेल्या पंतप्रधान चंद्रशेखर यांनी सांगितले होते, की या संस्थेतून नोबेल लॉरेट्स सोबतच संत ज्ञानेश्वर निर्माण व्हायला हवेत. भारताला नेहमीच आदर्शांची उज्ज्वल परंपरा आहे. त्या परंपरांचा येथे आदर आणि अनुकरणही होते. स्वामी विवेकानंदांनी जे शब्द भारतभूमीबद्दल काढले होते, ते शब्द सत्यात उतरवण्यासाठी सर्वांचेच योगदान गरजेचे आहे. ”
डॉ. मंगेश कराड म्हणाले, “ आज समाजावर चांगला परिणाम करणारे विद्यापीठ असणे आवश्यक आहे. ते काळाप्रमाणे बदलणारे आणि सोबतच आपल्या परंपराचा वारसा जपणारे असावे. एमआयटी ही खर्या अर्थाने वैश्विक शांतीचा वसा जपणारी संस्था आहे. ”
डॉ. सुनिल कराड म्हणाले, “ कोणतीही संस्था तेथील प्रशासकीय यंत्रणेमूळे मोठी होत नाही. तर तेथील शिक्षकच त्या संस्थेला घडवितात. एमआयटीचा पाया रोवणारी सगळीच मंडळी शिक्षक होती. त्यामूळे एमआयटीरूपी रोपाचा आज एवढा विस्तार झाला आहे. ”
डॉ. रोहिणी गायकवाड, प्रा. शोभना आनंद, प्रा. बी. संगप्पा, प्रा. महेश चोपडे, प्रा. सानप, गिरीश दाते यांनी सत्काराला उत्तर देताना आपले मनोगत व्यक्त केले.
प्रा. अतुल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. एल. के. क्षिरसागर यांनी आभार मानले.