पुणे- “लोकसंख्यावाढीबाबत सामाजिक व राजकीय पातळ्यांवर बोलले जाते. शिवाय जैविक पातळीवर मात्र चर्चा केली जातच नाही. अशी चर्चा झाल्यास लोकसंख्या वाढीचा भस्मासूर रोखण्यास मदत होईल.” असे मत सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी व्यक्त केले. लोकसंख्या अभियानद्वारा लोकसंख्या वाढ : शाप की वरदान या विषयावर आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिवर्सिटीचे अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड, मेजर जनरल शशिकांत पित्रे, माईर्स एमआयटीचे संस्थापक सहविश्वस्त प्रा.प्रकाश जोशी, एमआयटीचे प्राचार्य डॉ. एल.के. क्षीरसागर, प्रा.सुधीर राणे, मिटसॉम कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर.एम.चिटणीस, प्रा. आबाळे आणि प्रा. देवरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये एमआयटी फार्मसी कॉलेजची विद्यार्थिनी श्रद्धा हकानी हिला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. तिला 15 हजार रुपये रोख व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. मिटकॉम कॉलेजची विद्यार्थिनी निशा भंडारीस द्वितीय पारितोषिक मिळाले. तिला 10 हजार रोख व प्रशस्तीपत्र देण्यात आले. तृतीय पारितोषिक एमएसीएस कॉलेजची मान्या सिंगला मिळाले. 5 हजार रुपये रोख व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
विश्वंभर चौधरी म्हणाले, “जो वक्ता आपल्या भाषणाची सुरूवात खर्जात करून त्याचा शेवट तार सप्तकात करतो तोच वक्ता उत्तम ठरतो. भाषणासाठी आशय आणि अभिव्यक्ती हे दोन अत्यंत महत्त्वाचे घटक असले, तरी भाषण श्रवणीय असणे अत्यंत आवश्यक आहे. भाषणाच्या वेळी काही तंत्रे पाळावी लागतात. सभागृहाची व्याप्ती बघुन आपला आवाजाची उंची ठरवावी लागते. समोर असणार्या माईकशी 20 सेकंदामध्ये जो जुळवून घेऊ शकतो तोच प्रेक्षकांशी उत्तम संवाद साधू शकतो. कित्येकदा आशय भरपूर असतो पण अभिव्यक्तीमध्ये काही जण कमी पडतात. तर काही ठिकाणी ही परिस्थती उलटी पाहायला मिळते.”
शशिकांत पित्रे म्हणाले, “आजच्या विद्यार्थ्यांनी संवाद साधण्याची कला आत्मसात करणे गरजेचे आहे. तसेच सकारात्मक विचार, स्वयंप्रेरणा आणि वेळेचे नियोजन करणे देखील तितकेच आवश्यक आहे.”
प्रा. प्रकाश जोशी म्हणाले, “जोपर्यंत महिलांमध्ये शिक्षणाबाबतीत जागरुकता निर्माण होत नाही, तोपर्यंत लोकसंख्येसारख्या विषयावर जनजागृती होणार नाही. शासनाद्वारा कुटुंब नियोजनासाठी दिला जाणारा निधी जर 4 हजारावरून 20 हजार रुपये केला तर नक्कीच काही सकारात्मक बदल दिसून येतील.”
कुमार यश यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सुधीर राणे यांनी आभार मानले.