विद्यार्थ्यांनी सृजनशील,भावनात्मक व आध्यात्मिक असावे. कुलगुरू डॉ.संजय कुमार
पुणे,दि.20ः“स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. या वाक्यानुसार विद्यार्थ्यांनी सदैव सृजनशील, भावनात्मक आणि अध्यात्माची कास धरून अध्ययन करावे. एंटरप्रायजेस, नॉस्टॅल्जिक, जीनियस, इंटेलिजन्ट आणि एनर्जेटिक या शब्दांचा अर्थच इंजिनियर असा होतो.”असे उद्गार रायपूर येथील इन्स्ट्ट्यिूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयटीएम) चे कुलगुरू डॉ.संजय कुमार यांनी काढले.
डॉ.विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी(एमआयटी डब्ल्यूपीयू) तर्फे बी.टेकच्या गोल्डन स्कॉलर बॅचच्या अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष 2017-18 चा शुभारंभ डॉ.संजय कुमार यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ.विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष डॉ.विश्वनाथ दा.कराड हे होते. पुण्यातील कमिन्स कंपनीच्या सृजनशीलता आणि परिपूर्णता यांच्या संशोधन केंद्राच्या संचालिका डॉ.अनुराधा गणेश, ब्ल्यूपालचे फाउंडर आणि सीईओ राजू मंथना, टीसीएस पुणे सेंटरचे प्रमुख सचिन रत्नपारखी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
डॉ.विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा.राहुल कराड, कुलगुरू डॉ.जय गोरे, माईर्स एमआयटीचे संस्थापक विश्वस्त प्रा.प्रकाश जोशी, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, रजिस्टार प्रा. डी.पी. आपटे, डॉ.एल.के.क्षीरसागर आणि डॉ.आर.व्ही पुजेरी हे उपस्थित होते.
डॉ.अनुराधा गणेश म्हणाल्या,“ गणित ही इंजिनिअरिंगची भाषा आहे. म्हणून ही मूलभूत भाषा तुम्ही आत्मसात केली पाहिजे. अर्थात या ज्ञानाला नीतिमत्तेची जोड हवी. हे कार्य एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये निश्चितच घडेल. त्यातून एक गुणवान विद्यार्थी तयार होईल.”
राजू मंथना म्हणाले,“वेगळे विचार आणि कठोर मेहनत या दोन गोष्टींच्या आधारे विद्यार्थी आपल्या जीवनात प्रत्येक पावलावर यशस्वी होऊ शकतो. डब्ल्यूपीयू मध्ये विद्यार्थी फक्त चार वर्षांची गुंतवणूक करून संपूर्ण आयुष्यासाठी शिदोरी बांधून घेत असतो. तुमचे विचारच तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे बनवतील. त्यामुळे क्षणा-क्षणाला शिकण्याचा आनंद घ्या.”
सचिन रत्नपारखी म्हणाले,“ शिकण्याची आवड, समर्पित भावना, संवाद कौशल्य, सादरीकरण, एकरूपता, सकारात्मक विचार आणि निर्धारित लक्ष्य ठेवल्यामुळे विद्यार्थी सदैव यशस्वी होतो.”
प्रा.डॉ.विश्वनाथ दा.कराड म्हणाले,“ स्वतःला स्वर्णिम बॅचचा विद्यार्थी म्हणून घ्यावयाचे असेल, तर त्यासाठी विद्यार्थ्यांनी शिस्त आणि चारित्र्या या दोन गोष्टींवर विशेष भर द्यावा. ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्म या तिन्ही गोष्टींच्या आधारे येथे शिक्षण दिले जाईल. येथे विद्यार्थ्यांना शारीरिक, मानसिक, बौद्धिक व आत्मिक अशा सर्व दृष्टीने विकसित करण्यात येईल. पालकांच्या आशा-अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रत्येक विद्यार्थ्याला प्रयत्न करावे लागतील.”
प्रा.शरदचंद्र दराडे पाटील म्हणाले,“ एमआयटी या शब्दाचा अर्थ शिस्त, संशोधन, निर्मिती क्षमता, सृजनशीलता, खिळाडूवृत्ती, योग एवढेच नव्हें, तर राष्ट्रीय भावना असा आहे. प्रत्येक गोष्टीत परिवर्तन होतांना दिसत आहे, फक्त एक गोष्ट बदलेली नाही ती म्हणजे गुणवत्तेचे महत्व.”
डॉ. जय गोरे म्हणाले,“विद्यार्थी सदैव उत्साही व ध्येयवादी असावा. त्याचप्रमाणे जीवनात सदैव विद्यार्थीच असावेे. गोल्डन बॅचमध्ये नवा प्रयोग करतांना प्रत्येक वर्गात दोन शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतील.”
प्रा.राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“ येथे 28 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासंबंधी विचारणा केली. 19 हजार विद्यार्थींनी प्रत्यक्षात फॉर्म भरले होते. त्याचप्रमाणे या वर्षी भारतात प्रथमच योग या विषयाचा पाठ्यक्रमात समावेश केला गेला आहे.”
डॉ.एल.के.क्षीरसागर यांनी या सोहळ्याची पार्श्वभूमी स्पष्ट केली. डॉ.आर.व्ही पुजेरी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.सुहासिनी देसाई यांनी आभार मानले.