पुणे : “प्रत्येकाला निसर्गदत्त प्रतिभा असते, पण ती त्याला जाणवली पाहिजे. शिवाय तंत्रज्ञानाचा उपयोग अर्थात बाजारपेठेनुसार तंत्रज्ञानाचे संशोधन आवश्यक आहे.” असे उद्गार मुंबई येथील रिलायन्स इनोव्हेशन्स अॅण्ड इंटर ऑपरॅबिलिटीच्या टेस्ट लॅब्ज रिलायन्स जिओचे महाव्यवस्थापक डॉ. मुनीर सय्यद यांनी काढले. माईर्स एमआयटी पॉलिटेक्निक, पुणे व आयएफईआरपी यांंच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन्स इन इंजिनिअरिंग (आयसीटीआयई- 2016) च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
चांद्रयान 1 चे लिक्विड प्रॉपल्शन सिस्टिमचे आणि मार्स ऑर्बिटर मिशनचे शास्त्रज्ञ डॉ. बी. के. वेंकटरामू हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
माईर्स एमआयटीचे सचिव व कार्यकारी संचालक प्रा.डॉ. मंंगेश तु. कराड, हैद्राबाद येथील डीआरडीओच्या मिसाईल टेक्नॉलॉजी आरसीआयचे शास्त्रज्ञ डॉ.वरप्रसाद, फोटॉनिक्सच्या क्षेत्रातील 2015चे सर्वोत्कृष्ठ शास्त्रज्ञ पुरस्कार विजेते डॉ.पी.व्ही.श्रीकांत, माईर्स एमआयटी पॉलिटेक्निकच्या प्राचार्या प्रा.आर.एस.काळे आणि माईर्स एमआयटी पॉलिटेक्निकच्या ई अॅण्ड टीसीच्या विभागप्रमुख प्रा. ए.ए. बकरे हे उपस्थित होते.
डॉ. मुनीर सय्यद म्हणाले, “अलिकडे वैयक्तिकरित्या संशोधन करणे कालबाह्य झाले आहे. आपण एक गट तयार केला पाहिजे. त्यातूनच संयुक्तरित्या नव्या कल्पनांचा उगम होतो. अर्थात या गटाच्या बाहेरचा एखादा सदस्य या चिंतनप्रक्रियेत भर घालू शकतो आणि त्या संयुक्त निर्मितीलाही व्यावसायिक दिशा ही देऊ शकतो.”
डॉ. बी.के. वेंकटारामू म्हणाले, “इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्त्रो) यांच्यापुढे आव्हान उभे राहिले होते. कारण अमेरिकेने तंत्रज्ञान देण्यास नकार दिला होता. आम्ही संपूर्ण भारतीय तंत्रज्ञान उभे करू शकलो. त्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि अनेक अपयशांचा सामना आम्हाला करावा लागला. आज आम्ही मंगळावरसुध्दा यान पाठवू शकलो आणि ते ही अतिशय कमी खर्चात. ही क्षमता आम्ही आज प्राप्त केली आहे. कारण इस्त्रो ही एकजीव अशी संघटना आहे. त्यातील प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे.”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “भारतीय आणि पाश्चात्य शास्त्रज्ञांनी मानवतेच्या सुखासाठी खूप काही केले आहे. अर्थात याला आध्यात्मिकतेची जोड हवी.”
आपल्या प्रास्ताविक भाषणात प्रा.डॉ. मंगेश तु. कराड म्हणाले, “सध्या कोणतेही तंत्रज्ञान अतिशय कमी काळात कालबाह्य होते. म्हणून आपण सतत अद्ययावत असले पाहिजे.”
प्रा.डॉ. आर.एस.काळे यांनी परिषदेच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. प्रा. नेहा जोशी यांंनी सूत्रसंचालन केले. प्रा.ए.ए.बकरे यांनी आभार मानले.

