पुणे: विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारततर्फे रामेश्वर (रूई),ता.जि. लातूर येथे उभारण्यात आलेल्या व मानवता आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणार्या ‘तथागत भगवान गौतम बुद्ध विहार व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विश्वशांती स्मृतिभवनाचा लोकार्पण सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. हा लोकार्पण सोहळा भगवान गौतम बुद्ध जयंतीचे औचित्य साधून बुधवार, दि.१० मे २०१७ रोजी सकाळी ८.१५ वा. रामेश्वर (रूई), ता.जि. लातूर येथे होणार आहे.
या समारंभासाठी केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री ना.श्री.नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री ना.श्री. रामदास आठवले, केंद्रीय ग्राहक व्यवहार, खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्री ना. श्री. रामविलास पासवान, माजी केंद्रीय गृहमंत्री श्री. सुशीलकुमार शिंदे, जम्मू-काश्मीर विधान परिषदेचे उपसभापती श्री. जहांगीर हुसेन मीर हे सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तसेच, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. संभाजीराव पाटील निलंगेकर, केंद्रीय नियोजन मंडळाचे माजी सदस्य व खासदार डॉ. नरेंद्र जाधव, अयोध्या येथील रामजन्मभूमी न्यासाचे माजी कार्याध्यक्ष व माजी खासदार डॉ. राम विलास वेदांती, लातूरचे खासदार डॉ. सुनील गायकवाड, लातूर येथील विवेकानंद हॉस्पिटलचे संचालक डॉ. अशोक कुकडे, सांची विद्यापीठाचे कुलगुरू आचार्य डॉ. यज्ञेश्वर एस.शास्त्री, माजी खासदार श्री. गोपाळराव पाटील आणि श्री. महंत रामदास हे विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे, महाथेरो भंते उपगुप्त प्रमुख, पूर्णा बुद्ध विहार, नांदेड, भंते कश्यप, भंते धम्मसेन, भंते नागघोष, बौध्द धर्माचे प्रतिनिधी या समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत.
रामेश्वर (रूई), येथे जगातील महान शांतिदूत भगवान गौतम बुद्ध यांच्या नावाने पॅगोडा शैलीतील तथागत भगवान गौतम बुद्ध विहार व भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विश्वशांती स्मृतिभवन उभारण्यात आले आहे. भगवान गौतम बुद्धांची भव्य मूर्ती व त्यांच्या पुढे विश्वरत्न युगपुरूष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा अशी या वास्तूची अनोखी रचना आहे. सदरील भगवान गौतम बुद्ध विहारामध्ये गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग व बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान चित्ररूपात प्रदर्शित केले आहे. अशा प्रकारची आगळीवेगळी रचना असेलेले कदाचीत भारतातील हे एकमेव स्मृतिस्थळ असेल.



