पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये इंटरनेट ऑफ थिंग्जचा वापर स्मार्ट लायटिंग, वाहतूक व्यवस्थापन, पार्किग आदी ठिकाणी केला जाईल. त्याच प्रमाणे २४ तास वॉटर सप्लायच्या व्यवस्थापनपासून शाळा, हॉस्पिटल या ठिकाणाच्या नियंत्रणासाठी याचा वापर केला जाईल. सर्वांवर नजर ठेवण्यासाठी सर्व प्रणाली आणि उपकरण सेन्सरशी जोडलेले असेल.असे विचार युके येथील आयईटीचे सचिव व्यंकटेशा पेरूमल यांनी व्यक्त केले.
माईर्स एमआयटी आर्ट, डिझाईन अॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणेतर्फे, लोणी काळभोर येथे आयोजित इंटरनेट ऑफ थिंग्ज अॅण्ड अॅप्लिकेशन फॉर स्मार्ट सिटी या विषयावरील दुसर्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी एमआयटी आर्ट, डिझाईन अॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे उपाध्यक्ष प्रा.डॉ.मंगेश तु.कराड, मुंबई येथील टीसीएसचे संचालक गिरीश दांडिगे, बंगलोर येथील थिंग अॅण्ड इंक एज्युकेशन रिसर्च फाउंडेशनच्या आर अॅण्ड डी चे संचालक प्रा.बी.ए.पाटील, मनोजसिंग चव्हाण, एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या आयसीटीचे संचालिका प्रा.एस.एम.कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलसचिव महेश देशपांडे, एमआयटी पॉलिटेक्निकच्या प्राचार्या रोहिणी काळे व प्रा. ए.ए.बकरे हे उपस्थित होते.
व्यंकटेशा पेरूमल म्हणाले, इंटरनेट ऑफ थिंग्ज हे असे तंत्रज्ञान आहे, ज्यामुळे स्मार्ट सिटीत आपल्या घरापासून, हॉस्पिटल, शाळा, कॉलेज, वाहतूक नियंत्रणाला उपकरणाद्वारे नियंत्रण केले जाईल. म्हणजेच, संपूर्ण शहराचे नियंत्रण या उपकरणाद्वारे होईल. संपूर्ण विश्वामध्ये इंटरनेट ऑफ थिंग्ज ही नवी बाजारपेठ पुढे येत आहे. अशा वेळेस भारतात स्मार्ट सिटी प्रकल्पात आयटी उद्योगांसाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे. शिक्षण, वैद्यकीय सेवा, आरोग्य, मनोरंजन या क्षेत्रात इंटरनेट महत्वपूर्ण आहे, हे सिद्ध होत आहे.
गिरीश दांडिगे म्हणाले, माहितीची देवाण-घेवाण करणे हा इंटरनेटचा मुख्य उद्देश आहे. संपूर्ण जगात भारत हा युवकांचा देश आहे. आपल्या देशाचे सरासरी वय ३५ वर्षे आहे. त्यामुळेच भारत तंत्रज्ञान आणि आर्थिक क्षेत्रात प्रगती करीत आहे. तंत्रज्ञानाने मानवाला सुख मिळू शकते. दांडिगे यांनी उदाहरण देतांना सांगितले की, नासिकच्या कुंभमेळ्यात तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे येथे कोणत्याही प्रकारची विपरीत घटना घडली नाही. याउलट अलाहाबाद येथील कुंभमेळ्यात पहिल्या दिवशी ९६ हजार लोग हरवले होते. यामुळे हे सिद्ध होते की, आधुनिक तंत्रज्ञानामधील इंटरनेट तंत्रज्ञान हे मानवाच्या कल्याणासाठी आहे.
प्रा.डॉ.मंगेश तु.कराड म्हणाले, मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या १०० स्मार्ट सिटीजमध्ये पुणे शहराचे नाव समाविष्ठ आहे , ही आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यामुळे पुढील ५ ते १० वर्षामध्ये स्मार्ट सिटीत मोठ्या प्रमाणात परिवर्तन होईल. येथील विद्यार्थी ज्या नव्या कल्पना घेवून पुढे येत आहेत, त्याचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठीच होईल. विद्यार्थ्यांची नवी कल्पना समाजाला सुंदर बनवीत आहे. राष्ट्र उभारणीसाठी एमआयटी शिक्षण संस्था एक महत्वपूर्ण कार्य करीत आहे.
येथे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत देश-विदेशातील ३२५ संशोधनपर निबंधांपैकी १२१ निबंध सादर करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल, गुजरात, तमिळनाडूसहित अन्य राज्यातील विद्यार्थी सहभागी झाले होते. त्याच प्रमाणे सौदी अरेबिया, इजिप्त,अबू धाबी आणि फिलिपाईन्स देशातील विद्यार्थ्यांनी आपले संशोधनपर निबंध सादर केले.
प्रा. आर.एस.काळे यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनामागची भूमिक स्पष्ट केली. नेहा जोशी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अनुराधा बाकरे यांनी आभार मानले.