पुणे- माईर्स एमआयटी शिक्षण समूहा अंतर्गत बार्शी, जि. सोलापूर येथे‘एमआयटी कॅालेज अॅाफ रेल्वे इंजिनिअरींग अॅण्ड रिसर्च’ या अभिनव स्वरूपाच्या रेल्वे अभियांत्रिकी महाविद्यालयाची सुरुवात शैक्षणिक वर्ष 2017-18 मध्ये जुन-जुलै दरम्यान होणार आहे. सदरील रेल्वे अभियांत्रिकी महाविद्यालयास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने नुकतीच मान्यता दिलेली असून, हे भारतातील पहिले रेल्वे अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय असणार आहे.
आजवर आपल्या संपूर्ण भारत देशातील रेल्वेच्या प्रगतीचा व विकासाचा विचार करता रेल्वे अभियंत्यांचेे योगदान अत्यंत मोलाचे व महत्त्वपूर्ण राहिलेले आहे. भारताची प्रचंड लोकसंख्या आणि विशाल भौगोलिक क्षेत्र लक्षात घेता, भारतीय रेल्वे व्यवस्था या पुढेही सुधारणे व ती आधुनिक करणे आवश्यक आहे. जेणेकरून रेल्वेचे जाळे देशातल्या काना-कोपर्यात आणि दुर्गम प्रदेशांमध्ये पोहोचू शकेल. वेगवान इंजिने, सुरक्षित प्रवासी वाहतूक, विनाविलंब माल वाहतूक या गोष्टी सुलभ होण्यासाठी रेल्वे तंत्रज्ञान व व्यवस्थापन यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा व आधुनिकीकरण करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने भविष्यकाळामध्ये रेल्वे इंजिनिअरिंग व्यवस्थापनामध्ये व्यापक सुधारणा करण्याच्या दृष्टीने उच्चविद्याविभूषित आणि प्रशिक्षित रेल्वे अभियंत्यांची नितांत गरज आहे. देशामधील अनेक शहरांमध्ये झपाट्याने मेट्रो रेल्वेचा विकास होत आहे. अशाप्रकारचेे प्रकल्प हाताळण्यासाठी प्रशिक्षित अभियंत्यांची आवश्यकता आहे.
ब्रिटीश राजवटीत सुरु झालेल्या रेल्वे व्यवस्थेमध्ये वेगमर्यादा, सुविधा, कंपन, सिग्नलिंग, देखभाल व इतर बाबींमध्ये ज्या प्रमाणात सुधारणा होणे अपेक्षित होते, त्या दुर्दैवाने झाल्या नाहीत व रेल्वेची एकंदर अवस्था ही एक काळजीची बाब बनून राहिली आहे. या उलट इतर प्रगत देशात रेल्वे व्यवस्था इतकी प्रगत आणि परिणामकारक आहे की, बरेचसे प्रवासी विमान प्रवासापेक्षा रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात.
आज देशभरात रेल्वेचे साधारणपणे 1,20,000 किलोमिटरचे जाळे पसरलेले असून, रेल्वे व्यवस्थेमध्ये सध्या सुमारे 14 ते 15 लाख लोकांना रोजगार पुरविणारी भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठी सार्वजनिक व्यवस्था मानली जाते. साहजिकच, ही संख्या संपूर्ण देशातील सर्वात मोठी संख्या आहे. रेल्वे व्यतिरिक्त रेल्वेच्या असंख्य कारखाने व प्रकल्पांसाठी प्रशिक्षित रेल्वे अभियंत्यांची गरज आहे.
आजमितीला जगभर रेल्वे इंजिनिअरिंग आणि प्रशिक्षण या विषयांमध्ये अनेक अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत, जिथे असे वैशिष्ठ्यपूर्ण अभ्यासक्रम चालवले जातात. एकट्या चीन देशामध्ये 80 च्यावर अशा प्रकारचे अभ्यासक्रम चालवले जातात. याउलट भारतामध्ये एरोस्पेस इंजिनिअरींग, एरॉनॉटिकल इंजिनिअरिंग, मरिन इंजिनिअरिंग इ. विशिष्ट कार्यक्षेत्राशी निगडीत अभ्यासक्रम शिकविले जात असूनसुद्धा, रेल्वे इंजिनिअरिंग सारखा अत्यंत महत्त्वाचा अभ्यासक्रम आजपर्यंत पदवीस्तरावर सुरू झाला नाही, ही खेदाची बाब आहे.
‘रेल्वे इंजिनिअरिंग’ (रेल्वे अभियांत्रिकी) ही एक सर्वसंपन्न अशी विद्याशाखा आहे, जिच्यामध्ये रेल्वे व्यवस्थेशी संबंधित आराखडा, बांधकाम/निर्मिती आणि ऑपरेशन या बाबींचा समावेश आहे. या विद्याशाखेत सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इंडस्ट्रियल आणि प्रॉडक्शन इंजिनिअरिंग अशा विविध शाखा सम्मिलित आहेत. भविष्यात येणार्या नव्या आव्हानांना, तंत्रज्ञानाच्या विकासाला आणि सामाजिक, आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय संबंधांना आपण जसजसे सामोरे जाऊ तसतसे रेल्वे व्यवस्था अभियांत्रिकी (Railway Systems Engineering) ही एक अत्यंत अत्यावश्यक विद्याशाखा म्हणून आपल्यासमोर उभी राहणार आहे. अर्थातच, उच्च विद्याविभूषित पदवीधारक, पदव्युत्तर पदवीधारक आणि पीएच.डी. पदवीधारक व संशोधक या सर्वांची देशाला अत्यंतिक गरज भासणार आहे.
केवळ भारतातच नव्हे, तर जगभर सातत्याने विकसित होणार्या रेल्वे व्यवस्थेला जास्तीत जास्त कुशल मनुष्यबळ पुरविणे ही काळाची गरज ‘एमआयटी कॅालेज अॅाफ रेल्वे इंजिनिअरींग अॅण्ड रिसर्च’ तर्फे पूर्ण केली जाईल. या महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या अभियंत्यांना भविष्यकाळात रोजगाराच्या व संशोधनाच्या असंख्य संधी उपलब्ध होतील. अशी माहिती संस्थेतर्फे प्रसिद्ध करण्यात आली.


