पुणे. : “सूर्य हा प्राचीनकाळापासून मानवाचा मित्र राहिला आहे. किंबहुना आपले सर्व जीवनच त्याच्या आधारावर उभे आहे. देशभरात मोठ्याप्रमाणावर सौर ऊर्जेचा वापर वाढत जाणार आहे. यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. म्हणून सूर्यमित्र हा सौर ऊर्जेला आधार ठरणार आहे.” असे मत महाऊर्जाचे महाव्यवस्थापक श्री. किशोर शिंदे यांनी व्यक्त केले.
माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूह, पुणेच्या तळेगाव दाभाडे येथील मायमर वैद्यकीय महाद्यालयामध्ये उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. तसेच, सूर्यमित्र तंत्रज्ञ शैक्षणिक कार्यक्रमाच्या उद्घाटन ही त्यांनी केले. पीडब्ल्यूडीचे इलेक्टिकल इन्स्पेक्टर श्री. देवगीकर हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी माईर्स एमआयटीचे संस्थापक विश्वस्त प्रा. पी. बी. जोशी, माईर्स एमआयटीचे सचिव व कार्यकारी संचालक प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, माईर्स एमआयटीच्या सहकोषाध्यक्ष व विश्वस्त डॉ. सुचित्रा कराड-नागरे, माईर्स एमआयटीचे विश्वस्त डॉ. विरेंद्र एस. घैसास, माजी कुलगुरू डॉ. अरूण जामकर, अशोक मेहेर, श्री. सैफ व मायमर वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र प्रसाद गुप्ता हे उपस्थित होते
किशोर शिंदे म्हणाले “जगभरात इंधनाचे साठे कमी होत आहेत. नैसर्गिक उर्जास्त्रोताचे प्रमाणही कमी होत आहे. त्यामुळे कमी खर्चामध्ये मूबलक प्रमाणावर सौरऊर्जा उपलब्ध होऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये देशात सौरऊर्जेचा वापर मोठ्याप्रमाणावर केला पाहिजे. आज आपल्याला देशामध्ये मोठ्याप्रमाणावर प्रदूषण होत आहे. या पार्श्वभूमीवर सौर ऊर्जा ही इतर अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांपेक्षाही अधिक सरस ठरते. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या विजेपेक्षासुध्दा सौर ऊर्जा जवळजवळ 50 टक्क्यांनी स्वस्त पडते. ”
“या ऊर्जेचा सर्वत्र प्रसार व्हावा म्हणून भारत सरकारने अनुदानाची योजना आखली आहे. मोठ्या मोठ्या शिक्षणसंस्थांबरोबरच वैय्यक्तीक स्वरूपात सुध्दा सौर ऊर्जेचा वापर झाल्यास देशाची विजेची गरज भागविता येईल. सर्वसाधारणपणे 4 ते 5 वर्षात या उपकरणांची किंमत वसूल होते. व उर्वरित 10 ते 15 वर्षे आपणास वीज जवळ जवळ विनामूल्य उपलब्ध होते. अर्थात या सौर प्रकल्पांची देखभाल व दुरुस्ती वेळोवेळी करणे अगत्याचे आहे. त्यासाठी त्यातील जाणकार असे तंत्रज्ञ उपल्ब्ध व्हावेत, म्हणून एमआयटी ही संस्था जो अभ्यासक्रम राबवीत आहे. तोसुध्दा महत्त्वाचा आहे. हा सौरऊर्जा प्रकल्प आणि तंत्रज्ञ प्रशिक्षण अभ्यासक्रम या दोन्ही गोष्टी पथदर्शक म्हणून गणल्या जातील व सर्वच संस्था त्यांचे अनुकरण करतील, अशी मला खात्री आहे.”
श्री.देवगीकर म्हणाले, “आज देशामध्ये विजेची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. ती कमी करावयाची असल्यास सौर ऊर्जा हा त्याला उत्तम पर्याय आहे. या सौरऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर उपयोग झाल्यास अधिक रोजगार उपलब्ध होईल.”
प्रा.डॉ. मंगेश तु. कराड म्हणाले, “भारत सरकारच्या या योजनेचा उपयोग आमच्या संस्थेच्या राजबाग, आळंदी, पंढरपूर व कोथरूड येथील शैक्षणिक संकुलात सौर ऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती सुरू केली आहे. त्यामुळे संस्थेची आर्थिक बचत मोठ्या प्रमाणावर होत आहे. विजेला पर्याय म्हणून सौर ऊर्जेचा वापर आम्ही करीत आहोत. आमच्यासारख्या महाराष्ट्रातील अनेक शिक्षणसंस्थांनी पुढाकार घेऊन सौर ऊर्जेचा वापर केला पाहिजे.”
प्रा. पी. बी. जोशी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. धनाजी जाधव यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुचित्रा कराड-नागरे यांनी आभार मानले.