पुणे, दि.५ ऑगस्टः विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयाने विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण देऊन देशात मूल्यावान व संस्कारित पिढी निर्माण करणार्या माईर्स एमआयटी या शिक्षण संस्थेचा ४० वा स्थापना दिवस शुक्रवारी कोथरूड कॅम्पस मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्येची देवता म्हणून ओळखल्या जाणार्या श्री सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, विश्वस्त पी.बी. जोशी, व्यवस्थापकीय समितीचे अध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, महासचिव प्रा. स्वाती कराड चाटे, अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, संस्कृतीचे गाढे अभ्यासक पं. वसंतराव गाडगीळ, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, डॉ. संजय उपाध्ये, विलास कथुरे व सर्व विभागांचे अधिष्ठाता व संचालक उपस्थित होते.
डॉ. विश्वनाथ कराड यांनी ४० वर्षापूर्वी लावलेले बीज आज वटवृक्षात रूपांतर झालेले आहे. या संस्थेच्या चार विद्यापीठांच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील आघाडीचे व्यक्ती निर्माण झाले आहेत. विज्ञान, तंत्रज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालून शांतता निर्माण करण्यासाठी मूल्याधिष्ठित शिक्षण दिले जात आहे. संस्थेने संत ज्ञानेश्वर व जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या नावाने जगातील सर्वात मोठ्या घुमटाची निर्मिती करून विश्व शांतीचा संदेश पोहचविण्याचे कार्य करीत आहे. त्याच प्रमाणे तीर्थ क्षेत्राकडून ज्ञान तीर्थ क्षेत्राकडे जाण्याच्या दृष्टीने कार्य सुरू आहे. सध्या राहुल विश्वनाथ कराड यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात संस्था प्रगतीच्या शिखरावर आहे. एमआयटी या शिक्षण संस्थेचा आलेख प्रगतीपथावर आहे.