पुणे : “ वारीमुळे देहाची, मनाची, हृदयाची स्वच्छता तर होतेच, त्याचबरोबर वारीतील सर्वसमावेशकता जीवनाचा खरा अर्थ उलगडून सांगते. म्हणून आयुष्यात एकदा तरी वारीला जायला हवे. भगवद्गीता, ज्ञानेश्वरीत जीवनाचे उद्दिष्ट सांगितले आहे. परंतु, ज्ञानेश्वरी समजवून घ्यायची असेल, तर प्रथम माणूस कळला पाहिजे. वारकरी संप्रदाय हे चांगल्या जीवनाचे दर्शन आहे,” असे प्रतिपादन ह.भ.प. भगवतीताई दांडेकर यांनी केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीच्या वतीने आषाढी वारीचे औचित्य साधून विश्वशांती गुरुकुल, वाखरीतळ येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रवचनात ह.भ.प. भगवतीताई दांडेकर बोलत होत्या. या प्रसंगी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारतचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड, प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, श्री. काशीराम दा. कराड, श्री. तुळशीराम दा. कराड, प्रा. स्वाती कराड-चाटे, सौ. उर्मिला विश्वनाथ कराड, सौ. उषा विश्वनाथ कराड आणि डॉ. सुदाम महाराज पानेगांवकर आदी मान्यवर उपस्थित होते.
भगवतीताई दांडेकर म्हणाल्या, “परमात्मा पांडुरंग, ज्ञानेश्वर ही माऊलीची रुपे आहेत. माऊली म्हणजे आई, जी सर्व सोपे करुन सांगते. सर्वांवर जीवापाड प्रेम करते. जिच्या कुशीत विसावले की आराम मिळतो. ज्या गोष्टीबद्दल सांगितले काय किंवा नाही सांगितले काय, त्यावर काहीच परिणाम होत नाही, अशी गोष्ट अंतिम सत्य असते. माणूस हा चुका करणारा, संत हा कमी चुका करणारा, तर ईश्वर हा एकही चूक न करणारा आहे. त्यामुळे अनुभवाच्या ज्ञानातूनच संत मार्गाने ईश्वराकडे जाता येते. परमात्म्याच्या स्मरणाने आपल्याला हे साध्य करता येते,”
“महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. हा वारकरी संप्रदाय सहिष्णु, नम्र, लीन आहे. त्याच्याकडे सर्वांना सामावून घेण्याची क्षमता आहे. तेथे जातीचा, धर्माचा किंवा स्त्री-पुरुषाचा असा कोणताही भेदभाव नाही. कारण या वारकरी संप्रदायाचे प्रेरणास्थान असलेल्या पांडुरंगाच्या चरणी सगळे सारखेच आहेत.”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ या पावन पवित्र ठिकाणी दोन वर्षानंतर हा योग आला आहे. वारीची १५०वर्षांची परंपरा असणारे सातारकर महाराज यांच्या घराण्याचे प्रवचनाची सेवा लाभणे हा पांडुरंगाचा आशीर्वाद आहे. बद्रिनाथ येथे माता सरस्वतीचे मंदिर उभे राहिले हे केवळ पांडुरंगाच्या आशीर्वादाने शक्य झाले आहे. वाखरीतळ हा पंढरपूरच्या वारीतील महत्त्वाचा आणि शेवटचा टप्पा आहे. जिथे लाखो भाविक आणि ज्ञानोबा-तुकोबा एकत्र येतात.”
यानंतर ह.भ.प. बापूसाहेब मोरे यांचे सूश्राव्य असे कीर्तन झाले.
वारीतील सर्वसमावेशकतेत जीवनाचा खरा अर्थ उलगडतो-ह.भ.प. भगवतीताई दांडेकर
Date:

