पुणे, ता. 19 : “ देशाची 77 % जनता जेव्हा दिवसाकाठी 20 रुपये देखिल खर्च करु शकत नाही, जेथील जवळपास 40 कोटी जनता निरक्षर आहे, तेथे नोटाबंदी देशाच्या समस्या मुळीच सोडवू शकणार नाही. देशामध्ये आरोग्य, शिक्षण, ग्रामीण भागातील अत्यावश्यक गरजा अशा बर्याच समस्या असताना नोटाबंदीच्या विषयाकडे लक्ष केंद्रित करुन देशातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम सरकार करीत आहे.” असे प्रतिपादन त्रिपुराचे मुख्यमंत्री श्री. माणिक सरकार यांनी केले.
माइर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसद फौंडेशनच्या वतीने आयोजित सातव्या भारतीय छात्र संसदेच्या समारोपप्रसंगी डॉ. डी.वाय. पाटील यांच्या हस्ते यांच्या हस्ते ‘आदर्श मुख्यमंत्री पुरस्कार’ प्रदान केल्यानंतर ते विद्यार्थ्यांनी संवाद साधत होते.
यावेळी त्रिपुराचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, सुप्रसिद्ध कृषीतज्ज्ञ पद्मश्री सुभाष पालेकर, फोर्ज मोटार्सचे अभय फिरोदिया, महात्मा गांधी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तुषार गांधी, माईसर्र् एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. विश्वनाथ दा. कराड, भारतीय छात्र संसदेचे प्रमुख समन्वयक प्रा. राहुल विश्वनाथ कराड, माईर्स एमआयटीचे सचिव व कार्यकारी संचालक प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, एमआयटीचे अधिष्ठता प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, एमआयटीचे डॉ. एल. के. क्षीरसागर, माईर्स संस्थापक विश्वस्त प्रा. प्रकाश जोशी, प्रा. डॉ. सायली गणकर, प्रा. दीपक आपटे, आदी मान्यवर उपस्थित होते. माणिक सरकार म्हणाले, “ विमुद्रीकरणामुळे देशाचा विकासदर एका टक्क्याने घटला आहे. व्यापारीकरणामध्ये 34% ची घट देशाने अनुभवलेली आहे. ग्रामीण भागातील जनतेला याचा चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे जो पर्यंत तुम्ही देशाचा इतिहास शिकत नाहीत व समजुन घेत नाहीत तो पर्यंत तुम्ही इतिहास निर्मााण करु शकणार नाही. तुमची निर्णय क्षमता आणि देशाप्रती असणारी तळमळ या गोष्टी नक्कीच भारताला प्रगतीच्या पथावर नेतील. ”
तुषार गांधी म्हणाले, “ हल्ली पेप्सी, इंटेल किंवा यासारख्या अनेक विदेशी कंपन्यांचा आपल्याला फार आदर वाटतो. तो वाटता कामा नये. अलिकडच्या काळात शेकडो किलो टोमॅटो शेतकर्यांनी फेकून दिले. यातील कोणत्याही कंपनीने तो माल विकत घेऊन त्याचा मोबदला शेतकर्यांना दिला नाही. त्यांना त्या गरीबांच्या डोळ्यातील अश्रू दिसले नाहीत, त्यांचे दुख: दिसले नाही. कारण त्यांना फक्त पैशांची भाषा कळते. त्यांना नफ्याशिवाय दुसरे काहीच दिसत नाही. या विदेशी कंपन्या आपल्या देशातील लघु उद्योगांना पुरते संपवून टाकत आहेत. ”
आपल्याकडे भ्रष्टाचार फार फोफावला आहे. त्याला कारणीभूत आपणच आहोत. कारण आपण त्यांना लाच घेण्याची सवय लावली आहे. शेवटी लाच म्हणजे फक्त स्वत:च्या चुकांवर पांघरुन घालणे आहे.
अभय फिरोदिया म्हणाले, “ वसाहतवादी काळात भारतीय जनतेने मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार सहन केले आहेत. याचे कारण आम्ही संख्येने कमी होतो किंवा आमच्याकडे शस्त्रसाठा नव्हता असे नसून आमच्याकडे संस्थात्मक कार्याची पायाभरणी नव्हती आणि इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून संस्था घेउन भारतात आले. प्राथमिक शिक्षण आणि गुणवत्तेवर आधारित समाज भारताच्या बर्याच समस्या दूर करेल.”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “ आपला भारत देश शांतीचा संदेश देणार्या गौतम बुद्ध व महात्मा गांधीच्या नावाने ओळखला जातो. या छात्र संसदेच्या माध्यमातून तरुणांमध्ये भारतीय अस्मिता जागवण्याचा एक अल्पसा प्रयत्न केला जात आहे. 21व्या शतकातील भ्रष्टाचार तसेच अन्य समस्यांपासून भारताला सोडविण्यासाठी हे व्यासपीठ एक माध्यम आहे. या माध्यमातून मूल्याधिष्ठीत शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. स्वामी विवेकानंद म्हणाले होते की, 21 वे शतक हे माझ्या भारतमातेचे असेल, जी संपूर्ण जगासाठी ज्ञानाचे दालन बनेल. आज याचा प्रत्यय येत आहे.”
माईर्स एमआयटीचे उपाध्यक्ष व भारतीय छात्र संसदेचे प्रमुख समन्वयक प्रा. राहुल कराड म्हणाले, “आजकाल युवक कोणत्याही क्षेत्रात जाण्यासाठी तयार असतात. मात्र राजकारण नको असे म्हणतात. 2003-04 साली जेंव्हा स्कूल ऑफ गव्हर्नमेंटची संकल्पना काही लोकांजवळ मांडली तेंव्हा त्यांनी ही संकल्पना भारतात चालणार नाही, असे स्पष्ट सांगितले. मात्र आज हीच संकल्पना संपूर्ण भारतात उचलली जात आहे. या कार्यक्रमात भारताच्या 27 राज्यांमधून विद्यार्थी आले आहेत. इथे कोणतेही मनोरंजानाचे कार्यक्रम नसताना विद्यार्थी सगळ्या सत्रांना उपस्थित राहतात. माझा नेहमी एक च प्रश्न असतो की, राजकारणात नेहमी पांढरे स झालेल्यांनाच का प्रवेश मिळतो? उलट तरुणांना इथे संधी मिळणे गरजेचे आहे. लोकशाही बळकट करण्यासाठीच या व्यासपीठाच्या माध्यमातून एक पिढी होत आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे विभागल्या गेलेल्या प्रत्येक भारतीयांना आज एकत्र येण्याची गरज आहे. आज आपली देशभक्ती अमेरिकेसारख्या देशापुढे कमी पडते आहे. त्यामुळे प्रत्येकामध्ये देशभक्ती जागवण्याची व भिनवण्याची गरज आहे.”
नीलम शर्मा व प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डी. पी. आपटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.