पुणे: “जीवनात जो पर्यंत आंतरिक शांती निर्माण होणार नाही तो पर्यंत बाह्य शांतीचा विचार करणे अवघड आहे. मन शांत असेल तर माणुष्याला शांती मिळते त्यातुनच समाजात व विश्वात शांतता प्रस्थापित होऊ शकते. त्याकरीता अहिंसा हे सर्वात मोठे साधन आहे.” असे विचार कॅलिफोर्निया येथील सिटीजफोर पीसचे कार्यकारी संचालक मंदार आपटे यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे जागतिक विज्ञान, धर्म आणि तत्त्वज्ञानावर आधारित सातव्या ऑनलाइन वर्ल्ड पार्लमेंटच्या द्वितीय सत्रात ‘सर्वानुमते शांती निर्माण’ या विषयावर ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
यावेळी स्विझरलँड येथील द मोहनजी इंटरनॅशनल फाउंडेशनेचे संस्थापक मोहनजी, इस्लामाबाद येथील क्वाइट इ आजम युनिव्हर्सिटीच्या पाकिस्तान हिंदू स्टडीज विभागाच्या विद्वान प्रा.डॉ. सादिया मोहम्मद, लंडन येथील प्रोडक्ट मॅनेजमेंट क्वाजवे टेक्नॉलॉजीचे सहयोगी उपाध्यक्ष योगेश जोशी आणि थायलँड येथील डॉ. अनस अमातय्याकुल हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
या प्रसंगी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्रभारी कुलगुरू प्रा.डॉ.आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू प्रा.डॉ. मिलिंद पांडे व पीस स्टडीजचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद पात्रे हे उपस्थित होते.
मंदार आपटे म्हणाले,“ श्रीश्री रविशंकर यांनी सांगितले की सुदर्शन क्रियेचे ब्रिदिंग व्यायाम केल्यास मन शांतीच्या दिशेने जाते. कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात सामाजिक हानी झाली आहे. ती भरुन काढण्यासाठी अध्यात्म हा एकमेव मार्ग आहे. सर्व सृष्टी एक कुटुंब असून त्यानंतर भारत व अन्य देश येतात. प्रार्थनेतून आंतरिक शांती मिळते. प्रत्येकाने मानवी समाज आणि पर्यावरणाचा आदर ठेवावा. अहिंसा निर्माण करण्यासाठी आपला दृष्टीकोण बदलणे गरजेचे आहे. वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाने आनंदी असावे, त्यांनंतर कुटुंब, समाज , देश आणि जागतिक पातळीवर शांतताप्रिय समाज निर्माण होऊ शकेल.”
मोहनजी म्हणाले,“ मानव हा बाह्य जगात शांती शोधतो परंतू ते आपल्या अंर्तमनात आहे हे तो विसरला आहे. जशी आपल्याला शारीरिक भाषा समजते त्यात भुक लागणे, तहान लागणे तशीच भाषा ही अंर्तमनाची आहे. त्यात शांतीची गरज हे केवळ अध्यात्माच्या आधारेच मिळेल. महात्मा गांधी यांनी सांगितलेला अहिंसेचा मंत्र हा सर्वात मोठा असून त्याची आम्हाला रोजच्या जीवनात सवय करावी लागेल. तसेच जीवनात आनंद हवे असेल तर काम, क्रोध, लोभ, मोह सारख्या गोष्टी सोडून शेअरिंग व केअरिंगला आपल्य जीवनात उतरावे.”
योगेश जोशी म्हणाले,“ शांती हे बाह्य जगात नाही तर अंर्तमनात मिळून त्याचा अनुभव घेण्यासारखा आहे. तो आपल्या रोजच्या जीवनातील व्यवहारातूनही मिळू शकतो. स्वयंनियंत्रण व शिस्त यांच्या आधारे शांती मिळू शकते. आम्हाला शाश्वत शांतीसाठी अध्यात्माचा मार्ग स्वीकारावा लागेल.”
प्रा.डॉ. सादिया महमूद म्हणाल्या,“ शांतीपूर्ण समाजनिर्मितीसाठी देशातील कायदे, समानता सारख्या गोष्टींचे अचूक पालन होणे गरजेचे आहे. आज ही अल्पसंख्यांक व जाती व्यवस्थेमुळे समाजात मोठ्या प्रमाणात अशांती आहे. तर दुसरीकडे तंत्रज्ञान आणि मशीनमुळे मानवाच्या जीवनात आमुलाग्र बदल झाला आहे. हे सर्व बदलण्यासाठी आंतरिक मनःशांतीची गरज आहे. त्यातूनच विश्वशांती निर्माण होईल. त्यासाठी समाजाचे पूर्ननिर्माण करावे लागेल. समाजाची आर्थिक, राजकीय स्थिती बदलणेही गरजेचे आहे.”
डॉ. अनस अमातय्याकुल म्हणाले,“ सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायातूनच समाजाता शांतता स्थापित होऊ शकते. इस्लाम धर्माची शिकवणही शांतीचीच आहे. कुराणात दुसर्याचा आदर व सन्मान करणे यागोष्टीला अत्यंत महत्व दिले आहे. शांतीसाठी मानवाच्या जीवनात पारदर्शीकतेला खूप महत्व आहे.”
प्रा.डॉ. मिलिंद पांडे यांनी प्रास्ताविक केले.
प्रा.डॉ. मिलिंद पात्रे यांनी स्वागतपर भाषण व सूत्रसंचालन केले. डॉ. वासी शेख यांनी आभार मानले.
समाज शांतीसाठी अहिंसा सर्वात मोठे साधन -मंदार आपटे
Date:

