केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री महेंद्रनाथ पांडे यांचे विचारः
चौथ्या ‘नॅशनल टीचर्स काँग्रेस’चा समारोप समारंभ
डॉ. अच्युत समंता यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान
पुणे: “नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये कौशल्य विकास आणि उद्योजकतेवर अधिक भर देण्यात येणार आहेे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली येणारे हे धोरण 21 व्या शतकात जागतिक कौशल्य राजधानी बनविण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.”असे उद्गार केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री . महेंद्रनाथ पांडे यांनी काढले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे तर्फे आयोजित चौथ्या ‘नॅशनल टीचर्स काँग्रेस’ (एनटीसी) च्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावर्षीची परिषद ‘ राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 ः उपलब्ध संधी’ या मुख्य विषयवर होती.
या प्रसंगी हिमाचल प्रदेशाचे उच्च शिक्षण मंत्री गोविंदसिंग ठाकूर, रिसर्च अॅण्ड इन्व्होवेशन सर्कल हैद्राबादचे महासंचालक डॉ. अजित रांगणेकर आणि जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासन प्रमुख प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
या प्रसंगी कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रीयल टेक्नॉलॉजीचे संस्थापक व खासदार डॉ. अच्युत समंता यांना ‘जीवन गौरव पुरस्कारा’ ने सन्मानित करण्यात आले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. एन.टी. राव आणि प्र कुलगुरू प्रा.डॉ. आर.एम.चिटणीस उपस्थित होते.
ही परिषद एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने भरविली गेली होती.
केंद्रीय मंंत्री महेंद्रनाथ पांडे म्हणाले,“ भविष्य ओळखून देशात 26 हजार सेटअप, 2 हजार पेक्षा अधिक ट्रेनिंग संस्था उभ्या केल्या गेल्या आहेत. त्या माध्यमातून 1 कोटीपेक्षा अधिक महिलांना त्यांच्या कौशाल्यांला वाव दिला जात आहे. 2025 पर्यंत देशातील 50 टक्के विद्यार्थ्यांना कौशल्य विकास क्षेत्रात सामावून घेतले जाईल. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये शिक्षणाला एकत्रित करून योग्य दिशा देण्याचे काम केले जात आहे. आम्ही विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर अधिक भर देत आहोत. पंतप्रधान कौशल्य विकास योजना आता तिसर्या चरणात आहे. यामध्ये काही विशेष पाठ्यक्रम शिकविले जाणार आहेत. परिसरातील मागणीनुसार त्या त्या ठिकाणी कौशल्य शिक्षणावर भर देण्यात येणार आहे. 21 व्या शतकात शिक्षण संस्था आणि शिक्षक भारताला पुढे घेऊन जाणार आहे आणि वसुधैव कुटुम्बकम नुसार मानवाची सेवा घडेल.”
डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले,“नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे देशाला नवीन आकार मिळणार आहे. तसेच यामुळे शिक्षकांचे भवितव्य सुद्धा उज्वल होईल. आज देशाचे भवितव्य हे शिक्षकांवर अवलंबून आहे. त्यामुळेच शिक्षण आणि नवनर्मिती हे 21 व्या शतकातील कळीचे मुद्े आहेत. संकट ही संधी बनते हे सोलापूरच्या एक शिक्षकाने 1 कोटी रूपयांचा पुरस्कार मिळवून सिद्ध करून दाखविले आहे. शिक्षकांमध्ये अंतःकरणात प्रेरणा आणि स्फूर्ती असावी. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये ऐकणे, विचार करणे आणि विचार घडविण्यासारखे गुण निर्माण करावे.”
डॉ. अच्युत समंता म्हणाले,“ नवनिर्मिती, पृथक्करण व एकिकरण ही शिक्षणाची त्रिसूत्री आहे. गरीब आणि आदिवासी मुलांना द्रारिद्—य आणि अज्ञान या पासून वर काढावयाचे असेल तर दर्जेदार शिक्षण हाच एक उपाय आहे. शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे. इंटरनेटच्या युगात शिक्षकाची भूमिका अधिक जवाबदारीची झालेली आहे. शिक्षण पद्धती लवचिक बनवावी. नवीन राष्ट्रीय शिक्षण पद्धती ही मूलभूत बदल घडवून आणणार आहे. आम्ही नापास झालेल्या विद्यार्थ्यांकडे अधिक लक्ष देऊन त्यांना क्रीडा क्षेत्रात प्रवीण केले. त्यामुळे या देशाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू मिळाले आहेत.”
डॉ. अजित रांगणेकर म्हणाले,“ येत्या 10 वर्षात या देशात अतिशय सकारात्मक परिणाम दिसणार आहेत. एकंदरीतच समाजात परिवर्तन होईल. या साठी महत्वाचा मुद्दा म्हणजे आंतरिक बदल हवा. आत्मविश्वसामुळेच हे शक्य होईल. तिसरा घटक म्हणजे सहकार्याची आवश्यकता आहे. यूजीसी सारख्या संस्थेवर आम्ही टीका करतो पण आत्मपरीक्षण करीत नाही. त्यासाठी आपली मनोवृत्ती बदलावी लागेल. सतत सरकारवर अवलंबून राहण्यापेक्षा शिक्षकांची उंची कशी वाढविता येईल यावर लक्ष केंद्रित करावे. आज तंत्रज्ञानमुळे विद्यार्थी हवा तो अभ्यासक्रम शिकू शकत आहे. जेव्हा सर्वजण पुढाकार घेतील तेव्हाच राष्ट्रीय शिक्षण धोरण यशस्वी होईल.”
हिमाचल प्रदेशचे शिक्षण मंत्री गोविंदसिंग ठाकूर म्हणाले,“स्वातंत्र्यानंतर शिक्षणाच्या रचनेत हवी तशी सुधारणा झाली नाही. म.गांधी म्हणत, ब्रिटिश येण्यापूर्वी शिक्षणाची चांगली पद्धती होती. पण त्यांच्या आगमनानंतर ती उध्वस्त झाली. शिक्षणामध्ये आई वडिलांपेक्षा शिक्षकांची भूमिका अधिक महत्वाची आहे. शिक्षकांनी प्राचीन काळापासून आता पर्यत या देशाला सांभाळले आहे. शिक्षकांमुळे येथील विद्यार्थी हे जगाला ज्ञान देईल. मला अशी खात्री आहे की भविष्यात भारत विश्वगुरू बनेल.”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “ नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. आम्ही आमच्या संस्थेत वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षण पद्धती रूजवित आहोत. पुढील काळात स्कूल ऑफ कॉन्शसनेस व स्कूल ऑफ रियॅलिटी सुरू करण्याची आवश्यकता आहे. त्यातून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक परिवर्तन होईल.”
राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“ या परिषदेमुळे विचार मंथन घडवून काही ठोस सिद्धांत पुढे येतील. त्यामुळे भविष्यात शिक्षकच देशाचा शिल्पकार असेल.”
डॉ. एन.टी.राव यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्रशांत दवे यांनी स्वगातपर भाषण केले.
प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सुहासिनी देसाई यांनी आभार मानले.

