विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि एमआयटी आर्ट, डिझाइन अॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जगातील सर्वात मोठ्या घुमटातील तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली विश्व शांती प्रार्थना सभागृह, विश्वराजबाग, लोणी काळभोर येथे आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या वर्ल्ड पार्लमेंटचा समारोप समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.
सुमित्रा महाजन म्हणाल्या, पर्यावरणाच्या रक्षणाससोबतच संस्कृती जतनाचे काम व्हावे. वृक्ष जीवनाला जोडतात. विकास आणि पर्यावरण एकमेकास पुरक आहेत. नदीवरील अतिक्रमणामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. नदीचे प्रवाह नष्ट केल्यामुळे त्याचे परिणाम भागावे लागत आहेत. महिला ही नदीचे रुपक आहे. मानवी हस्तक्षेपामुळे सृष्टीत फेरबदल होत आहेत. पृथ्वी वाचविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. विनोबा भावे म्हणातात कोणतेही काम करताना भावनेचा ओलावा असावा. आस्था आणि श्रद्धेने आणि समाधानाने काम करावे. तत्वज्ञानाच्या मागील भावना समजून घ्यावी. धर्म म्हणजे जीवन जगण्याची कला आहे. विश्वाला ज्ञान देण्याचे कार्य या घुमटाद्वारे होईल. कल्पनेला स्वप्नात पाहणे आणि ती सत्यात उतरविण्यासाठी सहकार्या सोबत घेऊन कृती करणे हीच यशाची गुरूकिल्ली आहे. भारतात सुसंस्कृत आणि ज्ञानी समाज बनवायचा आहे. वेदात सर्व ज्ञानाची कल्पना आहे. विज्ञान, धर्म आणि तत्वज्ञान या तिन्हीच्या माध्यमातून आपल्या जीवनपद्धतीची माहिती मिळते. भारताला विश्वगुरू कसे बनवावे या कल्पनेला युवकांनी मुर्त रुप द्यावे. डाॅ. कराड यांनी उभारलेला जगातील सर्वात मोठा घुमट हा ज्ञान केंद्र म्हणून उदयास येईल.
डॉ. विजय भटकर म्हणाले, विज्ञान, तत्वज्ञान, धर्म यांचा जागर गेली तीन दिवस या जगातील सर्वात मोठ्या घुमटात होत आहे. समाजासाठी काय आवश्यक आहे याविषयावर आणि जगात शांती नांदावी यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे. संत ज्ञानेश्वर, जगतगुरू तुकाराम आणि शंकाचारार्या हे तत्वज्ञ होत. मुस्लिम धर्म नेता वेद आणि हिंदु संस्कृतीची बाब अधोरेखित करतो, हेच या परिषदेचे मोठे यश आहे. मानवतेच्या कल्याणासाठी धर्म, पंथ, भेदभाव विसरून एकत्र येण्याची ही सुरूवात आहे.
डॉ. आर. सी. सिन्हा म्हणाले, तत्वज्ञ हा सिस्टिम बसवतो. शंकराचार्य यांच्यानंतरचे तत्वज्ञ आणि तत्वज्ञता यांची पुन्हा रिडिफाईन करण्याची गरज आहे. तत्वज्ञ हा एका आडियाला इतर आडियाशी जोडण्याचा प्रयत्न करत असतो. धर्म हा एकात्मतेचा संदेश देतो.
प्रा. अंबिका दत्ता शर्मा म्हणाले, यश, किर्ती आणि प्रतिष्ठा तेव्हाच मिळते जेव्हा त्या व्यक्तीकडे अधिक गुणसंपन्नता असेल. सर्व धर्म समभावाचा संदेश संतांनी दिला. ज्ञान अनमोल आहे. ते अमुर्त रूपात असते. त्याला मुर्त स्वरूप देण्याचे कार्य शिक्षक करतात.
डॉ. अशोक व्होरा म्हणाले, संतांना तत्वज्ञ मानण्याची सुरूवात या शतकात सुरू झाली. यात संत ज्ञानेश्वर, जगद्गुरू संत तुकाराम यासारखे अनेक संतांना आज तत्वज्ञ म्हणून ओळखले जात आहे.
पुरस्काराला उत्तर देताना प्रा. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, पूर्णब्रम्हयोगिनी त्यागमुर्ती प्रयाग अक्का कराड, संत ज्ञानेश्वर आणि जगतगुरू संत तुकाराम यांनी जीवनाचा मार्ग दाखविला. संत, तत्वज्ञ आणि शास्त्रज्ञ यांनी जगाला सत्याचा मार्ग दाखविला. मानव कल्याणासाठी आणि भारतीय संस्कृती, परंपरेच्या स्वरुपाचे दर्शन या घुमटातून मिळत राहिले. सर्व धर्म एकच आहे. शांतीपूर्ण समाज निर्मितीची सध्याच्या काळात गरज आहे. शांतीसाठी सर्वांनी एकत्र यावे. या घुमटाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, परंपरा व तत्त्वज्ञानाचे वेगळे स्वरूप जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच, वैश्र्विक भारतीय संस्कृतीचे दर्शन जगाला घडणार आहे.