पुणे- आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी प्राणांच्या आहुती दिल्या. १८५७ पासून इंग्रजी राजसत्तेने अनेक राजबंद्यांना जन्मठेपेसाठी अंदमानला काळ्यापाण्यावर पाठविले. अमानुष छळ आणि रोगट हवामान यामुळे असंख्य क्रांतीवीर अंदमानात हुतात्मे झाले. त्यांचे अंत्यविधी कोणी केले नाहीत मृत्यूसमयी भारत भूमीच्या पवित्र नद्यांचे जल कोणी त्यांच्या मुखांत पाजले नाही. अशा असंख्य क्रांतीवीरांचे ऋण आपण कधीच फेडू शकणार नाही. तथापी या ऋणांतून अल्पांशाने का होईना उतराई व्हावे या भावनेतून कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे संस्थेच्या विद्यमाने अंदमानात जलाभिषेक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतातील विविध नद्यांचे पवित्र जल आम्ही अंदमानला घेऊन जात आहोत. या जलाचा अभिषेक अंदमानातील सेल्युलर कारागृहात, स्मारकांवर, तेथील पिंपळवृक्षाला आम्ही करणार आहोत.
जलाभिषेक कार्यक्रम २७ सप्टेंबर २०१८ रोजी होणार आहे.
जलाभिषेक परिषद ३० सप्टेंबर २०१८ रोजी होणार आहे.
भारतीय संस्कृतीत पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी पितृपंधरवडा पाळला जातो. याचे औचित्य साधून हा कार्यक्रम पितृपंधरवड्यात करण्याचे योजिले आहे.
जलाभिषेक परिषदेच्या अध्यक्षपदी कुमारी तेजाली शहासने, पत्रकार बी.बी.सी नवी दिल्ली यांची निवड केलेली आहे.
जलाभिषेक परिषद व जलाभिषेक हे कार्यक्रम प्रमुख अतिथी ह.भ.प.सौ. उर्मिलाताई कराड, कवयित्री यांच्या शुभहस्ते व उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या जलाभिषेकासाठी पुणे येथील विश्वशांती केंद्र – आळंदी चे सर्वेसर्वा प्रा.डॉ. विश्वनाथ कराड यांनी ५५ पवित्र नद्या-सरोवरांचे जल संस्थेकडे सुपूर्द केले आहे. यात परदेशातील मक्का-मदिना येथील जलाचाही समावेश आहे.
या पवित्र जलाचा जलकुंभ प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या उपस्थितीत संस्थेकडे सुपूर्द केला.

