पुणे, दि.५ ऑगस्ट : “ शिक्षण आणि पैसा याहीपेक्षा अधिक महत्वाचे म्हणजे चारित्र्य आहे. हे ज्यांनी सांभाळले तोच खरा भाग्यवान मनुष्य आहे. प्रत्येकाने शिक्षण, अर्थकारण आणि राजकारण या तिन्ही गोष्टी सांभाळून आपली वाटचाल करावी.” असा सल्ला लोकसभेचे माजी सभापती व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी दिला.
माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समुहातर्फे एमआयटीचा ३६ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
याप्रसंगी माईर्स एमआयटीचे संस्थापक विश्वस्त प्रा. प्रकाश जोशी, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे-पाटील, जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. चंद्रकांत पांडव, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, एमआयटी विश्व शांती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, एमआयटी विश्व शांती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आय.के.भट, माईर्स एमआयटीच्या विश्वस्त व कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा कराड-नागारे, एमआयटीचे कुलसचिव नाना कुलकर्णी, प्राचार्य डॉ.एल.के.क्षीरसागर व प्रा. डी. पी. आपटे आदी उपस्थित होते.
मनोहर जोशी म्हणाले,“ध्येय मोठे असेल, तर यश आपोआपच मिळते. शैक्षणिक क्षेत्र हे पवित्र क्षेत्र असल्यामुळे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शिक्षण्याची प्रक्रिया सुरू ठेवावी. एखादा घटक सतत हेच काम करत राहिल्यास त्याच्याबरोबरच संस्थासुध्दा मोठी होईल. शिक्षण हे जीवनपयोगी असावे, आपल्या आवडीनुसार नौपुण्य मिळवा. इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर व्यक्ती यश खेचून आणू शकते. ”
शरीराने सृद्ढ, मनाने सुसंस्कृत, बुध्दीने कुशाग्र आणि विचारशीलता हे गुण असणारी व्यक्ती हा एक आदर्श शिक्षक असतो. कोणत्याही क्षेत्रात सकारात्मक विचारच असावा. आपल्या अभ्यासक्रमात नीतिमत्ता व राष्ट्रवादाचा पहिला धडा असावा. त्याप्रमाणे माणूस घडविला तर देश आपोआपच घडेल.”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ शिक्षकांच्या निरलस कार्यामुळे ५ खोल्यांतून सुरू केलेल्या संस्थेचा आज मोठा डोलारा उभा राहिला आहे. तरी सुद्धा आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. या विद्यापीठातून जागतिक दर्जाचे व शुद्ध चारित्र्याचे विद्यार्थी निर्माण करावयाचे आहेत.२१व्या शतकात भारत विश्वगुरू म्हणून उदयास येणाच्या दृष्टीने आमचा काय सहयोग असेल यावर विचार करावा.”
डॉ. मंगेश कराड म्हणाले,“ शिक्षणाचा मूळ उद्देश शांती हा आहे. त्यादृष्टीने हे विद्यापीठ पावले उचलीत आहे. ज्या पध्दतीने तंत्रज्ञान गतिमान होत आहे, त्या पध्दतीने स्वतःमध्ये बदल करावा लागेल. अन्यथा आपण मागे पडू. देशात उद्योजक निर्माण करणे हे सर्वात मोठे आह्वान आहे. त्यासाठी एमआयटीच्या विद्यार्थ्यांना तयार करून राष्ट्र निर्मितीचे कार्य केले जात आहे.”
प्रा. राहुल कराड म्हणाले,“ १९८३ साली एमआयटीची स्थापना झाली. त्यावेळच्या आणि आजच्या परिस्थितीत खूप मोठा फरक दिसून येतो. हा बदल काळानुरूप असल्याने प्रत्येकाने बदलत्या कार्यपध्दतीचा स्वीकार करून पुढे चालत रहावे. त्यातूनच एमआयटीचा जगभरात नावलौैकिक होण्यास मदत होईल. या बदलात सर्वांनी सहभागी व्हावेे.”
एमआयटीच्या ३६ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून संस्थेच्या वाटचालीत महत्वाचे योगदान देणार्या सात कर्मचार्यांचा मनोहर जोशी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये नागपुर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण, आळंदी येथील एमआयटी अॅकॅडमी ऑफ इंजिनियरिंगचे संचालक प्रा. डॉ.योगेश भालेराव, एमआयटीच्या क्रीडा विभागाचे संचालक प्रा. पी.जी.धनवे, लातूर येथील एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ. सचिन बी. इंगळे, एमआयटी सीओईच्या गणित विभागाचे सहयोगी प्राध्यापक महावीर गादिया, एमआयटीच्या संगणक विभागाच्या प्रा. डॉ. शितल आर.विज व एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी श्रीपती जे. मुंडे यांचा ‘माईर्स एमआयटी फाउंडेशन डे ’ पुरस्काराने सन्मान केला गेला.
प्रा. पी.बी. जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
डॉ. आय.के.भट यांनी प्रस्ताविक केले. प्रा. अतुल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. एल. के. क्षीरसागर यांनी आभार मानले.