पुणे -विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स् एमआयटी, पुणे, भारत तर्फे राजबाग लोणी काळभोर येथील शैक्षणिक परिसरात जगातील सर्वात मोठ्या घुमटाकार इमारतीची अतिशय आगळ्यावेगळ्या अशा ‘एमआयटी टेक्निक’ पद्धतीने उभारणी होत आहे. घुमटाच्या अखेरच्या टप्प्यातील ट्रसेस बसविण्याचे हे तंत्र जगात एकमेव आहे, अशी माहिती विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी राजबाग, लोणी-काळभोर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी ज्येष्ठ शिक्षण तज्ञ डॉ. प्र.ल.गावडे, माजी सचिव श्री. सुरेश शिर्के, डॉ. बळवंत गोपाळ फडके, माईर्स एमआयटीचे संस्थापक विश्वस्त प्रा. पी.बी.जोशी, माईर्स एमआयटीचे सचिव व कार्यकारी संचालक प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, डॉ. सुभाष आवळे डॉ.संजय उपाध्ये, डॉ. एस.एन.पठाण, श्री. विष्णू भिसे व गोविंद अलाटी हे उपस्थित होते.
सध्या जगातील सर्वात मोठा घुमट हा व्हॅटिकन सिटी (रोम) येथील सेंट पीटर्स् बॅसिलिका या इमारतीवर आहे, ज्याचा व्यास आहे सुमारे 137 फूट. विश्वशांती केंद्रातर्फे उभारण्यात येणार्या घुमटाचा व्यास 160 फूट इतका असून, पूर्ण झाल्यानंतर तो जगातील सर्वात मोठा घुमट असेल. या घुमटाचे सुमारे दोन तृतीयांश इतके बांधकाम पूर्ण झाले असून अंतिम एक तृतीयांश बांधकाम, हे अतिशय क्लिष्ट, जिकीरीचे व आव्हानात्मक असून ते करण्यासाठी संस्थेने एक विशिष्ट बांधकाम शैली स्वत: विकसित केली असून, त्याला ‘एमआयटी टेक्निक’ असे नाव देण्यात आले आहे.
‘वर्ल्ड पीस लायब्ररी अॅण्ड प्रेअर हॅाल’ उभारण्यात येत आहे. या घुमटाचे अखेरच्या टप्प्यासाठी 63 फूट लांबीच्या माईल्ड स्टीलच्या 72 कैंच्या (Trusses) तयार करण्यात आल्या आहेत. या कैंच्या जमिनीपासून उचलून घुमटाच्या वरच्या टप्प्यात अचूकपणे बसविण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची 88 मीटरची बलाढ्य क्रेन, पुण्याच्या इतिहासात प्रथमच या प्रकल्प स्थळावर कार्यान्वित करण्यात आली आहे. या कैंच्या उचलून त्या नियोजित ठिकाणी बसविण्याचे प्रत्यक्ष कार्य नुकतेच सुरू झाले असून, ते पुढचे 20-25 दिवस चालू राहील. तसेच, वरील लायब्ररी व प्रेअर हॉलच्या परिघाच्या आतील बाजूस 24 व बाहेरील बाजूस 24 व समोरच्या बाजूस 6 असे जगातील शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ व संतांचे पुतळे उभे करण्यात येणार आहेत. याद्वारे जगाला मानवतेचा व शांततेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असेही प्रा.डॉ. कराड म्हणाले.
पुणे शहर व परिसरातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हिल, स्ट्रक्चरल, मेकॅनिकल शाखेच्या विद्यार्थ्यांना तसेच स्ट्रक्चरल इंजिनिअर्स्, आर्किटेक्ट्स् व इतर संबंधित व्यावसायिकांना ही उभारणी प्रक्रिया प्रत्यक्ष पाहण्याची व अभ्यास करण्याची संधी 20 ते 25 दिवस आहे, असे आवाहन प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी केले आहे.
या परिसरात हे बांधकाम पाहण्यासाठी प्रवेश विनामूल्य आहे.


