पुणे-विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत गौतम बुद्ध पोर्णिमेचे औचित्य साधून “बौध्द भिक्खू संघदान आराधना” समारंभाचे आयोजन केले आहे. हा समारंभ मंगळवार, दि. २९ मे २०१८ रोजी सकाळी १०.३० वा. राजबाग, लोणी काळभोर येथील एमआयटी एडीटी विद्यापीठात होणार आहे.
बौध्द भिक्खू संघदान आराधना या समारंभात डॉ. राहुल बोधी, भिक्खू नागघोष, प्रशील रत्न भंते, विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे सल्लागार व लंडन येथील धम्मदूत गौतम भूमिपुत्र व प्रबुध्दरत्न व सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. रतनलाल सोनग्रा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या समारंभात त्याग, करूणा व समर्पणाने बौध्द धर्म प्रसारासाठी आपले संपूर्ण जीवन व्यतित केलेले महाराष्ट्रातून ५० पेक्षा जास्त भिक्खू या संघदान कार्यक्रात सहभागी होणार आहेत. आजच्या युगात जे बौद्ध भिक्खू झाले आहेत आणि धम्मकार्य करीत आहेत, अशांना वंदन करून त्यांना संघदान देण्याचा मनोदय आम्ही व्यक्त केला असून महनीय भिक्खूंना निमंत्रित केले आहे, अशी माहिती एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी दिली.
तथागत गौतम बुद्धाच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित होऊन जे लोक त्यांच्या धम्म मार्गात सम्मिलित होत होते, अशांना बुद्धविहारात राहून संघटनात्मक साधना करावी लागत असे. धम्माची साधना करताना हा धम्म लोककल्याणासाठी असल्यामुळे बौद्ध भिक्खूंना सतत भ्रमण करावे लागत असे. संपूर्णपणे त्याग आणि समर्पणावर आधारित असलेली बौध्द भिक्खूंची ही जीवनपध्दती परंपरा आजही अखंडित आहे. तथागतांनी त्यांच्या जीवनात त्यांना जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात, यासाठी काही नियम (विनय) सांगितले होते. त्यानुसार त्यांना आपल्या देहरक्षणासाठी वस्त्र, म्हणजे चिवर, ठेवण्याची मुभा दिली होती. ज्या ठिकाणी त्यांना भोजनदानासाठी बोलावीत त्या ठिकाणी गृहपती काही ना काही वस्तू देत असे. तथागताने वर्षाला दोन चिवरे ठेवण्याचा नियम बनविला. त्याप्रमाणे सर्व भिक्खू जर निमंत्रण मिळाले तर भोजनासह त्याचा सन्मानपूर्वक स्वीकार करीत. संघदानाची ही परंपरा हजारो वर्षे तशीच चालू आहे आणि जगातील बौद्धराष्ट्रामध्ये तिचे अत्यंत काटेकोरपणे, जाणीवपूर्वक व आस्थेने पालन होते.
बौद्ध भिक्खू कोणत्याही वस्तूचा किंवा संपत्तीचा संग्रह करीत नाहीत. फक्त आवश्यक तेवढेच ते स्वीकार करतात व त्या उपयोगात आणतात. त्यांची प्रत्येक वस्तू ही कुठल्याही प्रकारे वाया जात नाही. या काळातील सर्वांना ज्ञात असलेले बौद्ध भिक्खू भारतातील डॉ. भदंत आनंद कौशल्यायन हे होत. ते म्हणाले, बौद्ध भिक्खूंना केलेले वस्त्रदान सतत उपयोगी असते. जीर्ण झाल्यावर देखील त्याचा उपयोग भिंतीवर लेप करण्यासाठी केला जातो. याचाच अर्थ असा की, भिक्खूंना दिलेल्या सर्व वस्तूंचा उपयोग काटेकोरपणे सातत्याने होत असतो.
असा हा आगळावेगळा ऐतिहसिक कार्यक्रम विश्वशांती केंद्र (आळंदी) आणि एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे, भारत यांच्या संयुक्त विद्यमाने, जगातील सर्वात मोठी घुमटाकार वास्तु म्हणून साकारत असलेल्या ‘तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराज विश्वशांती प्रार्थना सभागृह आणि विश्वशांती ग्रंथालय’ येथे होणार आहे, ही विशेष उल्लेखनीय बाब आहे.
बौध्द भिक्खू संघदान आराधना २९ मे रोजी राजबागेत
Date:

