सार्वजनिक आरोग्यावर हवामान बदलांचा दुष्पपरिणाम या विषयावर गोलमेज परिषद
पुणे- आरोग्या बाबत भारताची सामाजिक आणि वैयक्तिक स्थिति अत्यंत चिंताजनक आहे. त्यात आता हवामान बदलाचा फटका मोठ्या प्रमाणात बसत असल्यामुळे दिवासाच्या तापमानात प्रचंड वाढ आणि रात्रीच्या तापमानात उतार अशी परिस्थितीही निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे बोअरवेलच्या पाण्याचे सेवन अधिक वाढल्यामुळे किडनीच्या आजारात वृध्दी झाली असून यातून निर्माण होणारे अनेक आजार प्राणघातक ठरत आहेत. त्यामुळे पुणे येथील सेंटर फॉर क्लायमेंट चेंजिंग येथे या विषयावर मोठ्या प्रमाणात संशोधन केले जात आहे. त्यानुसार उपाययोजना करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.एन.जे.पवार यांनी व्यक्त केले.
डॉ.विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे आणि माईर्स महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, तळेगाव-दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सार्वजनिक आरोग्यावर हवामान बदलांचा दुष्परिणाम या विषयावरील एक दिवसीय गोलमेज परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ.विश्वनाथ दा. कराड हे होते. टेरीचे संस्थापक अध्यक्ष व सुप्रसिध्द पर्यावरण तज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्रा. डॉ. अरुण जामकर, तळेगाव दाभाडे येथील माईर्स महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्यूकेशन अॅण्ड रिसर्चच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा कराड-नागरे व मायमरचे प्राचार्य डॉ. आर.के. गुप्ता हे उपस्थित होते.
डॉ.एन .जे.पवार म्हणाले, जागतिक तापमानवाढ, आम्लयुक्त पाऊस, वायू प्रदूषण, नागरी अव्यवस्था, कचरा समस्या, ओझोन वायूची घटती पातळी, जल प्रदूषण अशा एक ना अनेक समस्यांनी पृथ्वीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. मागील काही दशकांपासून मानवाकडून चाललेले पृथ्वीचे शोषण आणि वातारणाच्या अवनतीने आता धोक्याची पातळी ओलंडली आहे. आपली स्वार्थी चंगळवाडी कृष्णकृत्ये पृथ्वीच्या प्रकृतीरक्षणाला अनुकूल नसल्याने, पूर, भूकंप, त्सुनामी, वादळे यासारख्या नैसर्गिक आपत्तींना वारंवार तोंड द्यावे लागत आहे.
पंजाब, राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यातील खाली गेलेला भूजल स्तर हा मानव जातीला प्राणघातक ठरत आहे. येथे बोअरवेलच्या पाणी सेवनाचे प्रमाण वाढल्याने अनेक आजारांना जन्म दिला आहे. बर्फाळ प्रदेशात मानवाचे वास्तव वाढल्याने तेथील तापमानात वृध्दी झाली आहे. त्यामुळे पक्ष्यांचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. त्याचाच दुष्पपरिणाम म्हणजे अनेक वेगवेगळ्या आजारांचा उगम. तापमानातील अती वाढीमुळे डासांपासून होणार्या मलेरिया, हॅपिटाईटिस सारख्या आजारांच्या स्वरूपामध्येही बदल झालेला आहे. एकंदरीतच सृष्टीवरील सर्व गोष्टींच्या असंतुलनामुळे सामाजिक आरोग्याची स्थिति चिंताजनक बनली आहे. अशा वेळेस त्यावर सखोल संशोधनाची गरज आहे.
प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड म्हणाले, सार्वजनिक स्वच्छतेचे महत्व लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली आहे. वाढत्या जनसंख्येबरोबरच वाढत जाणारी वाहने आणि तंत्रज्ञानामुळे मानवाच्या आरोग्यावर दुष्पपरिणामच होत आहे. कार्बन डाय ऑक्साईडचे वातावरणातले आणि पाण्यातले वाढते प्रमाण सातत्याने सर्व सजीव सृष्टीसाठी धोकादायक होत चाललेले आहे. वातावरणात बदल झाल्याने अनेक नव्या आजारांना जन्म दिला जात आहे. या विषयाची गंभीरता लक्षात घेऊन ३० वर्षांपासून श्री क्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समितीच्या माध्यमातून नदी प्रदूषण कमी करणे व स्वच्छतेचे कार्य हाती घेतले गेले आहे. सामाजिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी छोट्या व नियोजनबद्ध गावांची निर्मिती करणे गरजेचे आहे.
डॉ. राजेंद्र शेंडे म्हणाले, सृष्टीवरील ओझोन वायूचा थर हा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. त्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण दिले जात आहे. दर वर्षी अडीच लाख लोकांचा बळी फक्त आजारांमुळे होत आहे. त्यामुळे या विषयावर जितक्या मोठ्या प्रमाणात चर्चा होते तेवढ्याच प्रमाणात योग्य संवादाच्या माध्यमातून समाजापर्यंत या विषयाला पोहचवून जागृती करणे गरजेचे आहे. शहरांमध्ये प्रदूषण पातळी ही अगदी वरच्या स्तरापर्यंत पोहचली आहे. त्याला नियंत्रित करणे गरजेचे आहे. अन्यथा दुष्परिणामाचा सामना करावयास तयार रहावे लागेल.
डॉ. सुचित्रा कराड-नागरे यांनी प्रस्ताविक केले. डॉ. जामकर यांनी गोलमेज परिषदेच्या आयोजना मागची भूमिका स्पष्ट केली.
डॉ. संदीप साळवी, डॉ. मिलिंद गोरे, डॉ. गुफरान बेग, डॉ. पारूल ऋषी, डॉ. हेम डोलकीया व डॉ. महावीर गोलेचा इत्यादी मान्यवरांनी आपले विचार मांडले.
तळेगाव दाभाडे येथील माईर्स महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्यूकेशन अॅण्ड रिसर्च येथे सेंटर फॉर क्लायमेंट चेज अॅण्ड हेल्थ सेंटरची आज स्थापना करण्यात आली. येथे वरील विषयांवर मोठ्या प्रमाणात संशोधन करून त्यावर उपाययोजना केल्या जातील. तसेच, सामाजिक आरोग्यासंदर्भात जनजागृती केली जाईल.
डॉ. सुषमा शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. डेरेक डिसूझा यांनी आभार मानले.

