महेश काळे यांची भावना; ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’चा समारोप
पुणे :“ या पूर्वी एमआयटी सांस्कृतिक संध्या’ संगीत महोत्सवात संगीताच्या क्षेत्रातील नामवंत कलाकारांनी आपली संगीतरूपी सेवा सादर केली आहे.त्यामुळे या व्यासपीठावरून मी प्रथमच माझ्या गायनाची सेवा सादर करतो आहे, याचा मला विशेष आनंद होत आहे. सुगम संगीत व शास्त्रीय संगीत ही दोन भावंडे आहेत.ती वेगवेगळ्या पध्दतीने संगीताच्या क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावत आहेत.” अशी भावना आंतरराष्ट्रीयकीर्तिचे गायक श्री. महेश काळे यांनी व्यक्त केली.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेतर्फे विश्वशांती गुरुकुल, राजबाग, लोणी काळभोर येथील विश्वराज बंधार्याच्या परिसरात आयोजिलेल्या दोन दिवसीय ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ संगीत महोत्सवाचा समारोप प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, सौ. उषा विश्वनाथ कराड, , सौ. उर्मिला विश्वनाथ कराड , श्री. आदिनाथ मंगेशकर, डॉ. सुचित्रा नागरे, सौ. ज्योती ढाकणे, प्रा.स्वाती चाटे, डॉ. एस. एन. पठाण व विश्वशांती संघाचे कार्यकारी संचालक डॉ. संजय उपाध्ये हे उपस्थित होते.
दि. 31 डिसेंबरच्या मध्यरात्री 12.00 वाजता झालेल्या या सांस्कृतिक संध्येच्या समारोपप्रसंगी त्याग व समर्पणाचे प्रतीक असलेल्या यज्ञकुंडामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर, विकार, विकृती व विकल्पासारख्या दुर्गुणांची आहुती देण्यात आली. पुढील 2017 हे वर्ष अत्यंत सुखाने, समाधानाने व शांततेने पार पडावे, यासाठी प्रार्थना करण्यात आली.
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “ श्री. महेश काळे यांच्या गायनाने संगीताच्या साधनेतून ईश्वरदर्शन व शांतरसाची अनुभूती मिळाली.या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण समाजामध्ये व विशेष करून तरूण वर्गाच्या मनामध्ये ‘स्वधर्म, स्वाभिमान व स्वत्व’ जागवून खर्या अर्थाने ‘भारतीय अस्मिता’ जागविण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. ”
श्री. महेश काळे याच्या सूर निरागस हो या गाण्यांनी रसिकांना वेगळी अनुभूती मिळाली. सुप्रसिध्द शास्त्रीय संगीत गायिका सौ. सानिया पाटणकर, प्रसिद्ध गायिका श्रीमती गोदावरीताई मुंडे, सुप्रसिध्द सुगम संगीत गायक श्री शशांक दिवेकर व डॉ.सुभाष आवळे यांनी आपल्या सुरेल रचनांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पखवाज वादक पं. उद्धवबापू आपेगांवकर यांनी तबला वादनाने रसिकांची मने जिंकली. या संगीत महोत्सवात विश्वशांती गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी आपली गायन-वादन कला सादर केली. बाल तबलावादकांनी श्रोत्यांचे विशेष लक्ष वेधले. डॉ. संजय उपाध्ये यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
फोटो क्र. 5659- विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेतर्फे ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ संगीत महोत्सव व यज्ञ विश्वशांती गुरुकुल, राजबाग, लोणी काळभोर येथे आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी आहुती देताना प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, , सौ. उषा विश्वनाथ कराड, सौ. ज्योती ढाकणे, डॉ. एस. एन. पठाण, डॉ. सुचित्रा नागरे व इतर.



