मुंबई- नवरात्रीमध्ये स्त्री व आदि शक्तीची जी नऊ रूपे दाखविली जातात, त्याचा सन्मान समाजाने करणे आवश्यक आहे. पण अशी स्थिती आलेली नाही. त्यासाठी महिला एकत्र येऊन त्यांचे सबलीकरण झाल्यास हे शक्य होईल. असा विश्वास राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.
एमआयटी स्कूल ऑफ गर्व्हमेंटच्या माध्यमातून आयोजित राष्ट्रीय महिला संसदेच्या मुंबई चॅप्टरचे उद्घाटन आयएसडीआय पार्सन्स, मुंबई कॅम्पस येथे झाले. त्या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. या वेळी प्रसिद्ध गायिका व बँक व्यावसायिक सौ.अमृता फडणवीस, पोद्दार फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. प्रकृती पोद्दार आणि राष्ट्रीय महिला संसदेचे संस्थापक व माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक प्रा. राहुल विश्वनाथ कराड हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पंकजा मुंडे म्हणाल्या, सध्या संपूर्ण जगात महिलांना त्यांच्या अधिकाराचा विचार करण्याचीसुध्दा मुभा नाही. पण, भारतातील स्थितीत मोठ्या प्रमाणात परिवर्तन होत आहे. आज सर्वच क्षेत्रात महिलांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे. येणार्या काळात राष्ट्रीय पुरूष संसदेचे आयोजन करण्याची वेळ येणार आहे, असे दिसते.
अमृता फडणवीस म्हणाल्या, भारतात प्रथमच महिला सबलीकरणासाठी आयोजित करण्यात आलेल्या या चॅप्टरमुळे महिलांची एकजूट वाढेल. व्यवसाय, राजकारण आणि अन्य क्षेत्रात महिला यशस्वीपणे कार्य करुन आपली वेगळी ओळख निर्माण करीत आहेत. महिलांना योग्य प्रकारे सुरक्षा मिळाल्यास त्या घराबरोबरच समाजाचे उत्तम प्रकारे नेतृत्व करु शकतात. सर्वांना एकत्रित घेऊन चालण्याची क्षमता त्यांच्यात उपजतच आहे. सबलीकरणाच्या माध्यमातून महिलांनी महिलेला मदत करणे गरजेचे आहे.
प्रकृती पोद्दार म्हणाल्या, भारतातील महिलांच्या मानसिकतेत मोठ्या प्रमाणात परिवर्तन आणण्यासाठी हे उत्तम व्यासपीठ आहे. नॅशनल वुमेन्स पार्लमेंटमधून महिलांना सशक्त बनविण्याचा हा एक प्रयोग असेल. महिलांच्या संदर्भात कार्यरत सामाजिक संस्था व महिला संघटनांना एकत्रित आणण्यासाठी आम्ही कार्य करू. महिलांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी कार्य करू.
प्रा. राहुल विश्वनाथ कराड म्हणाले, राष्ट्रीय महिला संसदेचे आयोजन कशासाठी करावे लागते, यावर विचार करण्याची वेळ आली आहे. सध्या भारतात कृषी क्षेत्रातील महिला, अल्पसंख्यांक आणि दलित व महिलांच्या उध्दारासाठी सर्वांना मिळून कार्य करावयाचे आहे. महिला सबलीकरण व सक्षमीकरणाच्या हेतूने भविष्यात देशातील वेगवेगळ्या ठिकाणी महिला संसदेचे चॅप्टर सुरू करण्यात येणार आहेत. सबलीकरणाचा उद्देश बाळगून गेल्या वर्षी आम्ही आंध्रप्रदेश सरकार आणि एमआयटीच्या वतीने आंध्र प्रदेशमधील अमरावती येथे देशातील पहिल्या नॅशनल वुमेन्स पार्लमेंटचे आयोजन केले होते. यात १५ हजार पेक्षा अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. महिलांना प्रेरित करून त्यांच्या सबलीकरणासाठी अशा पार्लमेंटची निश्चितच आवश्यकता आहे.
उद्घाटनानंतर आयोजित प्रथम सत्रात जैन स्कूल ऑफ ग्लोबल मॅनेजमेंटच्या डायरेक्टर चारुलता रवी कुमार, माविमच्या इंदिरा मल्लो, ज्येष्ठ वकील आभा सिंग, मयुरेशच्या सीईओ मनिषा गिर्होत्रा, डाईस डिस्ट्रिक्टची संस्थापक राधा कपूर-खन्ना व एनडब्ल्यूपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या व्यवस्थापन विभागाच्या अधिष्ठाता डॉ. सायली गणकर यांनी एम्पॉवरमेंट थ्रू पार्टिसिपेट डेमोक्रॉसी या विषयावर आपले विचार मांडले.
राष्ट्रीय महिला संसद मुंबई शाखे मध्ये महिला संगठन, एनजीओ, सामाजिक संगठनसारख्या वेगवेगळ्या क्षेत्रातील शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.
राधिका शहा यांनी सूत्रसंचालन केले.
समाजाने आदिशक्तीचा सन्मान करावा -पंकजा मुंडे
Date:

