पुणे- कोणतीही कला ही मानवाला जगायला शिकविते. त्यामुळे विद्यार्थीदशेत असताना प्रत्येकाने कोणती ना कोणती कला जोपासावी. मानवी जीवनात चढ-उतार येत असतातच. तसेच तणाव सुद्धा येत असतात. अशा वेळेस आपण जोपासलेली कला किंवा छंद या स्थितीतून तुम्हाला बाहेर काढू शकतो. असे विचार प्रसिद्ध अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांनी मांडले.
एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या लिबरल आर्ट, सायन्स अॅण्ड कॉमर्स कॉलेजच्या वतीने आयोजित प्रिझम-२०१८ या वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभात त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत होत्या. यावेळी चाणक्य मंडळचे अध्यक्ष अविनाश धर्माधिकारी, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. डी.पी. आपटे, एमआयटी डब्ल्यूपीयूच्या लिबरल ऑर्ट, सायन्स अॅण्ड कॉमर्सचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गव्हाणे, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्या डॉ. माधुरी कुलकर्णी, डॉ. महेश आबाळे व विद्यार्थी प्रतिनिधी श्वेता फडणीस हे उपस्थित होते.
प्रतीक्षा लोणकर म्हणाल्या, सध्याच्या काळात विद्यार्थ्यांचा आयक्यू- इंटेलिजन्स कोशंट बराच चांगला आहे. पण त्याबरोबरच त्यांनी ईक्यू -इमोशनल कोशंट वाढवावा. २१व्या शतकात माणूस म्हणून जगा. कुटुंब, नातेवाईक या सर्वांना सोबत घेऊन चला. त्यामुळे समाज निर्मितीची प्रक्रिया सुरू होईल. विद्यार्थ्यांनी यशासाठी शॉर्टकटचा फॉर्मुला वापरू नये. कठोर मेहनत हेच यशाचे गमक आहे. विद्यार्थ्यांनी आलेल्या संधीचा सदैव फायदा उचलावा. त्याचप्रमाणे आपल्या आवडत्या छंदामध्येसुद्धा विद्यार्थी स्वतःचे करियर घडवू शकतात.
अविनाश धर्माधिकारी म्हणाले, तुमच्या सामोर येणार्या प्रत्येक समस्यांचा सामना स्वतःच्या हिंमतीवर करा. परीक्षेतील मार्क हे शैक्षणिक गुणवत्ता दाखवितात. परंतू व्यवहारात वावरतांना तुम्हाला स्वतःचे तारतम्य वापरावे लागते. त्यासाठी खूप मेहनत घेणार्यांसाठी संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर कधीही अहंकाराचा वारा अंगात शिरू देऊ नका.
डी.पी. आपटे म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी शिस्त बाणवली, तर जीवनात त्याचा खूप मोठा उपयोग होतो. हीच शिस्त तुम्हाला घरात, कामाच्या ठिकाणी आणि एकंदरितच समाजात शांती निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरेल. विद्यार्थ्यांनी अध्ययनाबरोबरच व्यक्तिमत्व विकासावर अधिक लक्ष द्यावे.
प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे म्हणाले, तरूण पिढीबद्दल नेहमी निराशावादी टीका केली जाते. परंतू, आजचे कार्यक्रम पाहिल्यानंतर मात्र त्यांच्याबद्दल आशा वाटू लागली आहे.
प्रा. डॉ. माधुरी कुलकर्णी यांनी कॉलेजच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले. तसेच, विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मिळविलेल्या यशाची माहिती दिली.
जनरल सेक्रेटरी श्वेता फडणीस हिने आपले विचार मांडले.
प्रिझम- २०१८ स्नेह सम्मेलनामध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विविध एकांकिका, गायन, मिमिक्री व नृत्याचा समावेश होता. तसेच, विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, खेळ, विविध स्पर्धांमध्ये मिळविलेल्या यशाबद्दल त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
डॉ. प्रीती जोशी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रजनी मोती यांनी आभार मानले.
![कला ही मानवाला जगायला शिकविते - प्रतीक्षा लोणकर](https://mymarathi.net/wp-content/uploads/2018/02/DSC9715.jpg)