पुणे- :“मला पुण्याने मोठे केले. मी माशेलकर नसून पुणेकरच आहे. या पुण्याने माझे लाड केले आणि मला वाढविले. त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत मी पुण्यातच राहीन.” अशी भावना जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केली.
एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, भारती डिम्ड युनिव्हर्सिटी, सिम्बायोसिस विद्यापीठ, डॉ.डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी, एमआयटी आर्ट, डिझाईन अॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वकर्मा युनिव्हर्सिटी व इंडिया इंटरनॅशनल मल्टिव्हर्सिटी यांच्यातर्फे डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अमृतमहोत्सवा निमित्त सत्कार करण्यात आला. त्यांनी वैज्ञानिक व सामाजिक क्षेत्रात आयुष्यभर केलेल्या शिक्षण, संशोधन व राष्ट्रसेवेच्या कार्याबद्दल त्यांना तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली ज्ञान-विज्ञान-ब्रह्मऋषि पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराला उत्तर देतांना ते बोलत होते.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, सिम्बायोसिस विद्यापीठाचे कुलपती पद्मविभूषण डॉ.शां.ब.मुजुमदार, भारती विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ.शिवाजीराव कदम, नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ. विजय भटकर, सौ. वैशाली रघुनाथ माशेलकर, भारती विद्यापीठाचे सचिव डॉ.विश्वजीत कदम, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष प्रा.राहुल विश्वनाथ कराड, सिंबायोसिसच्या प्रिन्सिपॉल डायरेक्टर डॉ. विद्या येरवडेकर, डॉ. जय गोरे, डॉ. राजेंद्र शेंडे, श्री.तुळशीराम दा. कराड, पं. वसंत गाडगीळ, फिरोज बख्त अहमद, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण व एमआयटी आर्ट, डिझाईन अॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनिल राय उपस्थित होते.
तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊलीची सुवर्ण जडीत प्रतिमा, सन्मानपत्र, सुवर्ण पदक व रोख रूपये सव्वा लाख असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
डॉ.रघुनाथ माशेलकर म्हणाले,“उर्जा केंद्रित केल्यावर काहीही घडू शकते. तसेच, भारतादेश एक झाला, तर या विश्वात काहीही करू शकतोे.पण त्यासाठी कठोर मेहनत व परस्पर सहकार्य असावे लागेल. भारत देशात १३० कोटी मेंदू आहेत. त्यांच्या कल्पकतेचा वापर या देशासाठी केल्यास येणार्या काळात भारत वेगाने प्रगती पथावर जाईल. जय जवान-जय किसान या प्रचलित घोषणेनंतर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी जय विज्ञान ही घोषणा दिली. त्यानंतर देशात वैज्ञानिक क्रांती आली.”
‘त्यांनी घोषणा केली, की माझ्या आईच्या नावने, म्हणजेच अंजली माशेलकर फाउंडेशनची आम्ही स्थापना करीत आहोत. या माध्यमातून चांगले कार्य करणार्या परंतू जगासमोर न आलेल्या तरूण शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्या माध्यमातून एक नव्हे, तर हजारो माशेलकर तयार होतील.’
विद्यार्थ्यांनी आकांक्षा मोठी ठेवावी. कुठल्या कार्याची फलश्रृती तत्काळ मिळत नाही, अहोरात्र मेहनत आणि खचून न जाता कार्य करत राहिल्याने यश तुमच्याकडे धावत येईल.फेल या शब्दाचा विस्तार करताना ते म्हणाले फस्ट अटेम्प्ट इन लर्निंग. त्यामुळे आयुष्य जगताना खचून जाऊ नये. विद्यार्थ्यांनी सदैव आपल्या मेंदूचा नव्हे, तर हदयाचा आवाज ऐकून कार्य करावे.
प्रा. डॉ.विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ २१वे शतक हे भारताचे असेल, असे भाकीत करणारे स्वामी विवेकांनद यांचे स्वप्न डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या सारखे आध्यात्मिक वैज्ञानिक पूर्ण करतील. ज्ञान-विज्ञान व अध्यात्माच्या आधारे भारत भूमी संपूर्ण विश्वाला शांतीचा मार्ग दाखवील. भारतीय परंपरा ही त्याग व समर्पणाची आहे. डॉ. माशेलकरांच्या माध्यमातून भारताला मानवतावादी वैज्ञानिक मिळाला आहे. जगभरात ते भारताची नवी प्रतिमा उजळून टाकतील.”
डॉ.शां.ब. मुजुमदार म्हणाले,“ सकारात्मक विचार, कठोर परिश्रम आणि कर्तृत्वाच्या जोरावर डॉ. माशेलकर यांनी जगात विज्ञानच्या क्षेत्रात भारताचे नाव वरच्या स्थानावर नेवून ठेवले आहे. जे विद्यार्थी निराश असतात, त्यांच्या जीवनाला दिशा देणारे प्रभावी औषध म्हणजे डॉ. माशेलकर यांचे जीवन आहे. खरे म्हणजे ते पुण्याचे ब्रॅण्ड अॅम्बेसिडर आहेत.”
डॉ.विजय भटकर म्हणाले,“ सरस्वती नगरीमध्ये ऋषितुल्य वैज्ञानिकाचा सत्कार होणे, ही देशासाठी ऐतिहासिक घटना आहे. प्राचीन संस्कृतीत गुरूंना आदराचे स्थान दिले आहे. आज नव वर्षाच्या पहाटे याच गुरूचा सत्कार होणे ही भारतीय विज्ञान-तंत्रज्ञानासाठी महत्वपूर्ण घटना आहे.”
डॉ.शिवाजीराव कदम म्हणाले,“येथे विज्ञान महर्षीचा सत्कार होत आहे ही अलौकिक घटना आहे. हळदीच्या पेटंट संदर्भात डॉ. माशेलकर यांनी जागतिक पातळीवर लढा दिला. ज्ञानातून तरूण पिढी कशी घडविता येईल, या साठी त्यांनी सदैव प्रयत्न केला. विद्यार्थ्यांच्या जडण-घडणीमध्ये त्यांचा महत्वपूर्ण सहभाग आहे.”
प्रा. राहुल वि.कराड म्हणाले, “आज अनेक शिक्षण संस्था एकत्र आल्या ते सर्वश्री डॉ. माशेलकर यांच्यावरील प्रेमामुळे होय. देशामध्ये अनेक शहरात शिक्षण संस्था एकत्र येत नाही पण पुण्यात जे घडले त्यामुळे येथील शैक्षणिक प्रगतीला मोठा हातभार लागेल.”
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संदेशाच्या माध्यमातून डॉ. माशेलकर यांना शुभेच्छा दिल्या. डॉ. विद्या येरवडेकर, विश्वजीत कदम, फिरोज बख्त अहमद व पं.वसंत गाडगीळ यांनी आपल्या भाषणाातून डॉ. माशेलकर यांनी जीवनभर विज्ञान क्षेत्रात केलेल्या अतुलनिय कार्याचा गौरव केला. तसेच, प्रा.मिलिंद पांडे यांनी मानपत्राचे वाचन केले.
प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. विश्वजीत कदम यांनी आभार मानले.
शेवटच्या श्वासापर्यंत पुण्यात राहीन-डॉ. रघुनाथ माशेलकर
Date:

