भारतीय संगीतातून शांत रसाची अनुभूती- पं.उल्हास कशाळकर
पुणे :“भारतीय संगीतात शांत रस आहे जे इतर संगीतात मिळत नाही. म्हणून याला अध्यात्मिक स्थान दिले आहे.आपल्या येथे संगीताला अध्यात्माशी जोडल्यामुळे त्यातून आत्मशांतीचा अनुभव होतो. जो शरीर व मनला प्रसन्न करतो.”अशी प्रतिक्रिया पं.उल्हास कशाळकर यांनी व्यक्त केली.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेतर्फे राजबाग, लोणी-काळभोर येथील विश्वराज बंधारा येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ संगीत महोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध गायक पं.हदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मध्यप्रदेश सरकारच्या तानसेन सन्मानाचे मानकरी पंडित उल्हास कशाळकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते.
यावेळी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, ध्रुपद गायक पं. उदय भवळकर, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुभाष आवळे, एमआयटी आर्ट, डिझाईन अॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनिल राय, विश्वशांती संगीत कला अकादमीचे महासचिव श्री.आदिनाथ मंगेशकर व श्री. सुरेंद्र मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.
पं. उल्हास कशाळकर म्हणाले,“ संगीत साधनेसाठी गुरूकुल पद्धतीच योग्य आहे. यामध्ये योग्य प्रकारचे संगीताचे शिक्षण देता येते. त्यातूनच चांगले कलाकार निर्माण करता येतात. भारतीय शास्त्रीय संगीत हे आपल्या देशाचे वैभव आहे. आजच्या तरूण पिढीवर पाश्चात्य संस्कृतीचा पगडा आहे. त्यामुळे भारतीय संगीताकडे तरूणांचा येण्याचे प्रमाण कमी आहे. परंतू, विश्वशांती संगीत अकादमीच्या माध्यमातून जास्तीत जास्त गायक व संगीतकार निर्माण होऊ शकतील. गुरू शिष्य परंपरा ही सर्वात मोठी आहे. एका गुरूचे संस्कार घेवून मोठे होता येत नाही त्यात सगळ्याचा सहभाग असावा लागतो.”
पं.हदयानाथ मंगेशकर म्हणाले,“थोर गायकांचा सत्कार करून मी स्वतःचा सत्कार केला आहे असे मानतो. दहा वर्षापूर्वी संगीत कला अकादमी कशी असवी सात सुरांचे सात बंगले असावे. गार्डन असावे असे मी स्वप्न पाहिले होते. त्या संबंधी मी श्रीकृष्ण कर्वे गुरूजी यांच्याकडे बोललो होतो. त्याप्रमाणे ते जगातील एकमेव असे संगीत क्षेत्रातील अद्धितीय अकादमी डॉ. कराड यांनी प्रत्यक्षात साकार केले.”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“संगीताच्या साधनेतून शांतरसाची अनुभूती मिळते. पाश्चिमात्य संस्कृतीच्या अतिक्रमणामुळे भारतीय संस्कृतीचा आजच्या पिढीला विसर पडत चालल्याचे दिसत आहे. तो परिचय त्यांना व्हावा, यासाठी हा उपक्रम आहे. भारतरत्न लता दिदींच्या आशिर्वादाने आज येथे संगीत कला अकादमी उभी राहिली आहे. संगीताच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे जगाला दर्शन घडणार आहे. संगीताच्या माध्यमातून जगात सुख, शांती व समाधान नांदेल व आपली भारत माता विश्वगुरू म्हणून उदयास येईल.”
आदिनाथ मंगेशकर म्हणाले,“सध्या जगात मनोरंजन क्षेत्रात तेजीने वाढ होत आहे. त्याला अनुसरून या कॅम्पस मध्ये संगीताचे शिक्षण दिले जात आहे ते कौतुकास्पद आहे. डॉ.विश्वनाथ कराड यांनी सुरू केलेली ही भारतीय संस्कृतीचे संगीत शिक्षण अतुलनिय आहे. दहा वर्षापासून उत्तम कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. येथे भारतीय संस्कृती व परंपरा दिसून येत आहे.”
डॉ.एस.एन.पठाण व सुरेंद्र मोहिते यांनी आपले मनोगत व्यक्त केेले. सोनाली श्रीखंडे यांनी सूत्रसंचालन केली. डॉ.सुनील राय यांनी आभार मानले.
एमआयटी सांस्कृतिक संध्येची सुरुवात शहनाई वादक तुकाराम दैठणकर यांच्या सुमधूर शहनाई वादनाने झाली.