राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड राज्यस्तरीय पुरस्कार-२०१७ जाहीर!
पुणे- एमआयटी विश्वशांती विद्यापीठ(एमआयटीडब्ल्यूपीयू), पुणे, भारत, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह, पुणे व भारत अस्मिता फाउंडेशन, पुणे यांच्यातर्फे देण्यात येणारे २०१७ चे राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड राज्यस्तरीय पुरस्कार श्री. शंकरराव दिनकरराव खोत (वाजेवाडी, जि. सातारा), सौ. बेबीताई अशोक गायकवाड (अहमदनगर), श्री. डॉ. अशोक वामनराव बेलखोडे (किनवट, जि. नांदेड), श्री.सुदामकाका शंकर भोंडवे (डोमरी, जि. बीड), श्री. प्रणव हरीदास खुळे (सातुर्ना, अमरावती), सौ.रेखाताई बन्सी भिसे (सारसा, जि. लातूर), श्रीमती रोहिणी नागराजन नायडू (नाशिक), श्री. प्रदीप मुकुंदराव नणंदकर (लातूर) व ह.भ.प. जयवंत महाराज बोधले (पंढरपूर, जि. सोलापूर) यांना जाहीर करण्यात आले आहेत.
शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, स्मृती चिन्ह, संत श्री ज्ञानेश्वर माऊलीची प्रतिमा व प्रत्येकी रू.११,०००/- रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कार प्रदान समारंभ रविवार, दि. २४ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी ११.०० वाजता माईर्स एमआयएमएसआर मेडिकल कॉलेज, यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय, अंबाजोगाई रोड, लातूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कामगार राज्यमंत्री मा. ना. श्री. विजयसिद्रामप्पा देशमुख हे उपस्थित राहणार आहेत. लातूरचे माजी खासदार मा.श्री.गोपाळराव पाटील व विवेकानंद हॉस्पीटलचे अध्यक्ष डॉ.अशोक कुकडे हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.अध्यक्षस्थानी एमआयटी विश्वशांती विद्यापीठा चे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड हे असतील. अशी माहिती राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड राज्यस्तरीय पुरस्कार समितीचे समन्वयक व एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड यांनी दिली.
१) राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड कृषीरत्न पुरस्कार-२०१७
श्री शंकरराव दिनकरराव खोत हे प्रगतीशील शेतकरी असून त्यांनी नैसर्गिक स्त्रोत कायम ठेवत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करीत आहेत. त्यांच्याकडे असलेल्या ५० एकर जमिनीत मिश्र आंतरपिके घेऊन शेतीमध्ये नवा प्रयोग केला आहे व आजूबाजूच्या लोकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून दिला आहे. सोबतच या संदर्भात वेळोवेळी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील शेतकर्यांना याविषयीचे मार्गदर्शन करित आहेत. म्हणून त्यांना कृषिरत्न पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे.
२) राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड समाजरत्न पुरस्कार-२०१७
सौ. बेबीताई अशोक गायकवाड यांनी पाथर्डी तालुक्यातील शिराळ चिचोंडीसारख्या मागासलेल्या भागातून पोटभरण्यासाठी अहमदनगरला येऊन तिथे भाजीपाल्याचा व्यवसाय केला. भाजीपाला विकत असतानाच येणार्या महिला व मुलांमध्ये पुस्तक वाचनाची आवड निर्माण केली. जून्या रूढी-परंपरांना झटकून वीरपत्नी व विधवांना व त्यांच्या नातेवाईकांना एकत्र आणले. त्यांचे मतपरिवर्तन करून त्यांना विधवा विवाहास प्रोत्साहन दिले म्हणून त्यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे.
३)राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड आरोग्यरत्न पुरस्कार-२०१७
श्री. डॉ. अशोक वामनराव बेलखोडे यांनी १९८३ पासून मराठवाड्यातील नक्षलवाद्यांच्या छायेत असलेल्या किनवट या आदिवासी भागात वैद्यकीय अधिकारी म्हणून १२ वर्षे कार्य केले. सरकारी नोकरी सोडून किनवट येथे त्यांनी १९९५ मध्ये साने गुरुजी रूग्णालयाची स्थापना केली. या रूग्णालयाच्यामार्फत किनवट तालुक्यातील ३९२ खेड्यातील ३ लक्ष लोकांना मोफत आरोग्य सेवा पुरवित आहेत. तसेच ते गोरगरिबांच्यासाठी बिलात २५ टक्के सूट देऊन समाजकार्य करीत आहेत. म्हणून त्यांना आरोग्यरत्न पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे.
४) राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड शिक्षणरत्न पुरस्कार-२०१७
श्री. सुदामकाका शंकर भोंडवे यांनी बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील डोमरी येथे सोनदरा गुरुकुलाची स्थापना केली. मागील तीन दशकांपासून अनेक परिपूर्ण पिढ्या घडविणार्या या गुरुकुलाच्या माध्यमातून मराठवाडयातील ऊसतोड कामगार, शेतकरी, कष्टकरी व गोरगरिबांच्या मुलांसाठी त्यांनी शिक्षणाची दारे खुली केली. मराठवाड्यातील ५०० गावांतील जवळपास २००० विद्यार्थी या गुरुकुलामध्ये पारंपारिक शिक्षणासोबतच मूल्याधिष्ठीत शिक्षण घेत आहेत. म्हणून त्यांना शिक्षणरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
५) राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड क्रीडारत्न पुरस्कार-२०१७
एमआयटी वर्ल्ड पीस युनिवर्सिटीमध्ये अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेणार्या प्रणव हरीदास खुले यांनी पॉवर लिफ्टिंग या क्रीडा प्रकारामध्ये आपली चमक दाखवली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये त्याला आठ सुवर्णपदक व तीन रौप्य पदके मिळाली आहेत. राष्ट्रीय पातळीवर एक सुवर्ण पदक, दोन रौप्य पदके मिळवली आहेत. आतंतराष्ट्रीय स्पर्धेमध्ये दोन सुवर्ण पदके मिळाली आहेत. तसेच १० ते १७ सप्टेंबर २०१७ मध्ये साऊथ आफ्रिका येथे होणार्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. म्हणून त्यांना क्रीडारत्न पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे.
६) राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड ग्रामरत्न पुरस्कार-२०१७
सारसा हे गाव लातूरच्या पश्चिमेस ३५ कि.मी. अंतरावर मांजरा नदीच्या काठावर वसलेले आहे. या गावची लोकसंख्या सुमारे अडीच हजार असून प्रमुख व्यवसाय शेती आहे. स्वच्छता, तंटामुक्ती, हागणदारीमुक्ती, सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, ग्रामसुरक्षा दलाची स्थापना, विविध बचत गटांची स्थापना व सक्षमीकरण, आरोग्य शिबीर असे विविध उपक्रम गावच्या सरपंच सौ. रेखा बन्सी भिसे यांच्या नेतृत्वाखाली राबविले जात आहेत. या गावची आदर्श गाव अशी ओळख आहे. त्यामूळे त्यांना ग्रामरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
७) राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड बचतगटरत्न पुरस्कार-२०१७
नाशिक येथील रहिवासी असणार्या श्रीमती रोहिणी नागराजन नायडू यांनी गौरी सामाजिक कल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागात महिला सक्षमीकरणासाठी १०७ बचतगटाची निर्मिती केली. या माध्यमातून त्यांनी ११७५ महिलांना प्रशिक्षण व मार्गदर्शन देऊन उद्योग व व्यवसायासाठी स्वत:च्या पायावर उभे केले. या सोबतच महिला सक्षमीकरण, आरोग्य, ग्रामविकास, व महिलांचे हक्कांसाठी त्यांनी अनेक कार्यशाळा घेतल्या आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना बचतगटरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
८) राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड जगजागरणरत्न पुरस्कार-२०१७
श्री. प्रदीप मुकुंदराव नणंदकर पत्रकारितेच्या क्षेत्रात गेल्या २५ वर्ष कार्यरत आहेत. त्यांनी दै. सोलापूर तरूणभारत, लोकसत्ता व साप्ताहिक विवेकच्या माध्यमातून शिक्षण, शेती, पाणी व महिला आदी विषयांवरील समस्यांना वाचा फोडली. आपल्या लिखाणाद्वारे त्यांनी सामान्य लोकांना न्याय मिळवून दिला आहे. म्हणून त्यांना जनजागरणरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
९) राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड अध्यात्मरत्न पुरस्कार-२०१७
जयवंत महाराज बोधले यांनी वयाच्या ११ व्या वर्षापासून कीर्तन व प्रवचनाची सेवा सुरू केली आहे. आज भरकटलेल्या तरुणपिढीला आपल्या कीर्तन व प्रवचनाद्वारे सामाजिक, अध्यात्मिक व धार्मिकतेचे आत्मभान करून देत आहेत. तसेच, प्रवचन, कीर्तन आणि भजनाच्या माध्यमातून लोकशिक्षण, मुल्यनिष्ठा, संस्कार व नैतिकतेचे धडे ते समाजाला व तरुण पिढीला देत आहेत. म्हणून त्यांना अध्यात्मरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
या पुरस्काराद्वारे महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये मोलाची कामगिरी बजावणार्या मात्र प्रसिद्ध नसणार्या व्यक्तींना प्रकाश झोतात आणून त्यांच्या कार्याची माहिती तरूण पिढीला करून द्यावी व या पिढीस त्या मार्गावर चालण्याची जिद्द बाळगण्यास प्रवृत्त करावे, हा या संस्थेचा उद्देश आहे.