पुणे :“ज्याला नवे जग घडवावयाचे असेल, त्याने स्वतंत्रपणे विचार करावयास शिकले पाहिजे. विचारांचे सामर्थ्य फार मोठे असते. पण सर्वसामान्यपणे आपण रूळलेल्या वाटेनेच जातो. आपल्यावर पूर्वग्रहांचा पगडा असतो. असे म्हटले जाते की, विचारांनीच माणूस घडतो. सकारात्मक विचार करणार्यांची प्रगती लवकर होताना दिसते. त्याउलट नकारात्मक विचार करणार्यांना खूप अडचणींना सामोरे जावे लागते.,”असे प्रतिपादन गुजरात येथील बीएपीएस-अक्षरधाम येथील परमपूज्य साधू विवेक जीवनदास यांनी प्रतिपादन केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासनांतर्गत माईर्स एमआयटीच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या २२व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेतील सहावें पुष्प गुंफताना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. (ग्रुप कॅप्टन) दीपक आपटे हे होते. एमआयटी स्कूल ऑफ टेलिकॉमचे प्रकल्प संचालक डॉ. मिलिंद पांडे व एमआयटीचे प्राचार्य डॉ. एल. के. क्षीरसागर इ. उपस्थित होते.
परमपूज्य साधू विवेक जीवनदास म्हणाले,“सामान्यपणे आपले आपल्याच विचारांकडे लक्ष नसते, किंबहुना विचारांच्या बाबातीत जेवढी सजगता असावयास हवी, तेवढी आपल्यामध्ये नसते. एखादी चांगली गोष्ट करताना मनात येणार पहिला सृजनशील विचार पकडून ठेवता आला पाहिजे. कारण तो खर्या अर्थाने ताजा असतो. त्यानुसारच आपली वाटचाल असावी. तरच तुम्ही कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हाल. तणावमुक्त जीवन जगण्यासाठी स्वतःबद्दल वेगळे विचार करण्याची क्षमता अंगी बाणविली पाहिजे, खरे म्हणजे ती क्षमता आपणात असतेच. पण आपण तिला प्रोत्साहन देत नाही. यासाठी स्वतःमध्ये शिस्त बाणवावी, जागतिक मूल्यांचे अनुकरण करून ते आपल्या जीवनात उतरवावे. या सर्वासाठी शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम असणे गरजेचे आहे. यासाठी गरज आहे ती ज्ञानयोग, भक्तीयोग आणि कर्मयोगाची. आपल्याला जीवनात उन्नती करावयाची असेल तर, त्यासाठी गुरू असणे हे अत्यंत महत्वाचे आहे. त्याशिवाय आपले पाऊल योग्य दिशेने पडत नाही व आपला विकास होत नाही.”
सकाळच्या सत्रात याप्रसंगी लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुभाष आवळे, व प्रा. दीपक आपटे यांची व्याख्याने झाली.
डॉ.सुभाष आवळे म्हणाले,“शिक्षक हे पद किंवा व्यवसाय नाही तर ही एक शुद्ध विचारांची संकल्पना आहे. ज्यात सामर्थ्य,ऊर्जा व विश्व सामावलेले असते. म्हणजेच शिक्षक हा एका अर्थांने गुरू असतो. नवी पिढी व देशाचे भविष्य घडविण्याचे सामर्थ्य फक्त शिक्षकांमध्येच असते. पण त्यासाठीसुद्धा उत्तम शिक्षक तयार करण्याची जवाबदारीही त्यांचीच असते. त्यामुळेच शिक्षकाजवळ शब्दसामर्थ असावे. तो उत्तम गायक, चित्रकार, अभिनेता व प्रवचनकारही असावयास हवा. या सृष्टीवरील सर्वप्रथम शिक्षक ही आईच असते. त्यामुळे तिची शिक्षवण व्यक्तीला आयुष्यभर मार्ग दाखवीत राहते.”
प्रा. दीपक आपटे म्हणाले,“ सुखी जीवन जगावयाचे असेल, तर आपल्या संपर्कातील सर्व गोष्टींचा आनंदाने स्वीकार करा. यात आपले वरिष्ठ, सहकारी, कुटुंबीय, शेजारी हे सर्व तर येतातच. पण आपले वाहन, आपले घर, आपला दूरदर्शंन संच, आपले जेवणाचे टेबल यांचेही स्वागत करा. तुम्हाला असे आढळून येईल, की आपल्या आजूबाजूच्या व्यक्ती, इतकेच नव्हे तर निर्जीव वस्तू सुद्धा आपल्याला सकारात्मक प्रतिसाद देतात. आपल्या आजूबाजूला घडणार्या घटना जर अटळ असतील, तर त्यांचेही स्वागत करा. मग त्या अनुकूल असोत की प्रतिकूल.”
डॉ. सुरेंद्र हेळेकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. एल. के. क्षीरसागर यांनी आभार मानले.