ज्ञानेश्वरांच्या एका ओवीने सुद्धा समाज परिवर्तन घडते अण्णा हजारे यांचे मत
पुणे: “संत ज्ञानेश्वरांच्या एका ओवीने समाज परिवर्तन होऊ शकते याचे उदा. म्हणजे राळेगणसिद्धी येथील क्रांतीकारक बदल. शुद्ध आचार, शुद्ध विचार, चारित्र्य, निष्कलंक जीवन आणि त्यागाची भावना हीच संताची शिकवण या समाजात सुख शांती आणून परिवर्तन घडवू शकते. त्यासाठी प्राध्यपकांनी शिक्षणाला नोकरी समझण्याऐवजी निष्काम कर्म करून सेवा करावी. त्यांच्या माध्यमातूनच या देशात आदर्श व्यक्तिमत्वाची पिढी तयार होईल.” असे मत थोर समाजसेवक श्री. अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत २४ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या २२व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते. महाराष्ट्र विधान सभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
या समारंभात विधानसभेचे माजी सभापती श्री. दिलीप वळसे-पाटील यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणेरी पगडी, सन्मानपत्र व ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
या प्रसंगी विशेष एमआयटी आर्ट, डिझाईन अॅण्ड टेक्नॉलॉजीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु.कराड, डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.राहुल विश्वनाथ कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण, व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. मिलिंद पांडे व एमआयटीचे प्राचार्य डॉ.एल.के क्षीरसागर हे उपस्थित होते.
श्री.अण्णा हजारे म्हणाले,“ भरकटत चाललेल्या या समाजाला संताचे विचारच वाचवू शकतील. येथे प्रत्येक व्यक्ती हा धन-संपत्ती जमविण्यासाठी धावत असतो. त्या माध्यमातून तो सुख व आनंद शोधीत असतो. खरे म्हणजे संतांची शिकवणच त्याला आनंद देऊ शकते. चंचल मनाला लगाम लावावा. राळेगण सिद्धी येथे ११ वर्षात ९ लाख लोक अभ्यासासाठी आले. तसेच,५ लोकांनी पीएचडी पूर्ण केली आहे. विज्ञानाने प्रगती केली पण जो पर्यंत मानवाच्या अंतर्मनात अध्यात्म उतरत नाही तो पर्यंत या विज्ञानाचा काहीही उपयोग नाही. अन्यथा विज्ञान विनाशाकडे घेऊन जाईल. देशाच्या परिवर्तनासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन हे ठरविले पाहिजे, की जो पर्यंत कार्यकर्ता देहू-आळंदीला जाऊन अभ्यास करीत नाही, तो पर्यंत त्याला तिकीट मिळणार नाही.”
श्री. दिलीप वळसे पाटील म्हणाले,“ज्या सरकारी शिक्षण संस्थेला ऑटोनॉमी दिली, त्या संस्था आज प्रगतीचा टप्पा गाठीत आहेत. शिक्षण म्हणजे परिपूर्ण विद्यार्थी, नागरिक व व्यक्तिमत्व निर्माण करण्याचे साधन आहे. स्व. वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री असतांना महाराष्ट्रात त्यांनी शिक्षण संस्था उघडण्याची परवानगी देऊन सर्वांसाठी शिक्षणाचे द्वार उघडले. त्यामध्ये डॉ.विश्वनाथ कराड यांचा सुद्धा वाटा आहे. शिक्षण मंत्री असतांना राज्यातील प्रत्येक गरीब, गरजू व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्यासाठी आम्ही त्यांची फी भरावयास सुरूवात केली. त्यामुळे राज्यसरकारला १५०० कोटी रूपये लागले. माझ्या मते शरद पवार हे एक चालते बोलते विद्यापीठ आहे. शिक्षण व्यवस्थेतून समाज परिवर्तन कसे करता येईल, ही त्यांची कल्पना आमच्या काळात अंमलात आणली. आज एमआयटी ने अध्यात्म आणि शिक्षणाची परिभाषा बदलून संपूर्ण जगात नाव लौकिक प्राप्त केला आहे.”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ तपस्या, त्याग, समर्पणची जीवंत मूर्ती असलेल्या अण्णा हजारे यांच्या हस्ते संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमालाचे उद्घाटन होणे हे आमचे भाग्य आहे. अण्णांच्या हातून घडणारे कार्य हे संताचे कार्य आहे असे म्हणता येईल.”
प्रा.डॉ. मंगेश तु.कराड यांनी मा. श्री. दिलीप वळसे पाटील यांचा परिचय करून दिला. प्रा.राहुल विश्वनाथ कराड यांनी प्रास्ताविक केले.
डॉ. मिलिंद पांडे यांनी व्याख्यानमालेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.
प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ.एल.के.क्षीरसागर यांनी आभार मानले.