विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र आळंदी येथे जागतिक सहिष्णुता सप्ताहाचे आयोजन
पुणे : विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. १० नोव्हेंबर ते गुरूवार, दि.१६ नोव्हेंबर २०१७ या दरम्यान संत शिरोमणी तत्त्वज्ञ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७२१ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने जागतिक सहिष्णुता सप्ताहाचे आयोजन केले आहे. कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त होत असलेल्या या सप्ताहात ‘श्रीसंत ज्ञानेश्वर-तुकाराम ज्ञानतीर्थ’, विश्वरूप दर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे लोकप्रबोधनपर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
या सप्ताहाचे उद्घाटन सोमवार, दि. १० नोव्हेंबर २०१७ रोजी सायंकाळी ६.०० वाजता होणार आहे. या सोहळ्याला प्रसिद्ध संगणकतज्ञ , नालंदा विद्यापीठाचे कुलपती व सप्ताहाचे प्रमुख सल्लागार पद्मश्री डॉ. विजय भटकर, श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीचे अध्यक्ष ह.भ.प. श्री. किसन महाराज साखरे, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, श्री. तुकाराम महाराज देवस्थानचे अध्यक्ष श्री.पंढरीनाथ उर्फ बाळासाहेब मोरे, आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सौ.वैजयंतताई उमरगेकर, आळंदी नगरपरिषदचे उपनगराध्यक्ष श्री. सागर तुळशीराम भोसले, श्री क्षेत्र देहूच्या सरपंच सौ. सुनिता चंद्रकांत टिळेकर, आळंदीचे माजी नगराध्यक्ष श्री. अशोक कांबळे, आळंदी देवाची येथील थोर स्वातंत्र्यसैनिक ह.भ.प.श्री. बाळासाहेब रावडे, इंद्रायणी मातेच्या आरतीचे मानकरी ह.भ.प.श्री.गणपतराव कुर्हाडे हे उपस्थित राहाणार आहेत.
‘विज्ञान व अध्यात्माच्या समन्वयातून विश्वशांती’ या स्वामी विवेकानंदांच्या वचनानुसार सुदृढ, निकोप व सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी पवित्र तीर्थक्षेत्रांचे खर्या अर्थाने ज्ञानतीर्थ क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडविण्याच्या हेतूने सहिष्णुता सप्ताहाचे आयोजन केले जाते. बंधुत्व, मानवी हक्क, लोकशाही, सर्वधर्मसमभाव, विज्ञान व अध्यात्माचा समन्वय आणि सहिष्णुता अशा विविध विषयांवरील लोकशिक्षणाचा व समाजप्रबोधनाचा हा सोहळा आहे.
या सोहळ्यात आळंदी येथील ह.भ.प.श्री. गणपत महाराज जगताप, संत साहित्याचे गाढे अभ्यासक ह.भ.प.श्री. आसाराम महाराज बडे, परभणी येथील ह.भ.प.डॉ. तुकाराम महाराज गरूड, ठाकुरबुवा दैठणेकर, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री ह.भ.प.श्री. बबनरावजी पाचपुते, जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प. श्री. बापूसाहेब मोरे-देहूकर इत्यादी मान्यवरांच्या प्रवचनातून विज्ञान, अध्यात्म व विविध धर्मांचा शांती संदेश यावरील विचार भाविकांना ऐकायला मिळणार आहेत.
तसेच, मंगळवार, दि.१४ नोव्हेंबर २०१७ रोजी संध्या.६.०० वाजता सौ. उर्मिला विश्वनाथ कराड लिखीत प्रज्ञाचक्षू श्री.ह.भ.प. गणपत महाराज जगताप यांच्या जीवनचरित्रावरील ‘दिव्यदृष्टीचा दैदिप्यमान ज्ञानदीप’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा होणार आहे.
संध्याकाळच्या सत्रात आळंदी येथील ज्ञानेश्वरी प्रवक्ते ह.भ.प.श्री. अर्जुन महाराज खाडे, बीड येथील ह.भ.प. श्री. बालयोगी हरिहर महाराज दिवेगांवकर, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार व रामायणाचार्य ह.भ.प.श्री. रामराव महाराज ढोक, वै.ह.भ.प. दादा महाराज साखरे फडाचे प्रमुख व ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक ह.भ.प. श्री. किसन महाराज साखरे व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. श्री. बाबामहाराज सातारकर यांची सुश्राव्य कीर्तने होतील.
रात्रीच्या सत्रात डॉ. प्रियांका गुळवणी यांचा अभंगरंग हा भक्ती संगिताचा कार्यक्रम, विश्वशांती संगीत कला अकादमी येथील शिक्षक व विद्यार्थ्यांचा भक्तीसंगीत व शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, पुणे येथील सुप्रसिद्ध गायक पं.आनंद भाटे यांचा अभंगवाणीचा कार्यक्रम, पुणे येथील सुप्रसिद्ध पार्श्वगायिका श्रीमती चारूशीला बेलसरे यांचा भक्तीसंगीताचा सुरेल कार्यक्रम व डॉ. रेवा नातू यांचा सुश्राव्य अभंगवाणीचा कार्यक्रम होणार आहे.
सकाळच्या सत्रात ह.भ.प. श्री. प्रकाश महाराज साठे, ह.भ.प.श्री सोपान महाराज शास्त्री, शिवचरित्र व्याख्याते ह.भ.प. धर्मराज महाराज हांडे, ह.भ.प. श्री ज्ञानेश्वर माऊली वाबळे, ह.भ.प.श्री नारायण महाराज उत्तरेश्वर पिंपरीकर व भागवताचार्य ह.भ.प.श्री. बाळू महाराज गिरगावकर यांची कीर्तने होतील.
संतश्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७२१ व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने गुरूवार, दि.१६ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी १०.०० वाजता ह.भ.प. डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांचे काल्याचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. त्यानंतर घंटानाद व महाप्रसाद होऊन या सप्ताहाची सांगता होणार आहे.
अशी माहिती विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे प्रमुख समन्वयक डॉ. सुनील का. कराड आणि समन्वयक प्रा. स्वाती कराड-चाटे यांनी दिली.