‘मेघदूत’…कविश्रेष्ठ कालिदासरचित एक अभिजात खंडकाव्य! देशातील बहुतेक भाषांमध्ये संगीत, नृत्य आणि श्लोकांवर आधारित ‘मेघदूता’चे कार्यक्रम झाले आहेत. ‘प्रवेश’ या संस्थेने ते पहिल्यांदाच मराठी रंगभूमीवर नाट्यस्वरुपात सादर केले आहे. आमदार मेधा कुलकर्णी यांच्या संयोजनातून येत्या शनिवारी (ता. १ जुलै) सकाळी ९ वाजता कोथरुडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात या नाटकाचा प्रयोग सादर केला जाणार आहे.
पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, रा. स्व. संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेश करपे, राज्याच्या सांस्कृतिक विभागाचे सचिव संजय पाटील, राजकीय विश्लेषक अभिनंदन थोरात, संस्कार भारतीचे सचिव सारंग कुलकर्णी, नाट्यविद्या विभागाचे प्रमुख योगेश सोमण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
इ. स. चौथ्या ते सहाव्या शतकादरम्यान ‘मेघदूता’ची निर्मिती झाली असावी असे मानले जाते. सुमारे १११ कडव्यांच्या या रचनेचे ‘पूर्वमेघ’ आणि ‘उत्तरमेघ’ असे दोन भाग आहेत. रामगिरीतील विरह व्याकुळ यक्षाने अलकापुरीला जाऊन आपल्या प्रेयसीला आपले क्षेमकुशल सांगणारा संदेश घेऊन जाण्याची वर्षा ऋतूतील मेघाला केली आहे. या मार्गातील डोंगरदर्या, नद्या, तिथला निसर्ग, रम्य परिसर याचे वर्णन पूर्वमेघात करण्यात आले आहे. उत्तरमेघात यक्षाने विरहवण्यात होरपळणार्या आपल्या पत्नीला द्यावयाचा उत्कट संदेश कथन केला आहे.
भरत नाट्यम व कथक अशी मिश्र नृत्य शैली आणि सारंगी, सतार, सरोद, तबला, पखवाज अशा केवळ पारंपरिक वाद्यांचा वापर हे या नाटकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. प्रथम पटवारी यांनी लेखन केले असून, निखिल शेटे निर्माता व दिग्दर्शक आहे. जयदीप वैद्य आणि शमिका भिडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.
‘मेघदूता’चे शनिवारी नाट्यस्वरुपात सादरीकरण
Date:

