प्रतिनिधी,करमणूक जगतात आपला ठसा उमटवलेल्या ‘शेमारू एन्टरटेनमेंट’ने नवी भरारी घेत खास मराठी सिनेरसिकांसाठी ‘शेमारू मराठीबाणा’ हे फक्त मराठी चित्रपट व नाटकांना वाहिलेले चॅनल सुरु केले आहे.
आज एका झगमगत्या सोहळ्यात त्याचा शानदार शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी मराठी चित्रपट जगतातील अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते. यात सुप्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे, अभिनेत्री वर्षा उसगांवकर, स्वप्नील जोशी, आदिनाथ कोठारे, सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू, प्रार्थना बेहरे विजय कदम, विजय पाटकर, जयवंत वाडकर, अविनाश खर्शीकर, सुशांत शेलार, संतोष जुवेकर, दिग्दर्शक अभिजीत पानसे आणि संगीतकार चिनार-महेश, निलेश मोहरीर आदी कलाकारांचा समावेश होता.
मराठी रसिकांचे मनोरंजन हाच मुख्य उद्देश ठेवून सुरु करण्यात आलेल्या या चॅनलवर महाराष्ट्र व गोव्यातील प्रेक्षकांना उत्तमोत्तम मराठी चित्रपट व नाटकं बघता येणार आहेत. त्याचे नाव ‘मराठी बाणा’ हे सुद्धा मराठी अस्मितेशी निगडीत असून मराठी संस्कृतीचा प्रचार-प्रसार करण्यात, ती लोकप्रिय करण्यात ते महत्वाची भूमिका बजावेल यात शंका नाही. ‘चित्रपटांच्या दुनियेतली चॅनलची गर्दी कितीही असली तरी आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाची सेवा रसिकांना देणार असून त्यांची उच्च अभिरुची लक्षात घेऊन तिचे समाधान करेल असा मनोरंजनाचा खजिना सादर करून आम्ही आमचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करू’ असा विश्वास शेमारु एन्टरटेनमेंटने व्यक्त केला आहे. अगदी अलीकडच्या, अभिजित खांडकेकर अभिनीत ‘भय’ या चित्रपटापासून ते जुन्या जमान्यातले लोकप्रिय नायक रमेश देव यांच्या १९६२ साली प्रदर्शित झालेल्या ‘प्रेम आंधळे असते’ या चित्रपटापर्यंत अनेक दर्जेदार चित्रपट या चॅनलवर रसिकांसाठी उपलब्ध असतील. त्यात ‘आपला माणूस’, ‘पोश्टर गर्ल्स’, ‘मितवा’, ‘क्लासमेट’ सारख्या अनेक दर्जेदार चित्रपटांचा समावेश असेल. या व्यतिरिक्त अनेक मराठी दर्जेदार नाटकांचे प्रसारण हे या टीव्ही चॅनलचं वेगळेपण असणार आहे.
‘शेमारु’ला मराठी प्रेक्षकांची आवड बरोबर माहीत असून मराठी चित्रपट विश्वाचा तो एक मोठा घटक आहे. मराठी चित्रपट व नाटकांचा फार मोठा संग्रह ‘शेमारु’कडे आहे. गेली काही दशकं ‘शेमारु’ प्रादेशिक मनोरंजनाची निर्मिती व समन्वय या क्षेत्रातही सक्रीय आहे. अनेक आघाडीच्या चॅनल्सवर शेमारुच्या कार्यक्रमाचं प्रसारणही होत असतं. त्यामुळेच आता ‘शेमारुच्या’च बॅनरखाली अतिशय उच्च दर्जाच्या कार्यक्रमांचं प्रसारण ही ‘शेमारु’साठी अर्थातच अतिशय नैसर्गिक अशी पुढची पायरी आहे.
या प्रसंगी बोलताना ‘शेमारु’चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री हिरेन गडा म्हणाले,‘शेमारु मराठीबाणा’च्या लॉंचमुळे आता मराठी भाषिक रसिकांमध्ये ‘शेमारू एन्टरटेनमेंट’चा पाया अधिक व्यापक होणार आहे, कारण आम्ही अतिशय दर्जेदार कंटेंट आमच्या या अभिजात मराठी मूव्ही चॅनलच्या माध्यमातून ग्राहकांना उपलब्ध करून देणार आहोत. प्रेक्षक व जाहिरातदार यांच्या दृष्टीने बोलायचं तर माध्यम व करमणूक विश्वात आम्ही या आधीच आमचे भक्कम स्थान प्रस्थापित केलेले आहे. तोच वारसा पुढे नेत आम्ही या, ‘शेमारु मराठीबाणा’च्या माध्यमातून प्रचंड मोठ्या संख्येने असलेल्या मराठी भाषिक रसिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांना त्यांच्याच भाषेत दर्जेदार करमणूक उपलब्ध करून देऊन आम्ही त्यांचे मनोरंजन करू शकू याचा आम्हाला विश्वास वाटतो.
या शानदार सोहळ्याला आवर्जून उपस्थित असलेला सर्वांचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी यावेळी बोलताना म्हणाला, ‘शेमारू गेली काही दशकं आपलं सगळ्यांचं मनोरंजन करत आली आहे आणि मी त्या प्रवासाचा केवळ एक साक्षीदारच नव्हे तर हिस्सा राहिलो आहे. मराठी सिनेजगत तसेच बॉलीवुडमधील ते एक महत्वाचे घटक असून आज ते लाँच करत असलेल्या ‘शेमारू मराठीबाणा’च्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहताना मला अत्यंत आनंद होत आहे. ‘मराठी बाणा’ या नावातच अभिमान व एकात्मता अंतर्भूत आहे आणि मला खात्री आहे की हे चॅनल आपल्याला आपल्या मुळांकडे अभिमानाने परत जायला आणि चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीशी नाते जोडायला भाग पाडणारे माध्यम ठरेल.
प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते महेश कोठारे या प्रसंगी बोलताना म्हणाले, ‘शेमारुच्या स्थापनेपासून मी शेमारुशी संबंधित आहे आणि ही एकच कंपनी अशी आहे की जिथे तुम्हाला कोणत्याही बॅनरचा कोणताही चित्रपट हमखास मिळू शकतो. माझ्या या सृजनशील प्रवासात मी ‘शेमारु’बरोबरच वाढलो आहे.त्यामुळेच ‘शेमारू मराठी बाणा’च्या लॉंचबाबत मी प्रचंड उत्साही आहे.सर्व मराठी चित्रपट व मराठी चित्र निर्मात्यांसाठी हे एक नवीन माध्यम असणार आहे. ‘शेमारु’ने करमणूक विश्वात एक मोठे स्थान मिळवले आहे आणि त्यांचा तोच गौरवशाली वारसा ते या ‘शेमारू मराठीबाणा’च्या रूपाने ही चालू ठेवतील असा मला विश्वास वाटतो. या माध्यमातून दर्जेदार मराठी चित्रपट व नाटकांचा आस्वाद मराठी प्रेक्षकांना घेता येणार आहे.
अत्यंत प्रतिभाशाली अभिनेता श्रेयस तळपदे यानेही या चॅनलसाठी आपल्या शुभेच्छा पाठवल्या. त्यात तो म्हणतो, ‘शेमारू हे या इंडस्ट्रीतल्या पायाभूत घटकांपैकी एक असून त्यांच्याकडे कंटेंटचा फार मोठा खजिना उपलब्ध आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःचं चॅनल लॉंच करणं हे अत्यंत आवश्यकच होतं. ते हे करतायत याचा मला आनंद आहे, कारण आम्ही चित्रपट निर्माते आमची निर्मिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा माध्यमांच्या शोधातच असतो. गेल्या काही दशकांत कंटेंटच्या संदर्भात ‘शेमारु’ हे प्रथम क्रमांकावर पोहोचले आहेत. ते कायमच आघाडीवर राहिले असून अत्यंत उत्तम पद्धतीने आमचे काम लोकांपर्यंत पोहोचवत आले आहेत. आज ते नव्याने लॉंच करत असलेलं ‘शेमारू मराठीबाणा’ हे चॅनलसुद्धा अल्पावधीतच प्रथम क्रमांकाचं चॅनलबनेल याची मला खात्री आहे. त्यासाठी माझ्या त्यांना हार्दिक शुभेच्छा. ते माझेही काही चित्रपट त्यावर दाखवतील आणि भविष्यातही आम्ही एकत्र काम करू अशी मी आशा करतो.’
‘शेमारु मराठीबाणा’ वेगवेगळ्या प्रकारचे मराठी चित्रपट व नाटकं प्रसारित करणार असून डीडी फ्री डीशवर तसेच अनेक केबल ऑपरेटर्सकडे हे चॅनल उपलब्ध झालेही आहे. अन्य सर्व डीटीएच प्लॅटफॉर्मवर तसेच महाराष्ट्र व गोव्यातील केबल ऑपरेटर्सकडे ते लवकरच उपलब्ध होईल
‘शेमारु मी’ संबंधी –
पाच दशकांपूर्वी एका फिरत्या संग्रहालयाच्या रुपात सुरु झालेली शेमारु ही कंपनी आज ‘डिजिटल विश्वातील एक अत्यंत महत्वाचा घटक ठरली आहे. आपल्याकडील कंटेंटच्या जोरावरआजभारतीय बाजारपेठेवर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘शेमारु एन्टरटेनमेंटलि’.नेच आता ‘शेमारु मी’ हे अद्भुत असं अॅपलाँच केलं आहे. बॉलीवूड, मराठी, गुजराती, भक्ती, पंजाबी व बाल या विविध विभागांमधील अधिकृत कंटेंटच्या शोधात असणाऱ्या सर्वच वयोगटांतील ग्राहकाला सर्वंकष आणि आगळे वेगळे कंटेंट पुरवण्याचं काम ‘शेमारू मी’ हे सर्वंकष अॅप करणार आहे.आपल्याला हव्या त्या विभागातलं कंटेंट निवडून त्यासाठी स्वतंत्रपणे पैसे भरण्याचं स्वातंत्र्य हे अॅप ग्राहकाला देणार आहे. त्याचे शुभारंभाचे सवलत मूल्य वैयक्तिक कॅटेगरी प्लॅनसाठी असे असेल –दर महा ४९/- किंवा वर्षाला ४९९/- तर सर्व अॅक्सेस प्लान्स साठी ते दर महा १२९/- तर वर्षासाठी ९९९/- असे असेल. ग्राहक गुगल प्ले स्टोर, iOSApp store आणि http://shemaroome.comवरुन हे ShemarooMeOTT app डाऊनलोड करु शकतात.